कवडसे….!!

By

नवं वर्ष सुरू झालं तसे बरोबरीच्या मित्रांचे वाढदिवस सुरू झाले. या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही बहुतेकजण यावर्षी पन्नाशी साजरी करत आहोत. एका मित्राचा मागच्याच आठवड्यात असा पन्नासावा वाढदिवस झाला तेव्हा रिवाजाप्रमाणे त्याला,’ तू आता वयस्कर होत चालला आहेस, तुझ्याकडून आम्हा मित्रमंडळींना मॅच्युरिटीची अपेक्षा आहे, आचरटपणा कमी कर’ वगैरे सल्ले दिले. तो बधला नाही आणि ‘तुम्ही सगळे यावर्षीच पन्नाशी पार करणार आहात त्यामुळे तुम्हीच हे लक्षात ठेवा’ असं म्हणत बत्तीशी उचकटून हसला.

त्याची शापवाणी माझ्याबाबतीत आज खरी होत आहे. आज मी पन्नाशीचा झालो. म्हणजे नेमकं काय झालं? बाबा म्हणायचे ‘त्यात काय विशेष? जशी दाढी वाढते तसं वय वाढत असतं. आपलं कर्तृत्व त्यात नसतं.’ मी या जगात पहिला ‘ट्यँहँ’ केल्याला आज पन्नास वर्षं झाली इतकंच या गोष्टीला माझ्यापुरतं महत्व आहे.

माझ्या वाढत्या वयाचे संकेत हे जेव्हा मला चष्मा लागला तेव्हापासूनच मिळू लागले होते. एक दिवस अचानक डोकं जड झालं, डोळे चुरचुरू लागले आणि चष्मा लागला, ते वाढत्या वयाकडे पहिलं पाऊल पडलं होतं. चहा ‘बिनसाखरेचा’ झाला आणि अजून एक पाऊल पुढे पडलं.  ‘रूट कॅनॉल’ वगैरे शब्द तोंडात येऊ लागले आणि डेंटिस्टकडे खेपा वाढल्या. कोलेस्टेरॉल वगैरे भाषा बोलू लागलो. म्हणजे रूढी आणि परंपरांनुसार माझा पन्नाशीकडे प्रवास सुरू झाला होता. माझा एक मित्र तर फार आधीच म्हातारा झाला कारण तो मिसळ मागवताना ‘बिगर कट’ मागवतो.हे फारच भीषण आहे. मला एकदा म्हणाला ‘अरे खाऊन बघ काय भारी लागते’. मी कानावर हात ठेवले आणि डबल तर्रीवाला रस्सा मागवला.

‘सिंहावलोकन’ किंवा ‘मागे वळून बघताना’ वगैरे जड शब्दप्रयोग मी नाही करणार पण आज विचार करताना वाटतं की आता वेळ खूप कमी उरला आहे आणि अजून किती गोष्टी करायच्या राहिल्या आहेत, किती प्रवास करायचे बाकी आहेत, किती गाणी पुन्हा नव्याने ऐकायची आहेत, किती वाचन अजून करायचं राहिलं आहे…!

मागच्या काही दिवसांत मी झपाटल्यासारखा अंतोन चेकाॅव्ह वाचून काढला. त्याच्या कथांनी भारावून गेलो. त्याच्या ‘साॅरो, ग्रीफ, द प्रिन्सेस, लाईटस्, वेंका, वाॅर्ड नं 6, स्टेप्पी या कथा वाचून हरखून गेलो. खूप छान काही वाचल्याचं समाधान या कथांनी दिलं. रात्रभर जागून या कथा वाचल्या आणि पहाटेपर्यंत त्या कथांवर विचार करत बसलो. ‘माणसाला आपण भोगलेल्या दु:खाचा अहंकार होतो आणि दुसऱ्यांची दु:खं त्याला जाणवत नाहीत’ असं चेकाॅव्ह म्हणतो. त्याचं ‘द सीगल’ हे नाटक वाचायचं आहे. दोस्तोव्हस्कीचं ‘कारमाझाॅव्ह ब्रदर्स’ अजून वाचायचं आहे. आर्थर कोस्लरचं ‘डार्कनेस ॲट नून’ वाचायचं आहे. टॉलस्टाॅयचं ‘ॲना कॅरेनीना’ वाचायचं आहे. जाॅर्ज ऑरवेलचं ‘ॲनिमल फार्म’ अजून वाचायचं आहे. फ्रेंच लेखक गी द मोपांसा अजून वाचायचा राहिला आहे. जीएंची ‘स्वामी’ वाचताना एकदा धाप लागली होती आणि दरदरून घाम फुटला होता. मन घट्ट करून पुन्हा एकदा ती कथा वाचायची आहे. जीएंच्याच ‘कैरी’ ‘अंजन’ या कथा पुन्हा वाचायच्या आहेत. द पां खांबेटे वाचून हसून लोळलो होतो, पुन्हा त्यांचं एक पारायण करायचं आहे. समग्र गडकरी, कोल्हटकर, पुलं, गाडगीळ,अरविंद गोखले, भावे,मोकाशी, चिंवि जोशी, आचार्य अत्रे, रत्नाकर मतकरी यांचं साहित्य पुन्हा वाचायचं आहे. वसंत बापट, विंदा, पाडगांवकर, इंदिरा संत,शांताबाई यांच्या कविता वाचून धुंद व्हायचं आहे. जयवंत दळवींची महानंदा, सारे प्रवासी घडीचे’ पुन्हा वाचायचे आहेत. द मा मिरासदारांच्या विनोदांवर पुन्हा मनमुराद हसायचं आहे. सुरेश भटांच्या गझलांच्या नशा करायच्या आहेत. संत साहित्याकडे वळून तुकोबा, दासबोध, ज्ञानेश्वरी, पतंजलीयोगदर्शन, भागवत हे ग्रंथ समजले नाहीत तरी निदान श्रद्धेने या ग्रंथांना स्पर्श तरी करायचा आहे. बनगरवाडीचं हजारावं पारायण करायचं आहे.पुलंच्या हरीतात्यांसोबत इतिहासात रमायचं आहे.

कितीतरी मूव्ही पुन्हा पहायच्या आहेत. हिचकाॅकचे सायको, डायल एम फाॅर मर्डर, रिअर विंडो,बर्डस्, नाॅर्थ बाय नाॅर्थ वेस्ट हे परत पहायचे आहेत. गन्स ऑफ नॅव्हराॅन पुन्हा पहायचा आहे. टू सर विथ लव्ह, ग्रेट एस्केप, ब्रिज ऑन रिव्हर क्वाय पहायचे आहेत. पाथेर पांचालीतल्या अप्पूबरोबर भटकायचं आहे. आंधी मधल्या सुचित्रा सेन आणि संजीवकुमार बरोबर भावूक व्हायचं आहे. ‘रोमन हॉलिडे’ पुन्हा पहायचा आहे. राजेश खन्नाचे किशोरच्या गाण्यांचे चित्रपट पहाताना मोठ्या आवाजात ती गाणी म्हणायची आहेत.मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी’  ऐकताना तिच्या अदांवर फिदा व्हायचं आहे. नूतन देवआनंदबरोबर कुतूब मिनारमधून गोल गोल फिरत उतरायचं आहे. गाईडमधलं वहिदाचं सपेरा नृत्य पहायचं आहे.  लता,रफीसाहेब,तलत,किशोर, आशा, मदनमोहन,रोशन, सी रामचंद्र, सलीलदा, ओपी नय्यर यांचं ऋण तर या जन्मी नं फेडता येण्यासारखं. अनंत उपकार यांचे माझ्यावर आहेत. यांच्याबद्दल काय किती बोलू आणि लिहू असं मला होतं. यांच्या प्रत्येक गाण्यावर माझ्या आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवरच्या अनंत आठवणी जुळल्या गेल्या आहेत. साहीर,शकील या गीतकारांचे बोल पुन्हा गुणगुणायचे आहेत. जगजीत सिंगजी, गुलाम अली,मेहदी हसन,बेगम अख्तर यांच्या गझल पुन्हा ऐकायच्या आहेत. अख्तरीबाईंची ‘ऐ मुहब्बत तेरे अंजामपे रोना आया’ तसंच ‘ फरिदा खाऩमचं ‘आज जानेकी जिद़ ना करो’ कितीवेळा ऐकली तरी मी असमाधानीच.

घरात देवासारखा भीमसेनजींचा फोटो लावला आहे. त्यांच्या रेशमी लडीच्या ताना ऐकत मनाला जो आनंद होतो तो शब्दातीत. अण्णांचा आसावरी, दरबारी, भीमपलास आणि सगळेच राग म्हणजे खजिना आहे. पुन्हा सगळे राग ऐकायचे आहेत. पं जसराज, कुमार, निलाद्रीकुमार झकीरभाई, संजीव अभ्यंकर, विलायत खाँ… काय आणि किती ऐकायचं राहिलं आहे. कुमारांची ‘निर्गुणी भजनं’ ऐकायची आहेत.

माझा मूळ पिंड भटक्याचा. प्रवासाची अतोनात आवड. भरपूर फिरलो. अख्खा एक दिवस अंबाबाईच्या मंदिरात ओसरीवर बसून रहायचं आहे. घाटी दरवाज्याजवळच्या ताज्या गुलछडीच्या हारांचा घमघमाट घ्यायचा आहे. अनेक देश,अनेक शहरं नुसती सॅक लटकवून मनमुराद पायी फिरायची आहेत. अनेक आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा आहे. मित्रमंडळींमध्ये बसून हसायचं आहे. समुद्रकिनाऱ्यांवर  दिवसा रात्री भटकायचं आहे. नॉर्वे मधल्या फिऑर्ड्स पहायच्या आहेत. नॉर्दर्न लाईट्सचा  खेळ पहायचा आहे. अनेक मंदीरं पाहिली. अनेक पहायची आहेत. दादाबरोबर भटकताना एका आडगावी एका मंदिरात भजन सुरू होतं. गेलो आणि खाली बसलो. कुणीतरी टाळ दिले. तासभर तिथे तल्लीन होऊन टाळ कुटत बसलो. तसं पुन्हा करायचं आहे. गोंदवल्याला रामनवमीच्या पहाटे वर्तुळात अभंग येत नसतानाही फेर धरून झपूर्झावस्था अनुभवली होती. दादाबरोबर एक रात्रं सज्जनगडावर राहिलो, समर्थांच्या मठीत पहाटे दर्शन घेऊन गडाच्या टोकावर धाबळीचा मारूती आहे तिथे आलो तर शुक्राची चांदणी चमचमत होती. हळूहळू उजाडलं. गारवा आला. धुकं होतं आणि खाली लांब उरमोडी नदी दिसत होती. ती अद्भुतरम्य सकाळ पुन्हा अनुभवायची आहे. लहानपणी आजीबरोबर विठोबाच्या देवळात एकदा आख्यान ऐकायला बसलो होतो तसं पुन्हा बसायचं आहे.एका प्रखर चांदण्या रात्री अख्खा आंबा घाट गाडीचे हेडलाईटस् स्वीचऑफ करून वेगाने उतरलो होतो तो थरार पुन्हा अनुभवायचा आहे.शिवप्रभूंच्या रायगडावर एक रात्रं राहिलो होतो. दहाजण होतो.आमच्या खंडू पोरजीने पखवाज आणला होता. रात्रंभर पोवाडे आणि  अभंग म्हणताना अंगात वीरश्री संचारली होती. खंडू पखवाज कडकडवत होता आणि आम्ही बेभान झालो होतो. गडावर रात्री फिरायला बाहेर पडलो आणि अक्षरशः आकाशाची छत्री आमच्याभोवती असंख्य ताऱ्यांबरोबर चमचमत होती. मधूनच एखादी उल्का दिसायची. तो अविस्मरणीय अनुभव पुन्हा घ्यायचा आहे.

गावोगावी फिरून अनेक पदार्थ खाल्ले. दिल्लीतल्या रोशनचे छोले, काके दा हॉटेलमधली कोंबडी, मिश्राच्या हातून तोंडात ठासलं जाणारं जळकं बनारसी पान, कोल्हापूरच्या चोरगेंची मिसळ, राजाभाऊंची भेळ, यळगूडचं मसाला दूध, गंगावेशीतलं दूधकट्ट्यावरचं धारोष्ण दूध..ही यादी फारच मोठी आहे. खाणं हा विषय इथेच आटोपता घेतो.

जेव्हा हल्ली एखाद्या कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट जाहिर केले जातात तेव्हा त्याला ‘लिमिटेड रिव्ह्यू’ असं म्हणतात. म्हणजे फार खोलात नं जाता वरवर घेतलेला तो लेखाजोखा असतो. तसंच मी आज जेव्हा  काय आणि किती गोष्टी केल्या, किती करायच्या राहून गेल्या, किती गोष्टी पुन्हा करून पुन्:प्रत्ययाचा आनंद घ्यायचा आहे.. याचा एक लिमिटेड रिव्ह्यू घेतला. या प्रवासात माझी आजी , जी माझ्यावर निर्व्याज प्रेम करायची ती मला सोडून गेली. बाबा गेले. त्यांची आज आठवण येत आहे.

माझी शाळा, माझे शिक्षक, सारं काही आठवत आहे. मी केलेल्या नोकऱ्या तिथे आलेले भलेबुरे अनुभव, तिथे भेटलेले अनेक चांगलेवाईट लोक आज आठवत आहेत. तुकोबांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्या आणि नंतर भगवंताच्या अदृश्य हातांनी त्या वर आल्या तशा अनेक हातांनी मला बुडताना सावरलं. श्रीराम गोगटे सर, शाम वहालेकर सर यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं. यांचा मी ऋणी आहे.

जैन धर्मामध्ये एक छान रूढी आहे. वर्षभरात जर कुणाला कळत नकळत दुखावलं असेल तर “मिच्छामी दुक्कडम्” असं म्हणून पर्युषण पर्वात सर्वांची क्षमा मागतात. तसं माझ्याकडून दुखावल्या गेलेल्या सर्वांची मी क्षमा मागून आज दिलगिरी व्यक्त करतो. मनात किल्मिष नं ठेवता पुढे रहायचं आहे. कुणी म्हणेल काय ही गंभीर परिपक्वता ! बापरे, तसं काही नाही. मला अजूनही ‘जेम्स’ च्या अमूक रंगाच्याच गोळ्या हव्यात म्हणून मित्रांबरोबर भांडून एकामेकांची डोकी फोडायची आहेत आणि ‘एकलम् खाजा’ खेळताना मारामाऱ्या करायच्या आहेत.

माझ्या मित्रांबद्दल काय बोलू? ते नाही भेटले तर मी अस्वस्थ होतो. माझी अस्वस्थता वाढली की शैला म्हणते ‘ जाऊन ये एकदा रत्नागिरीला, म्हणजे बरं वाटेल’. असे मित्रं आयुष्यात असणे हे खरं सुख.या मित्रांशी बोलताना कसलाही विचार करावा लागत नाही की त्यांना काय वाटेल हा विचार करून बोलावं लागत नाही. स्वच्छंदपणे हसावं आणि मन मोकळं करावं असे हे माझे मित्रं. यांच्याबरोबर अजून खूप वेळ रहायचं आहे.

काय होतो मी? कोण होतो? कधीही कुठलीही गोष्ट मी ठरवून केली नाही. प्रवाहाचा अंदाज घेत नवी साहसं करत गेलो आणि इथवर पोहोचलो. कुठल्याही गोष्टीवर जास्त विचार करत नं बसता झट्कन निर्णय घेत आलो. जे केलं ते समरसून केलं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत आलो. मनापासून मनासारखं सर्व काही केलं. या प्रवासात ज्यांनी मला सावरलं, साथ दिली त्या सर्वांचे आभार. आभाळाइतक्या चुका करत आलो तरी मला समजून घेऊन सावरणाऱ्या सहचारिणी शैलाचे आभार मी कसे मानू? सोनपावलांनी येऊन माझं आयुष्य उजळून टाकलेल्या ऐश्वर्या आणि ईशान यांचाही मी ऋणी आहे. त्यांना मी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही ही खंत मनात कायम आहे. चार वर्षांपूर्वी जो आला आणि सगळं घर आपलं ज्याने करून टाकलं तो माझा लाडका बोका लिओ, याचे  अनंत उपकार आहेत.जवळ आला की सगळा स्ट्रेस क्षणार्धात निघून जातो. अवघ्या तीन महिन्यांची माझी मनीमाऊ कुकी,जवळ येते आणि मनसोक्त ओरबाडून लांब पळून जाते. यांच्याबरोबर अजून खूप वेळ रहायचं आहे.

संतसज्जन काही म्हणोत पण माझी जीवनासक्ती काही कमी झालेली नाही. गाणी ऐकताना, प्रवास करताना, मित्रांमध्ये रमताना, समुद्रावर फिरताना सतत मला माझ्यातल्या अपुरेपणाची जाणीव होत असते. संगीत, कला, साहित्य, जीवलगांचा सहवास, निसर्ग इतकं भरभरून देत असताना मी मात्रं ते दान पदरात पूर्णपणे साठवू शकत नाही हे माझं करंटेपण.  आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे क्षण इथेच गोठून जायला हवेत आणि हा आनंद असाच दीर्घकाळ मिळत रहावा असं वाटत असतं. तृणबिंदूकेश्वराला प्रदक्षिणा घालताना घुमटीच्या मागे वरच्या कौलांवरून आत आलेले  तिरपे कवडसे मी नेहमी पहायचो आणि हरखून जायचो. अंधाऱ्या प्रदक्षिणा मार्गावर ते खूप सुंदर दिसत.ते कवडसे मी पकडायचा प्रयत्न करायचो.

अनेक आठवणींचे असे कवडसे माझ्या मनात आज पन्नाशी आल्यावर उजळले आणि जाणवलं की अजून किती गोष्टी करायच्या राहिल्या आहेत आणि त्यासाठी हा एकच जन्म पुरेसा नाही.

अजून खूप जन्म जगणे बाकी आहे !

//केदार//

Posted In ,