इरफान खान आज गेला.
चटका लावून गेला. त्याचा ‘मेट्रो’ पाहिला तेव्हाच त्याच्या प्रेमात पडलो होतो.
सहज एखाद्या मित्राने बोलावं तसं बोलणारा..गप्पा मारणारा.. आपला वाटणारा आणि आपलंसं करणारा इतका गुणी इरफान .. का बरं त्यालाच कॅन्सर व्हावा ? कुठल्याही कपूर किंवा कुमार खानदानातला नसताना , पाठीमागे पिढीजात बापजाद्यांचा वरदहस्त नसताना केवळ उत्तम अभिनयाच्या गुणांवर इरफान पुढे आला होता.
‘मेट्रो’ मध्ये कोंकोना सेन बरोबर हातात पिशव्या घेऊन शॉपिंग मॉल मध्ये फिरतो ते कसलं साधं आपलं नेहमीसारखं वाटतं. झाडाभोवती गिरक्या घेत अंगचटीला जाणारा तो कधीच दिसला नाही. कधी कुठे चमकोगिरी करत सभा समारंभात मिरवताना दिसला नाही. कुठलाही आव नं आणता हा जगला आणि तसाच त्याने अभिनय केला.
याचा ‘लंच बॉक्स’ हा एक अफलातून सिनेमा. कुठलंही ग्लॅमर नाही, छानछोकी नाही. त्याच्या सिनेमांची यादी मी इथे देत बसत नाही कारण ती मोठी आहे. पण प्रत्येक सिनेमा पाहताना इरफान हा एक अभिनेता या पेक्षा एक व्यक्ती म्हणून, एक आपला माणूस म्हणून अधिकाधिक जवळ येत गेला.
आज या लॉकडाऊनमध्ये घरी बसून झूम वर मिटिंग चालू असताना तो गेल्याची बातमी वाचली आणि सुन्न मनस्थिती झाली. काय,कोण आपण, कुठल्या जन्माचं नातं असं असतं की असं कुणीतरी येतं.. मनात घर करून बसतं आणि हे असं अचानक निघून जातं ? का ? या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तरं नसतात.
माझं जगणं सुंदर करण्यात ज्या व्यक्तींचा हातभार लागलेला आहे त्यात इरफान आणि त्याचे अनेक सिनेमे आहेत. मेट्रो मधलंच एक गाणं आता आठवत आहे
चुपके से कहीं, धीमे पाँव से
जाने किस तरह किस घड़ी
आगे बढ़ गए हमसे राहों में
पर तुम तो अभी थे यहीं
कुछ भी न सुना, कब का था गिला
कैसे कह दिया अलविदा
दिवसभर मन दुःखी झालं. इरफानला जाणून घ्यावं, पुन्हा त्याला पहावं असं जेव्हा वाटेल, तेव्हा नेटफ्लिक्स, अमेझॉन किंवा यूट्यूब या मोठ्या सरोवरांमध्ये त्याला पाहता येईल असे विचार मनात आले.
जेव्हा तहान लागेल तेव्हा सरोवर जवळच आहे. सरोवरातलं पाणी स्वच्छ आहे. मनाला आनंद देणारं आहे.
इरफान, खूप आठवण येईल तुझी!!
//केदार//
Leave a comment