पुरणपोळीचा खून

By

सणासुदीला पुरणपोळी करणं हा एक सोहळा असतो. पुरणपोळीला ‘खाणं’ हे क्रियापद शोभतच नाही. पुरणपोळी ‘खायला’ ती काय वडापाव आहे की भाजलेला मका? पुरणपोळीला ‘खाणं’ म्हणणं म्हणजे भरजरी पैठणी नेसून मोरीतलं खरकटं साफ करण्यासारखं आहे. सेवन करणं, ग्रहण करणं असे अनेक शब्द आपल्या मायमराठीमध्ये असताना ‘खाणं’?

आदल्या रात्री कुकरमध्ये डाळ शिजल्याचा वास आला की दारावर आंब्याची टहाळी आणि झेंडूचं तोरण लागलं असं समजावं. डाळ मिक्सरमध्ये नं घोटता जमिनीवर बसून तळपायांमध्ये पातेलं दाबून पुरणयंत्राचा दांडा खरखर आवाज करत घासून त्यात घोटलेली असावी. वेलची कुटल्याचा दरवळ घरभर पसरलेला असावा. कटाची आमटी मिळणार म्हणून आसुसलेलं मन असावं.
जेव्हा पुरणपोळी तव्यावर जाते तेव्हा ती खरपूस भाजतानाचा वास चटाचट पानं घ्यायचा वेग वाढवतो.रांगोळीची महिरप आणि उदबत्तीची सोंगटी बाजूला येते. पंगत जमते. समोर पानात ते अन्नब्रह्म येतं. हल्ली एखाद्या नटीचा फोटो कसा की त्यात तिचा चेहराच ठळक दिसतो आणि बाकी सगळं धुरकट दिसतं तसं मला पानातले बाकी सगळे पदार्थ अंधुक दिसू लागतात आणि पुरणपोळीच फक्त स्पष्ट दिसू लागते. एक तुकडा मी हळूच बाजूला करतो.. तुपाचा शिडकावा करतो..त्या तुकड्याला दुधात सचैल अभ्यंग स्नान घालतो आणि मानवजन्माला येऊन पुरणपोळीचा स्वाद घेता आला याबद्दल देवाचे आभार मानत तो दैवी पदार्थ जिभेवर ठेवतो..क्षणात पोळीबरोबर मीही विरघळून जातो.

मला काही गोष्टींचं नवल वाटतं. आपण पोट भरायला पुरणपोळी खातो का ? आमचेच एक जवळचे नातेवाईक ! ( नाव सांगून मला जातपंचायत उभी करायची नाही ) पानात पुरणपोळी आली. काय करावं त्यांनी ? फोडणीचा भात कालवावा तशी पुरणपोळी कालवली..कणिक मळावी तसा तो गिचका रगड रगड रगडला..त्यावर चपाचप तुप ओतलं.. हे राम, त्या पुरणपोळीची दुध ओतून त्यांनी खीर केली आणि आजारी माणूस मऊ भात खातो तशी भुरके मारत ती पुरणपोळी ‘संपवली’.

पुरणपोळीचा खून झालेला मी पाहिला.

जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रह्म !!

//केदार//

ता.क. – ब्लॉग सुरू झाले.

Posted In ,

3 responses to “पुरणपोळीचा खून”

  1. Shubhesh Patwardhan Avatar
    Shubhesh Patwardhan

    वा वा अतिशय सुरेख

    Like

  2. उच्चांक केळकर Avatar
    उच्चांक केळकर

    असं म्हणतात की पट्टीच्या खवैय्याला जर लेखनाचं उत्तम अंग असेल ना, तर भूकेला वाचकही ते वाचून तृप्तीची ढेकर देतो… आणि साहजिकच त्या लिखाणानुरुप आपल्या सेवनधर्मातही योग्य ते बदल करतो…
    केदार, तुझं लेखनकौशल्य असंच रसमाधुर्याने भरलेलं खुमासदार असतं…
    अशाच अनेकोत्तम लेखांची वाट पहातोय…
    धन्यवाद…

    Like

  3. धनंजय माने Avatar
    धनंजय माने

    केदार, तुझं पुरणपोळीचं वर्णन आस्वाद घेण्यास प्रवृत्त करत आहे…मी virtual simulation अनुभवत आहे😜

    Like

Leave a comment