माझी आजी…

By

माझी आजी जाऊन या हनुमान जयंतीला तीन वर्ष झाली. ज्या दिवशी ती गेली त्या रात्री घरी आल्यावर मनाच्या भयाण अवस्थेत मी जसं सुचेल तसं लिहित गेलो. आजीबरोबर तेव्हापर्यंत जगलेला क्षण न् क्षण आठवत होता. पाणावलेल्या डोळ्यांनी मी लिहायला सुरूवात केली खरी पण नंतर हमसून हमसून रडू यायला लागलं. हुंदके फुटले आणि म्हणून त्यावेळी लेखन आवरतं घेतलं. कुठेतरी फॉरव

कमलाबाई गोविंद आपटे.. माझी आजी.. वय ९३.. आज गेली.

गेले काही दिवस ती अंथरूणाला खिळूनच होती. मागचे तीन दिवस तर अन्नपाणी नं घेता शुध्द हरपलेल्या अवस्थेत होती. घरघर लागणं म्हणजे काय ते असहाय्यपणे पाहत होतो. आज हनुमान जयंतीच्या दिवशी सगळं संपलं. घरी गेलो तर शांत भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. मागची काही वर्ष वेदनांनी व्यापलेला चेहरा आज शांत दिसत होता.

१ जानेवारी १९२४ या दिवशी लाहोर इथे जन्म झालेला.. मी कायम तिला तू पाकिस्तानी गं .. असं चिडवायचो. समजायला लागल्यापासून ‘हॅपी न्यू ईयर’ अशा शुभेच्छा कुणाला देताना ‘आज माझ्या आज्जीचा वाढदिवस’ असं सांगून टाकायचो, इतका तो एक जानेवारी मनात भिनला होता. मला तिच्या माहेरच्याबद्दल फारशी माहिती नाही पण सरकारी नोकरी तिच्या वडिलांची होती. तिला एक बहिण होती पण ती लवकरच गेली. नंतर युध्दपूर्व काळात त्यांचं कुटूंब पुण्यात आलं आणि यथावकाश तिचं लग्न सदाशिवपेठेतल्या गोविंदरावांशी झालं. तिला मी ‘भामिनी आज्जी’ असं म्हणायचो. मी तिचा सर्वात लाडका होतो. तिची ती ‘केदुल्या रे’ ही हाक अजून कानात आहे. अगदी दोन महिन्यांपूर्वी माझ्या वाढदिवशी तिला नमस्कार केला तेव्हाही त्याच टोनमध्ये ती मला ‘केदुल्या’ म्हणाली होती.

मला आठवतंय तेव्हापासून ती कधी कुणावर चिडलेली, करवादून शिव्याशाप देताना, कचकच करताना, वचवच करताना मी तिला पाहिलं नाही. तिचा तो स्वभावच नव्हता. छान पेटी वाजवायची. गाणं म्हणायची. सर्व राग आणि त्यांचे आरोह अवरोह मुखोद्गत असायचे. मला पेटीवर भीमपलास, कलावती, केदार, मालकंस हे राग तर तिनेच शिकवले होते. माझं आणि तिचं खूप छान जमायचं. तिच्या कुशीत शिरायचो. तिलाच आजपर्यंत मॅक्झिमम् मी चावलो आहे. पण एकदाही मला तिने ओरडल्याचं , मारल्याचं आठवत नाही. रत्नागिरीला मुरलीधराच्या देवळात ती ओसरीवर संध्याकाळी बसायची आणि आम्ही यथेच्छ बागडायचो. ते लाकडी खांब.. त्या तक्तपोशी .. बाजूला बसलेली आजी आणि अंधार पडेपर्यंत आरडाओरडा करत खेळणारा मी .. बाजूला दोन छोट्या घुमट्या होत्या.. त्यांत पणत्या लागल्या की मग आजी हाताला धरून मला घरी न्यायची…हे चित्रं आठवून मला आत्ता या क्षणी गलबलायला होतंय. शाळेत मी भयंकर दंगा करायचो. दरवेळी पालकांना घेऊन ये असं सांगितलं की मी आजीला बरोबर न्यायचो.. आजीला का आणलं असं विचारल्यावर मी एकदा उलट विचारलं होतं.. का, आजी पालक नाही का होऊ शकत.. ? बघा आजी , इतका दंगा करतो आणि वर चुरूचुरू बोलतोय कसा.. असं एका बाईंनी आजीला सांगितलं होतं. पण आजी मला कायम सांभाळून घ्यायची. एक दिवस हे बिंग फुटलं .. बाईंना माझे आईवडील रस्त्यात भेटले.. त्या दुष्ट बाईंनी माझी आणि आजीचीपण तक्रार केली.. आणि माझ्यामुळे आजीलापण आरोपीला पाठीशी घातल्याबद्दल ओरडा मिळाला.

ती कायम नऊवारी साडी नेसायची. त्या साडीला एक चोरकप्पा असायचा आणि त्यातून ती कायम माझ्यासाठी खाऊ आणायची. लहानपणी कधी काही खात असलो तर माझं खाऊन होईपर्यंत ती थांबायची आणि मग तिच्यासमोरचं मला हवं का विचारायची. मी नको म्हणालो की मग ती खाणं सुरू करायची. खाऊला हातावर चार आणे आठ आणे द्यायची ती आजीच. वाटीतून लाडू द्यायची ती आजीच. दिवाळीत कडबोळी चकल्या करायची ती आजीच.

मला ऐश्वर्या झाली.. ईशान झाला.. तेव्हा ती पणजी झाली.. मावंद घातलं होतं.. तिने माझ्या दोघाही पिल्लांच्या डोक्यावर सोन्याची फुलं उधळली होती.. खिचडी, आमटीभात हे पदार्थ तिला फार आवडायचे. कधी खुषीत असली तर जुन्या आठवणी सांगायची. माझे आजोबा १९७५ ला गेले.. तेव्हापासून भयाण एकटेपण वाटेला आलेलं ते आज संपलं. रत्नागिरीला मी लहान असताना आजीने शनीदेवाची कथा मला मोठी रंगवून रंगवून सांगितली होती.. मी खूप घाबरायचो अंधाराला.. मग ती म्हणायची ,केदुल्या घाबरायचं नाही, आस्तिक आस्तिक काळभैरव.. हा मंत्र म्हणायचा.. मग भुतं लांब पळून जातात..

मी एल एल बी झालो.. तेव्हा केदू्ल्या वकील झाल्याचं तिला कोण कौतुक झालं होतं.

माझी आजी ही माझ्यासाठी अगदी परीकथेतल्यासारखी आजी होती. एक माझं आणि तिचं विश्व होतं. फार फार हळूवार आणि गोड आठवणींचं..

गुरूजी मंत्र म्हणत होते.. वासांसी जीर्णानी यथाविहाय… … समोर आजी होती .. निःश्चेष्ट..

मनात माझ्या आकांत ..

//केदार//

Posted In ,

Leave a comment