अंगणी माझ्या मनाच्या….

By

मध्ये रत्नागिरीला गेलो होतो.सकाळी चहा पीत बसलो होतो. गर्द हिरवाई, पक्ष्यांची किलबील अशी सकाळ अनुभवत असताना दुरून कुठूनतरी जरा मोठा ‘थप् थप् ‘ असा आवाज कानावर येऊ लागला. शैला म्हणाली, बहुतेक लाकूड तोडत असावं कुणीतरी. लाकूड तोडण्याचा असा आवाज?.असा विचार करत असताना अचानक माझा चेहरा उजळला…..

हे असे दिवाळी जवळ आल्याचे दिवस. पावसाची झोड संपून तो परतीच्या प्रवासाला लागलेला असायचा. रत्नागिरीत प्रत्येक घरासमोर सुंदर अंगण असायचं. तेव्हा अंगणात शहाबादी फरश्या लावायचं खूळ आलं नव्हतं. छान मातीचं अंगण असायचं. या मातीच्या अंगणाची पावसामुळे दुर्दशा झालेली असायची. पायांना खडे टोचायचे. अंगण उंचसखल झालेलं असायचं.

दिवाळी जवळ आली की हे अंगण खणून त्याची सपाटी केली जाई. कुदळ आडवी धरून मी आमच्या कृष्णाच्या सोबतीने वर आलेली ढिकळं फोडायचो. त्या खडबडीत उकरलेल्या अंगणावर शेण आणि माती मिसळून हलका मुरमाचा थर टाकला जाई. आणि नंतर अंगण सपाट करून त्यावर चोपणीने सपासप चोपलं जाई. क्रिकेटच्या बॅटच्या आकाराची ती चोपणी जड असायची. पहिली चोपणी दुसरी चोपणी अशा वेगवेगळ्या चोपण्या केल्या जात. हे खूप मेहनतीचं काम असायचं. आणि शक्यतो चोपणी ही सकाळी केली जाई. आजूबाजूच्या प्रत्येक घरात अशी चोपणी केली जात असल्याने सकाळ अशी ‘थप् थप्’ आवाज ऐकताना उजाडायची. सगळीकडून चोपणीचे आवाज स्टिरिओफोनिक ऐकू यायचे. ते आवाज सांगायचे की दिवाळी आली जवळ. मनाला आनंद व्हायचा.
एकदा अंगण तयार झालं की ते शेणाने सारवलं जाई. जरा वाळलं की त्यावर कुलकर्णी आज्जी सुंदर रांगोळी काढत.
अशा मऊसूत अंगणावरून चालताना तळपायाला किती छान वाटायचं! बाजूला तुळशी वृंदावन होतं त्यात संध्याकाळी दिवली लागायची. त्या मिणमिणत्या प्रकाशात अंगणाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसायचं.

व्हिट्रीफाईड ग्लॉसी मिरर् फिनीश इटालियन अँटी स्कीड अशी खासियत असलेल्या टाईल्सचे प्रकार घेऊन आलेल्या आजच्या जगात माझं मन मला थेट घेऊन गेलं सुंदर सारवलेल्या नव्याने चोपून बनवलेल्या अंगणात.. आणि त्या चोपणीच्या आवाजाने थेट समोर दिसू लागली कुलकर्णी आज्जींनी काढलेली रांगोळी…! शेणाने सारवताना झाडूचे फराटे नक्षी काढायचे. याच सुंदर अंगणात होळीच्या दिवसांत क्षणभर पालखी विसावलेली पाहताना सुख वाटायचं.

आठवणी जाग्या होत असतात त्या अशा… रस, रंग, गंध.. आणि अर्थातच कुठल्याही आवाजाने..!

नाही का ?

//केदार//

Posted In ,