आपलातुपला चहा….

By

हा माझा मूळ लेख 28 मार्च 2020 च्या दै लोकसत्ता मध्ये प्रकाशित झाला होता. जागेअभावी संपूर्ण लेख वृत्तपत्रात आला नव्हता.

दै लोकसत्ताचे आभार मानून इथे पुनःप्रकाशित करत आहे.

~~~~~~~~~~~~~~~

दि बा मोकाशींची ‘आपलातुपला चहा’  नावाची एक लघुकथा आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ असते. पाहुण्यांच्या सरबराईत वेळ जातो.दोन चार दिवसांनी सगळे पाहुणे निघून जातात आणि अचानक एक प्रकारचा रिकामेपणा त्याला आणि तिला जाणवतो. घरात हा पसारा झालेला असतो. सुन्न मनस्थिती झालेली असते आणि अचानक दोघांना प्रकर्षाने जाणवतं की या सगळ्या गडबडीत ‘आपलातुपला चहा’ झालाच नाही. दोघांनाही मग उत्साह येतो आणि मग ती चहा बनवते आणि समोरासमोर बसून छान गप्पा मारत ते दोघं ‘आपलातुपला चहा’ पितात आणि मग दोघंही नॉर्मल होतात. कसली भारी कथा आहे ती! 

ती आठवायचं कारण म्हणजे आता या करोना नावाच्या दैत्याने सक्तीने घरी बसायला लावलं आहे. डोक्यात सतत कामाचे विचार सुरू असतात. आज रविवार अमुक तारीख म्हणजे उद्या ती अमुक मिटिंग आहे, मग आपलं प्रेझेंटेशन आहे..हा डेटा हवाय..हा टीम मेंबर कुठे आहे.. हे पेमेंट करायचं आहे.. तो रिप्लाय द्यायचा आहे.. ! हे असे अनंत विचार डोक्यात घोळत असतात. यामध्ये ब्रेक म्हणून आठवड्याभराची रजा घेतली तरी ऑफिसचे व्यवहार सुरूच असतात म्हणजे डोक्यात विचार सुरूच असतात. आता या करोनामुळे सगळेच घरी. सगळं ठप्प. कुणाचे फोन नाहीत की काही काम करणं शक्य नाही. जीवावरच बेतलंय.

मागच्या वर्षी डोंबिवलीमधली एक लायब्ररी बंद झाली, तेव्हा त्यांनी सर्व पुस्तकं मिळतील त्या भावात विकली. मी ताबडतोब जाऊन तीन खोके भरून पुस्तकं आणली. जुन्या जमान्यातील लेखक म्हणजे द पां खांबेटे, दत्तू बांदेकर, वि स खांडेकर, ना सी फडके तसंच शांताबाई शेळकेंचं गद्य लेखन, नारायण धारपांच्या कादंबऱ्या, जयवंत दळवी, दि बा मोकाशींचं ‘संध्याकाळचं पुणं’ असा खजिना गवसला होता. सगळी पुस्तकं छानपैकी बाईंड करून ठेवली होती. आज वाचू ऊद्या वाचू करत वाचायला काही मुहूर्त लागत नव्हता. ती पुस्तकं तशीच कपाटात पडून होती. 

इंशुअरन्स पॉलिसी किती प्रकारच्या असतात. कार, टू व्हिलर, लाईफ इंशुअरन्स .. या सर्वांचे हप्ते वेळोवेळी भरून त्यांच्या रिसिटस् कपाटात नुसत्या ठेवलेल्या असतात. घराचे हप्ते आणि वेगवेगळे कागद नुसते नंतर बघू म्हणून कपाटात फेकलेले असतात. प्रचंड पसारा झालेला असतो. त्यात कुठे गणपतीपुळ्याहून आलेल्या अंगाऱ्याच्या पुडीचा सुगंध येत असतो. सेल बदलायला लागणार म्हणून बंद पडलेली घड्याळं असतात. बँकेची चेकबुक अधूनमधून डोकावत असतात.हे सगळं व्यवस्थित फाईल करायचं आहे हे गेले अनेक दिवस मनाला बजावत आलेलो असतो.

फ्रीज उघडला तर डोअर लायनिंग काळं पडलेलं रोज बघून आज क्लीन करू उद्या करू असं मनाला बजावत असतो. किचनचा प्रांत माझा नसला तरी उंचावरचे कप्पे नीट लावयचं म़ाझंच काम असतं. जुने कुकर, मिक्सर रिपेअर करायचे म्हणून तिथे ठेवलेले असतात. एकतर रिपेअर करूया नाहीतर फेकून देऊया असं म्हणत चालढकल चाललेली असते. बेडवर गादीखाली जूने एक्सरे रिपोर्ट ठेवले आहेत त्याचं काय करायचं याचा अजून निर्णय होत नाहीये. बेडखालचं स्टोरेज म्हणजे अचाट काम आहे. जूनी बेडशीटं चादरी एकामेकाला चिकटून वड्या झाल्या आहेत. तिथेच पूजेचे लाकडी पाट ठेवले आहेत. ड्रेसिंग टेबलजवळ संपलेल्या अत्तराच्या बाटल्या, पावडरचे डबे, क्रीमच्या चपट्या डब्या यांचा पसारा नीट लावायचा आहे. बाथरूममध्ये शांपूची डबडी, साबण  हा वेगळाच पसारा असतो तो आवरायचा आहे. 

आता या करोनामुळे मिळालेल्या सुटीचा विचार करताना जाणवलं की किती कामं करायची राहिली आहेत. आपण कामावर सगळं शेड्युलनुसार करतो मग घरी अशी चालढकल का करावी ! कपाटं लावायची आहेत, फ्रीज साफ करायचा आहे, फाईलींग करायचं आहे… पुस्तकं वाचायची आहेत. मित्रांना फोन लावून गप्पा तर मारायच्याच आहेत. 

रोज ऑफिसमधून आलो की पटकन रात्रीचे दहा कसे वाजतात आणि दिवस कसा संपतो हे कळतच नसतं. ऊद्याची तयारी करण्यात तो ऊद्या कधी येतो आणि जातो कळतही नाही.खरंतर जागे असताना आपण घरच्यापेक्षा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतो त्यामुळे घरी ही अशी कामं करायची राहिलेली असतात पण कधी? हा प्रश्न कायम सतावत असतो. मुलं सुटी असली तर वाऱ्यासारखी येतात आणि निघून जातात. परस्परांना वेळ देता येत नाही. आता या करोना मुळे मिळालेल्या या सुटीचा नेमका उपयोग करायचा ठरवलं आहे. आपले आनंद हे पर्यटन, प्रवास, हॉटेलींग, पार्ट्या यापेक्षा वेगळे असू शकतात. मऊ भात, थालिपीठ, वरणभात , बटाट्याच्या काचऱ्या, तळणीची मिरची असा मेन्यू करायचा आहे. 

मी हे सर्व झरझर आठवतो.. बशीत खारेदाणे भरतो.. आरामखुर्चीत छान बैठक जमवतो आणि म्हणतो ,अगं , ‘आपलातुपला चहा’ कर गं जरा !!

//केदार//

Posted In ,

5 responses to “आपलातुपला चहा….”

Leave a comment