या लॉकडाऊनच्या काळात घरी बसलोय.
‘अडकलोय’ असं मुद्दाम लिहित नाही.
हॉलमध्ये एक टीव्ही, बेडरूममध्ये एक. आम्हा चौघांकडे मोबाईल. त्याशिवाय घरात एक डेस्कटॉप आणि मुलांकडे आणि माझ्याकडे लॅपटॉप, इतके उदंड स्क्रीन घरात आहेत. लियो चार पायांचा आहे, तो जर बोलता असता त्याचाही एक लॅपटॉप घरात वाढला असता. कुठल्याही क्षणी कुठल्याही स्क्रीनवर काहीही पहायची सुविधा आहे. युट्यूब, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन..काहीही एका क्षणात आपल्यासमोर घेऊन येत असतात.
मन मागे गेलं.
अर्थातच रत्नागिरीत!
शाळा सुटली की मळक्या कपड्यांनी हसत खिदळत आम्ही घरी यायचो. येताना वाटेत शासकीय माहिती केंद्र होतं तिथे आवर्जून काही बोर्ड दिसतोय का ते पहायचो. शासनातर्फे तेव्हा जागोजागी माहितीपट अधूनमधून दाखवले जायचे. आणि ‘आज माहितीपट दाखवला जाईल’ असा बोर्ड तिथे लावला जाई. असा बोर्ड दिसला की आम्ही मुलं घाईघाईत घरी जाऊन त्या संध्याकाळी नेहमीचे खेळ रद्द करून लगेच माहितीकेंद्राच्या मागे जायचो. एक पस्तीस एम एम चा छोटा प्रोजेक्टर लावून समोर पडद्यावर तो माहितीपट सुरू होई. शेळीपालन, गांधीजींची पदयात्रा, कुटुंबनियोजन, तांबी लावल्याचे फायदे, पंतप्रधानांचे परदेश दौरे, गप्पी मासे पाळा इ विषयांवर अर्ध्या तासाचा हा माहितीपट असे. आम्ही सगळे अगदी डोळे विस्फारून तो पहात बसायचो. प्रेक्षकांमध्ये काही टगे असायचे ते अधूनमधून पाठीमागून माती आणि खडे समोर मारायचे. मग गोंधळ व्हायचा. जास्तच दंगा झाला तर माहितीपट बंद केला जाई. माहितीपट पहाणे ही आमच्यासाठी पर्वणी असे. मक्या हा माझा बालमित्रं नेहमी माझ्याबरोबर माहितीपट पहायला असायचा. एकदा हा माहितीपट पाहिला की आम्ही धन्य व्हायचो आणि त्यावर पुढे आठ दिवस चर्चा करत बसायचो.
त्यावेळी सिनेमा बघणं ही मोठी पर्वणी होती. बाबा आधीच तिकीटं काढून आणायचे. श्रीराम थिएटरला रू. 2.20 आणि रू 3.30 असे तिकिटाचे दर होते असं आठवतंय. सिनेमाला जाणं हा एक चर्चेचा विषय असायचा. सिनेमाचा दिवस उजाडला की उत्सुकता शिगेला पोहोचायची. मग आवराआवर करून ‘आज आम्ही सिनेमाला जाणार’ अशी जाहिरात करून आईबाबांच्या मागे घाई करून लवकर थिएटरवर पोहोचायचो,कारण त्यावेळी सुरूवातीला इंडियन न्यूज नावाचा एक प्रकार होता. गंभीर आवाजात ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंटरी दाखवली जाई. विषय तेच होते पण तेही चवीने पाहिले जात. नंतर निरमा, कोलगेट आणि लाईफबॉयच्या जाहिराती. नंतर सिनेमा सुरू व्हायचा. इंटरव्हलला बाहेरून सोडावॉटरच्या बाटल्यांवर ओपनर आपटल्याचा किणकिणाट आणि गोटीसोड्याच्या त्या बाटल्या उघडतानाचे चित्कार वातावरणात ऐकू येत. बाहेर हरीभाऊ नरवणे एका मोठ्या थाळ्यात वडापाव विकायचे. पांढरा शर्ट आणि हाफपॅन्ट अशा पेहरावातले हरीभाऊ आत्ता डोळ्यांसमोर दिसत आहेत.
सिनेमा पाहून झाला की दुसऱ्या दिवशी त्यावर साधकबाधक चर्चा होई. ष्टोरी रंगवून एकामेकांना ‘आयला भारी’ असं म्हणत पुन्हा सांगितली जाई. या सगळ्या चर्चा ऐकताना ज्याने कुणी जर तो सिनेमा पाहिला नसेल तर त्याला अपराधी वाटत असे.
त्याच दरम्यान अमिताभचे चित्रपट हाऊसफुल्ल होत होते. थिएटरवर तिकिटं ब्लॅकने विकली जात. ते ब्लॅकर्स तिकिटाच्या रांगेत उभे असणाऱ्यांच्या डोक्यावरून मासोळीसारखी हालचाल करत पुढे जायचे आणि खिडकीसमोर उडी मारून धसमुसळेपणा करत तिकिटांचा गठ्ठा विकत घेऊन पसार होत. याराना चित्रपटावेळी मी तिकीटाच्या रांगेत उभा असताना माझ्या डोक्यावरून असा एकजण गेला तेव्हा मी पार भयचकित झालो होतो. तेव्हा रत्नागिरीत सिनेमा पहाणं ही एक मौज होती. तिन्ही थिएटरचा परिसर नुसता गजबजलेला असायचा. नवीन येणाऱ्या सिनेमाची पोस्टर्स पहाणं हा एक आमचा छंद होता. श्रीखंडे डॉक्टरांच्या दवाखान्याबाहेर नेहमी एखादं पोस्टर लावलेलं दिसायचं. एक पोस्टर मुरलीधराच्या देवळाबाहेर दिसे.
लता आणि श्रीराम थिएटरच्या मध्ये एक भिंत होती आणि त्यात एक छोटी खिंड होती. खैबर खिंडीपेक्षा ही खिंड तेव्हा जास्त प्रसिद्ध होती. कारण सडपातळ मुलं त्यातून लिलया पार होत पण जरा मोठ्या आकाराच्या मुलामाणसांना ते अवघड जायचं. आमचा एक मित्रं त्या खिंडीत कसा अडकला होता आणि नंतर त्यावर काय रामायण झालं या चविष्ट चर्चा आजही चघळल्या जातात.
रत्नागिरी तेव्हा खूप छोटी होती. टुमदार होती. माणूस माणसाला ओळखायचं. नुसतं ओळखायचं नाही तर ओळख दाखवायचं! सणसमारंभ झोकात साजरे केले जात. वाड्यावठारांमध्ये कुठलं निमित्त असलं तर सत्यनारायण केला जाई आणि त्या रात्री त्या वाडीमध्ये सिनेमा दाखवला जाई. हा सिनेमा म्हणजे भर रस्त्यात रात्री नऊनंतर मोठा पडदा लावला जाई. थोड्या अंतरावर प्रोजेक्टर लावून त्यावर रीळं लावून सिनेमा दाखवला जाई. पडद्याच्या दोन्ही बाजूंना पब्लिक बसे. पडद्याच्या विरूद्ध बाजूला टायटल उलटी दिसत. मध्येच फिल्म तुटायची. ती पुन्हा जोडली जाऊन सिनेमा सुरू होईपर्यंत गोंधळ सुरू व्हायचा. मधूनच रीळ संपायचं. मग नवं रीळ चढवलं जायचं. यात कधी कधी रीळांचा सिक्वेन्स चुकायचा आणि क्लायमॅक्स आधी दाखवला जायचा. पण कुणाला काही फरक पडत नसे. मी ‘यादोंकी बारात’ असाच रस्त्यावर बसून पाहिला होता. मग यात कधी लाईट जायचे. एकदा सिनेमा चालू असताना प्रेक्षकांमध्ये एक बैल घुसला होता आणि असा काही गोंधळ झाला होता की बस्स.
नंतर कोल्हापूरला काही दिवस राहिलो. तिथे ‘पार्वती 70mm’ हे जे थिएटर आहे ते एक अप्रूप होतं. पार्वती ला सिनेम पहाणं हा एक नॉस्टॅल्जिया होता. तिथे ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन’ डोळे भरून पाहिला होता. कोल्हापूरचं पब्लिक खरंच भारी. सिनेमा आवडला की पडद्यावर नाणी भिरकवायचे पण मध्येच फिल्म तुटली तर घडीच्या खुर्च्या फोल्ड करून पुढे आपटायचे.
पुढे पुण्याला राहुल, नटराज, निलायम, मंगला, प्रभात, रतन, भानुविलास, विजय, अलका या थिएटर्समध्ये कितीतरी सिनेमे पाहिले. मुंबईला ईरॉस, लिबर्टी, मेट्रो, मिनर्व्हा, रिगल या थिएटरमध्ये नंतर खेपा झाल्या.
नंतर आयुष्यात नारायण सुर्वे म्हणतात तसा ‘भाकरीचा चंद्र’ समोर दिसू लागला आणि आयुष्याचा सिनेमा सुरू झाला. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहायला वेळ मिळेना झाला. खऱ्या आयुष्यात अनेक कसलेले नायक आणि खलनायक समोर येऊ लागले आणि नकळत मीच संवादाऐवजी ‘डायलॉग’ मारू लागलो. घरात मुलांची सोनपावलं आली आणि माझी पावलं थिएटरकडे वळू लागली ती ‘लायनकिंग’ ची तिकीटं काढायला.
आधी थिएटर कशी असायची? वर गरगरा फिरणारे पंखे आणि चित्रपट चालू असताना धूम्रपान करणारे प्रेक्षक. बहुतेक सीट उसवलेल्या असायच्या. एका शो ला माझ्या बाजूला बसलेल्या आजोबांनी माझ्याकडून पेन मागून घेतलं. मला कळेना सिनेमा चालू असताना यांना पेन कशाला हवंय? पहातो तर माझ्या पेनने ते आजोबा खुर्चीतले ढेकूण मारत बसले होते. चिपळूणला तर सिनेमा चालू असताना खुर्च्यांच्या रांगांमध्ये पानवाला गळ्यात तबक अडकवून पानतंबाकू आणि सिगारेट विकत फिरताना दिसला होता.
आता थिएटरमध्ये जायचं तर दडपण येतं. सात स्क्रीन असलेलं थिएटर. आत मंद एलईडी. एसीचा थंडावा. गुबगुबीत खुर्च्या. तो काहीतरी गोल्डक्लास असतो तिथे तर ब्लॅंकेटही देतात आणि खुर्ची गादीसारखी सपाट होते. टाय लावलेला वेटर येतो आणि पॉपकॉर्नचं टमरेलच्या आकाराचं डबडं देऊन जातो. ‘टब’ म्हणतात त्याला. किंमत चारशे रूपये. जर चौघांनी सिनेमाला जायचं ठरवलं तर सहज तिकिटांचे धरून दोन हजार रूपये कुठे जातात ते कळत नाही. जेव्हा सिनेमा हे अप्रूप होतं तेव्हा रूपया रूपया साठवून, उधाऱ्या करून सिनेमाला जायचो. तेव्हा थिएटरमधून बाहेर पडताना आनंद ओसंडून वहायचा. आज दोन हजार खर्चूनही तो आनंद मी शोधत असतो आणि थिएटरमधून अंग चोरून बाहेर पडत असतो.
मध्ये रत्नागिरीला अजयच्या हॉटेलमध्ये दुपारी मिसळ खायला गेलो होतो. दुपारी बारा ही मिसळ खायची वेळ नव्हे. कुणा मित्राला जर मी दुपारी मिसळ खायला गेलो हे कळलं असतं तर त्याने माझे वाभाडे काढले असते. अजयचं हॉटेल थिएटरच्या समोरच आहे. थिएटरवर स्मशानशांतता दिसली.मी अजयला विचारलं इतका शुकशुकाट कसा रे ? तर मला म्हणाला जर एखाद्या खेळाला आठपेक्षा कमी प्रेक्षक जमले तर खेळ रद्द होतो आणि आज असा खेळ रद्द झाला आहे. माझ्या पोटात गोळा आला. डोळ्यांसमोर याच थिएटरसमोरचा कोलाहल, धक्काबुक्की, मारामाऱ्या, गोंधळ दिसू लागला. तिथे पाहिलेले अनेक चित्रपट आठवले. ब्लॅकरच्या आरोळ्या आठवल्या. एक रसरशीत जिवंतपणा जिथे असायचा तिथे आता प्रेक्षकांअभावी खेळ रद्द केला जातो?
मनोरंजनाची साधनं विपुल प्रमाणात उपलब्ध झाली आणि चित्रपटाला जाण्याआधी आणि नंतर जे मनोरंजन व्हायचं ते फक्त समोरच्या पडद्यापुरतं उरलं. खरंतर आता तो पडदा तरी समोर कुठे उरलाय. तो आपल्या हातात चोवीस तास येऊन त्याने आपल्या आयुष्यातलं मनोरंजनच हिरावून नेलं आहे.
कोई लौटा दो मेरे बीते हुवे दिन !!
//केदार//
Leave a comment