नेल्कोचा ट्रान्झिस्टर ते ‘बोस’ चे स्पीकर्स ..एक श्रवणीय प्रवास

By

मी यत्ता पहिली किंवा दुसरीत असेन. समोरच्या परांजपे वाड्यातल्या उंच झाडांमधून सूर्याचे कोवळे किरण फोकस मारल्यासारखे तिरपे आलेले असत. खिडकीपाशी बाबा दाढी करत बसायचे. नेल्कोचा छोटा ट्रान्झिस्टर त्यांच्या बाजूला ठेवलेला आणि त्यावर खरखर आवाजाच्या पार्श्वभूमीवर रेडियो सिलोनवर बहारदार ‘पुराने नग्म़े’ लागलेले. माझे डोळे अर्धवट उघडे असताना सैगलचं ‘इक बंगला बने न्यारा’ हे कार्यक्रम संपताना लागे. सिलोनवर नेहमी सकाळी या कार्यक्रमाचा शेवट सैगलच्या गाण्यांनी होई. ते गाणं संपलं की बाबा दाढी संपवून ब्रश झटकत आम्हाला उठवत. दिवसाची सुरूवात करून देणारी ती सुंदर सकाळ !

आमच्याकडे तेव्हा एक जुना व्हॉल्वचा रेडिओ होता. तो आधी चालू करून ठेवायला लागे आणि व्हॉल्व गरम झाला की रेडिओ वाजायला लागे. मोठं बटण फिरवलं की खरखर सुरू होऊन गाणी लागत. आजच्यासारखे तेव्हा एफएम नव्हते त्यामुळे रात्री अकरा नंतर रेडिओ बंद होई. हा आमचा रेडिओ जरा अवजड होता, त्यावर एखादं जाळीचं कापड वगैरे टाकून तो झाकावा लागे. नंतर जरा सुटसुटीत असा छोटा ट्रान्झिस्टर बाबांनी आणला. दोन बाजूला स्पीकर आणि मध्ये उभ्या पट्टीवर आकडे असलेला. त्याला एक काळं कव्हर होतं. बु़धवारी बिनाका गीतमाला वगैरे ऐकत असू. नंतर आमच्याकडे आला एक फिलिप्सचा आडवा पसरट टेपरेकॉर्डर. पहिल्यांदा कॅसेट पाहिली. ती झपकन वर उघडणारी झडप आणि त्यात कॅसेट बसवली की आपल्याला हवी ती गाणी आपण कधीही ऐकू शकतो याची खूप गंमत वाटली होती. त्यातच एकदा बाबांनी आमचे आवाज टेप करून आम्हाला ऐकवले तेव्हा तर मी थक्क झालो होतो. चक्क माझाच आवाज स्पीकरमधून ? नवल वाटलं होतं मला. फिलीप्स, बुश, नॅशनल अशा कंपन्यांचे टेपरेकॉर्डर तेव्हा दिसत. बाबांना या सगळ्या सिस्टीमचं भयंकर वेड होतं.

त्यानंतर आमच्या घरी आला रेकॉर्ड प्लेयर. फिलिप्सचा ‘म्युझिक सेंटर’ अशा नावाचा तो रेकॉर्ड प्लेयर मला अगदी स्वप्नवत वाटला होता. त्याच्यावरचं झाकण उघडून तो सुरू केला की त्यावर फिरणारी रेकॉर्ड आणि त्यातून येणारा सुमधूर आवाज ऐकून मी धुंद होऊन जायचो. या सिस्टीमला एक अजून खासियत होती की तिला दोन वेगळे स्पीकर होते. मी उत्साहाने ते उंच कोपऱ्यात लांब ठेवले आणि सकाळ संध्याकाळ त्यावर वेगवेगळ्या रेकॉर्ड ऐकू लागलो. बरीच वर्ष ती सिस्टीम आमच्याकडे होती.
या सर्व म्युझिक सिस्टीम माझ्या वाढत्या वयात माझ्याबरोबर होत्या. त्यावर रत्नागिरी आकाशवाणीवर लागणारा लहान मुलांसाठीचा ‘अंगतपंगत’ हा कार्यक्रम नं चुकता दर रविवारी ऐकायचो. रोज सकाळी सिलोनवर जुनी गाणी ऐकायचो आणि ती गाणी आजही ऐकताना मला त्या दिवसांची आठवण करून देत असतात. वस्त्रहरण नाटक, वऱ्हाड निघालंय लंडनला, पुलंच्या व्यक्ति आणि वल्ली, वपुंचं कथाकथन यांची पारायणं मी या सगळ्या सिस्टीम्सवर केली. खदाखदा हसलो. रिवाईंड करून पुन्हा पुन्हा ऐकायचो. गुलाम अलींच्या गझल सतत मी ऐकायचो. नंतर जगजीत सिंग आयुष्यात आले आणि बाकी सगळ्या गझल फिक्या वाटू लागल्या हा भाग नंतरचा.
रामनवमी जवळ आली की अजूनही रत्नागिरी आकाशवाणीवर लागणारं गीतरामायण मी रेडिओवर ऐकतो. दुपारी वनीता समाज असा कार्यक्रम असायचा तो आणि रविवारी लागणारे भजनी मंडळाचे कार्यक्रम माझी आजी नं चुकता ऐकायची. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम बाबा आणि आजी कायम ऐकायचे. त्याच वयात मला पं.जसराज, पं. भीमसेनजी, हरीजी यांचे कार्यक्रम बाबांमुळे रेडिओवर ऐकता आले. बाबा नेहमी म्हणायचे फिलिप्सच्या आवाजाला तोड नाही आणि मग वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिस्टीममधला फरक मला समजावून सांगायचे.

नंतर माझं लग्न झाल्यावर मी घरी म्युझिक सिस्टीम या विषयावर अनेक प्रयोग सुरू केले. पुण्यात रविवारी लागणाऱ्या जुन्या बाजारातून एक भला मोठा स्पीकर खरेदी करून आणला. त्याचं खोकं उचकटून काढलं. एक मोठा माठ आणला आणि त्यावर तो स्पीकर उलटा ठेवून वायरींग करून तो टिव्हीला जोडला. त्या छोट्या खोलीत आवाजाला येणारा ‘बास्’ ऐकून मी स्वतःवरच खूष होऊन गेलो. पखवाज वगैरे असं वाजायचं की बस्स. घरी असे अनेक स्पीकर जमा झाले होते. उन्हाळ्यात घरी पाणी भरायला माठ मी कधी आणला नाही पण चार कोपऱ्यात चार माठ आणि त्यावर उलटे स्पीकर ठेवलेले होते ते पाहून सौ च्या चेहऱ्यावर ‘काय हा आचरटपणा’ असे भाव दिसत.
माझ्या या सिस्टीम वेडाला खतपाणी मिळालं ते मी नोकरी करत असलेल्या ‘शार्प’ कंपनीत. तिथे एकाहून एक अफलातून सिस्टीम तयार होत आणि मला पहायला मिळत. एकदा आमच्या कंपनीने सर्व एम्प्लॉइजना डिस्काऊंटवर मोठ्या सिस्टीम देऊ केल्या. मी लगेच एक बुक केली. स्वस्तात मिळणार असल्याने खुष झालो. कंपनीचं वेअरहाऊस लांब तिकडे वाघोलीला होतं. आम्ही दोघंचौघं वाघोलीला जाऊन सिस्टीम घरी घेऊन आलो. मी घरी येऊन जुळवाजुळव करत बसलो. छान स्पीकर जोडले. सीडी वगैरे नव्या आणल्या. ग्राफिक इक्वीलायझर वरखाली केले .. दाणदाण आवाज जेव्हा येऊ लागला तेव्हा मी धन्य होऊन गेलो. हे सगळं झालं आणि माझ्या लक्षात आलं की सौ कुठे घरात दिसत नव्हती. गेली कुठे ही ? बाबाही चिडलेले होते. म्हटलं ही सिस्टिम आणली घरी, तरी बाबांना याचं काहीच कसं वाटत नाही ? तेव्हा ते कृद्ध स्वरात म्हणाले ‘अरे, तुला काही कळतंय का ? उद्या तुझ्या बायकोची डिलिव्हरी आहे आणि तिला मगाशी तुझ्या सासुबाई घेऊन दवाखान्यात ऍडमिट करायला गेल्या आहेत’ मी कपाळावर हात मारला आणि बाईक काढून फडके हॉस्पिटलवर धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी सकाळी मला कन्यारत्न झालं. जेव्हा तिला हॉस्पिटलमधून घरी आणली तेव्हा त्याच नव्या सिस्टीमवर सनई लावली होती. अजूनही मी कसा त्या दिवशी धांदरटपणा केला होता ते मला ऐकावं लागतं. काही वर्षांपूर्वी त्या सिस्टीमच्या लाकडातून पांढरी भुकटी पडायला लागली तेव्हा ती मी कुणालातरी देऊन टाकली.
लग्नात माझ्या मित्रांनी मला वॉकमन दिला होता. तो बरोबर न्यायचा म्हणजे एक ताप होता. त्यातले सेल पटकन संपायचे आणि त्याच्याबरोबर ढीगभर कॅसेट न्याव्या लागत. त्या कॅसेटच्या टेप सतत अडकत. त्या तुटत. मध्ये पेन्सील घालून गुंडाळाव्या लागत. हा सारा ताप आज पेन ड्राईव्हवर गाणी ऐकणाऱ्या लोकांना कळणार नाही.

यथावकाश हातात आधी पेजर आणि नंतर मोबाईल आले. मोबाईलचे स्टोरेज वाढत गेलं. मोबाईलमध्ये रेडिओ आला आणि जुने रेडिओ कालबाह्य झाले. म्युझिक कसं ऐकावं हे कळत गेलं आणि माझ्या घरी आली ती ‘सोनी’ ची सिस्टीम. पहिल्यांदा मला साक्षात्कार झाला की स्पीकर वेगळे घ्यायचे असतात आणि त्यांना ध्वनी देणारे अँम्प्लीफायर वेगळे घ्यायचे असतात. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने ही सिस्टिम मी सिलींगला ठराविक अंतरावर स्पीकर लावून जोडली. व्हॉल्युम वाढवला की किचनमधल्या कपबशा फुटू लागल्या. या सिस्टिमवर मी कधीच गाणी जास्त ऐकू शकलो नाही कारण घरात सतत तेव्हा छोटा भीम आणि कार्टून्स लागलेली असत.

माझ्या आयुष्यात नंतर आगमन झालं ते ‘बोस’ चं. बोस पुढे सगळ्या सिस्टिम फिक्या आहेत हे जणवलं. हेडफोन, इयरफोन, पोर्टेबल स्पीकर..हे सारं बोस चं आलं. ‘डेनॉन’ चा अँम्प्लीफायर आणि बोस चे स्पीकर … बोस चा मी भक्त झालो. तो बास्, तो ट्रेबल, गिटारच्या तारांवरून बोटं सरकण्याचा सूक्ष्म् आवाज, कुजबूज, कागद फडफडण्याचा आवाज, विमानाची घरघर, झकीरभाईंच्या तबल्याचा कडकडाट, जगजीतजींची खर्जातली गझल, अमिताभचं ‘मै और मेरी तनहाई’ ऐकावं ते फक्त आणि फक्त बोसवरच.

सोनी, पॅनासॉनिक, बँग ओल्युफसन, जेनेलेक, डेनॉन, जेबीएल, ..अशा अनेक सिस्टिम पाहिल्या.. त्यातले फरक आणि बारकावे समजावून घेतले. रेझोनन्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीतला फरक कळला.. हे विश्व किती अद्भुतरम्य आहे हे जाणवलं.

आधी एखादी रेकॉर्ड जमवायची म्हणजे शोध घ्यावा लागायचा. तीस गाण्यांसाठी एक कॅसेट आणि अशा अनेक कॅसेटसाठी एक बॉक्स बरोबर न्यावा लागे. आता सगळंच बदलून गेलं आहे. एका पेन ड्राईव्हवर हजारो गाणी सेव्ह करता येतात आणि हवं ते गाणं कधीही ऐकता येतं. तेही नसलं तर यूट्यूबवर हवं ते मिळतं. लहान होतो तेव्हा घरोघरी ट्रान्झिस्टर नसायचे. एखाद्या घरात मोठ्या आवाजात गाणी लागली की शेजारी रहाणारे कान टवकारून ऐकायचे. टेकाडे भावजींची वाट पाहिली जायची. क्रिकेट मॅच असल्या की ट्रान्झिस्टर कानाला लावून एकजण स्कोअर ऐकायचा आणि बाकीचे बाजूला कोंडाळं करून उभे रहायचे. रत्नागिरीला काँग्रेसभवन समोर एक सायकल पंक्चर काढायचं दुकान होतं तो माणूस कानाला ट्रान्झिस्टर लावून बसायचा आणि क्रिकेटचा स्कोअर दुकानाच्या फळ्यांवर लिहायचा. आम्ही जाता येता तिथे थांबून स्कोअर पाहून पुढे जायचो.

त्या मार्कोनीने रेडिओचा शोध लावला तेव्हा त्याने कल्पनाही केली नसेल की हा शोध अवघ्या मानवजातीचं भावविश्व निर्माण करणारा असेल!

नेल्कोच्या ट्रान्झिस्टर पासून बोस च्या सिस्टिमपर्यंतचा माझा हा प्रवास.. सुमधूर आणि श्रवणीय !!

//केदार//

Posted In ,

Leave a comment