माझं आजचं स्टेटस्

By

मी लहान होतो तेव्हा आमच्याकडे एक आवडीआज्जी होत्या. त्या काम करताना सतत स्वतःशी काहीतरी पुटपुटत असायच्या. जवळून गेल्या तरी त्या काय बडबडत आहेत हे समजायचे नाही. अस्पष्ट असे काहीतरी ऐकू यायचे. मला त्यांच्या ते तसं स्वतःशीच बोलण्याचं नेहमी नवल वाटायचं.

कालांतराने हळूहळू आवडीआज्जी विस्मृतीत गेल्या. बरीच स्थित्यंतरे घडून आली….हातात मोबाईल फोन नावाचा एक दैत्य आला….त्यात whatsapp नावाचा एक असूर आला…. त्यात status नावाचा एक प्रकार आला … आणि आवडीआज्जींचं ते असंबध्द पुटपुटणं मला लख्खपणे पुन्हा आठवू लागलं.

मी अचंबीत झालो. च्यायला, भारीच ! कायपण स्टेटसला ठेवा, ते चोवीस तासात गायब होणार, मग तुम्ही पुन्हा एखादं नवं स्टेटस ठेवा, पुन्हा ते चोवीस तासांत गायब होणार.मी इतरांची स्टेटस पाहू लागलो. कुणी उगवता सूर्य ठेवून रोज नवं good Morning करू लागला तर कुणी चंद्र ताऱ्यांना कामाला लावू लागला. जसे वार बदलतील तसे मारूती, गणपती, दत्त, शंकर, देवी हे प्रकट होऊ लागले. शुभ सकाळ बरोबर हॅपी दुपार होऊ लागली. संध्याकाळी चहाचे कप आणि बरोबर टोस्ट खारी दिसू लागली. दुपट्यातली बाळं , सूर्यफूलं, गुलाब , बासरी वाजवणारा कृष्ण यांचं उदंड पीक आलं. कुणी कुठे ट्रीपला गेल्याचे फोटो ठेवू लागलं. संक्रात, हळदीकुंकू, दसरा दिवाळी हे सण म्हणजे स्टेटसला फोटो ठेवण्यासाठी पर्वणीच. गुढी पाडव्याला तर बिफोर आणि आफ्टर टाईप आडवी गुढी आणि नंतर उभारलेली गुढी यांचे फोटो दिसू लागले. जीवन किती सुंदर आहे हे ही स्टेटस् पाहिल्यामुळे कळले नाहीतर वांधे झाले असते. कुणी आपल्या व्यवसायाची जाहिरात रोज स्टेटस वर टाकू लागले तर कुणी प्री वेडींग फोटोशूट ठेवू लागले. चार ओळी र ला ट खरडून टाकणाऱ्या शीघ्रकवींचं तर अमाप पीक आलं. रोज आपापले मानलेले स्वामी, बाबा, बापू, अण्णा, नाना इ गुरूंचे श्लोक आपलं स्टेटस म्हणून ठेवू लागले. सव्वीस जानेवारी ला देशभक्ती स्टेटसवर उतू जाउ लागली. गुलजार, वपु यांची स्टेटस तर लाखांनी दिसू लागली. अधूनमधून साहीर, जावेद, अमृता प्रीतम यांच्या चार ओळी टाकून कुणी आपण लईभारी साहीत्यप्रेमी आहोत हे दाखवू लागले. काहीजण तर असं तत्वज्ञान देतात की बस्स. कुणाच्या स्टेटसमधून जग किती तुच्छ आहे हे दिसतं. जाम, अंजाम, फितरत, उलफत, नफरत इ शब्द वारंवार दिसू लागले.

मी लहान होतो तेव्हा एखादी नवी वस्तू घेतली, नवा शर्ट, चप्पल, कंपासपेटी जरी घेतली की दिसेल त्या सगळ्यांना जोरात ‘रामराम’ असं म्हणून नवी वस्तू घेतली हे सांगायचो. माझे सर्व मित्रही असंच करायचे. असं केल्याने एखादी वस्तू नवी घेतल्याचं इतरांना सांगणं आणि मग त्याबद्दल त्या वस्तूचं आणि पर्यायाने स्वतःचं कौतुक करून घेणं हा उद्देश असायचा. मग त्या वस्तूबद्दल चर्चा सुरू व्हायची. आता लक्षात येत आहे की प्रत्येकाला validation ची गरज असते. भरजरी शालू नेसला आणि कुणी ढूंकूनही पाहिलं नाही तर काय उपयोग ? नवी गाडी घेतली आणि कुणीही कौतुक नाही केलं तर काय उपयोग ? Positive stroke म्हणजे कौतुकाची पाठीवर थाप ही प्रत्येकाची मानसिक गरज असते. आपल्या पिढीचं लहानपण हे प्रचंड मानसिक दबावाखाली गेलेलं आहे. आपल्या लहानपणी आपण घरी, शाळेत, बाहेर समाजात सतत आपण ‘लहान’ आहोत आणि लहानासारखंच वागलं पाहिजे या धाकात असायचो. त्यामुळे आजकालच्या मुलांना जसं वैचारिक स्वातंत्र्य असतं तसं आपल्यावेळी नसायचं. आणि म्हणूनच माझ्या मते मी वर म्हटल्याप्रमाणे वेगवेगळी स्टेटस् टाकणारी ही आपलीच पिढी प्रामुख्याने आहे.

आताची पिढी instagram वापरणारी आहे. कुणाला कसे मेसेज पाठवायचे आणि कसा अचूक आणि थेट संवाद साधायचा हे माहिती असणारी आहे. या मिलेनियल्सच्या दृष्टीने फेसबुक आणि whatsapp वापरणं म्हणजे जुनाटपणा झालाय.

या स्टेटसमुळे अनेक गोष्टी नव्याने समजून आल्या. एकाच दिवशी अनेक स्टेटस टाकणारे महाभाग असे आहेत की यांच्या एका स्टेटसचा दुसऱ्या स्टेटसशी काही संबध नसतो. म्हणजे एका स्टेटसला मिर्झा गालिबची शायरी ठेवतील तर पुढच्या स्टेटसला आमच्या घरी केलेले उकडीचे मोदक ठेवतील. काहीजणांकडे जर दोन मोबाईल नंबर असतील तर दोन्ही नंबरवरून एकच स्टेटस् ठेवतील. हे राम ! ह्रदयभंगी लोकांची तर कथाच वेगळी. दुःखद शेरोशायरी तर दुसरी मिळेपर्यंत रोज यांच्या स्टेटसला दिसेल. काहीजण आपण किती इनोदी हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न काहीतरी फालतू इनोदी स्टेटस ठेवून करतात. कीव येते या सर्वांची. आपण किती आनंदी आहोत, आपण किती बेफिकीर आहेत, आपलं कसं लई भारी चाललंय हे दाखवण्याच्या या केविलवाण्या प्रयत्नात त्यांना हे ही कळत नसतं की माणूस समजायला कठीण असतो तो या स्टेटसच्या तीस सेकंदांवरून कसा समजू शकेल? माय डियर माय डार्लिंग म्हणून नवराबायकोच्या जोड्या स्टेटसवर टाकून सुखी वैवाहिक जीवनाची जाहिरात का करायची ? Validation साठी ? कौतुकासाठी ? कुणाला जळवण्यासाठी ? कुणाचा मत्सर जागृत करण्यासाठी ? की ज्यांच्याबरोबर अबोला धरला आहे त्यांच्यापर्यंत आपल्या मनातल्या भावना पोहोचवण्यासाठी ?

जीव मनीचा मनी तळमळे
वाटे बंधन करूनी मोकळे
पळत निघावे तुझ्याजवळ पळे
परि काय करू? उरी धडधडते

असं म्हणणाऱ्या भा रा तांबे यांच्या कवितेमधल्या नववधूचे हळवे कोमल विचार किती सुंदर आहेत ? ते या क्षणोक्षणी स्टेटस ठेवून आपल्या भावनांचा निचरा करू पहाणाऱ्या या ‘स्टेटसपंथी’ लोकांना कळतील तरी का ?

स्टेटस् ठेवणारे हे सुद्धा अनेकदा mind game खेळत असतात. त्यांच्या target audiance ची दिशाभूल करणारी स्टेटस् ठेवत असतात. आपलं स्टेटस् पाहून कुणीतरी अस्वस्थ व्हावं या उद्देशाने ते ठराविक स्टेटस् जाणूनबुजून पेरत असतात. हे सर्व पहाताना वाटतं या सर्व लोकांकडे किती वेळ आहे या गोष्टींसाठी !!

मी लहान असताना माझ्या आजीबरोबर मुरलीधराच्या मंदीरात जायचो. मी खेळत असायचो आणि आजी बाजूला कट्टयावर बसून तिच्या मैत्रीणीशी गप्पा मारत बसायची. त्यांच्या गप्पा काहीवेळा इतक्या रंगून जायच्या की माझा खेळ संपला तरी आजीच्या गप्पा संपत नसत.आता लक्षात येतंय की तेव्हा ठराविक वेळच भेटता यायचं. माणूस हा माणसासाठी आसुसलेला असायचा. कुणी कुणाकडे भेटायला गेलं की ‘याऽऽ’ असं मनभरून स्वागत केलं जायचं. गप्पागोष्टी हास्यविनोद यांबरोबर चहाची आवर्तने व्हायची. निरोपाच्या वेळी ‘आता तुम्ही आमच्याकडे या आणि वेळ काढून या’ असे संवाद व्हायचे. आणि म्हणून आजूबाजूला कुणी नसताना संवादाला भुकेला माणूस स्वतःशीच संवाद साधायचा….आमच्या आवडी आज्जींसारखा !!

आपल्या आधीची पिढी की ज्यांच्या नजरेच्या धाकात आपण वाढलो, आपली अशी पिढी की ज्यांनी मोबाईल नव्हते ते दिवस ही पाहिले आणि मोबाईलचे दिवस ही पहातोय आणि पुढची पिढी की जी हातात मोबाईल धरूनच जन्माला आली यांची तुलना केली की भय वाटतं. माणूस तोच राहिला तरी भावनांचे प्रकटीकरण बदलत गेलं आणि याच बदलाचं स्टेटस होत गेलं. ‘एक होता काऊ आणि एक होती चिऊ’मधले काऊचिऊ सुध्दा आता हताशपणे आपल्या स्टेटसमध्येच कधीतरी दिसतात.

माझं आजचं स्टेटस असं ठेवू का ? – कालाय तस्मैः नमः

या माझ्या लिखाणावर माझा मित्रं श्री शुभेष पटवर्धन याच्या सौभाग्यवती वैशाली वहिनींनी अतिशय छान अभिप्राय दिला आहे. तो पुढीलप्रमाणे –

स्टेटस चा लेख वाचला आणि मन भुतकाळातल्या आठवणींमधे रमलं. पूर्वी लहानपणी आम्ही एका मोठ्या घराच्या पुढच्या पडवी मध्ये दोन खोल्यांमध्ये बिऱ्हाडानं राहत होतो. तेव्हा फोन नव्हतेच. पत्र व्यवहारानं सगळं चालायचं. आमच्याकडे आठ दिवसांनी सात-आठ माणसं येणार होती. घर मालकांसह आजूबाजूच्या सगळ्यांना लगेच खबर मिळाली. दोन दिवसात बातमी गावभर झाली. आमच्या पाहुण्यांच्या स्वागताला सगळं गावच सज्ज झालं. घर मालकांनी माळ्यावरची दोन पिंप काढून आणून दिली आणि म्हणाले दहा माणसात पाणी जास्त लागेल. पिंप राहू देत तुमच्याकडेच पाहुणे आहेत तोपर्यंत. शेजारच्या घरातून दोन चार मोठ्या पातेल्या घेऊन काकू आल्या.कोणी चार-पाच गोधड्या आणून दिल्या. कोणी शेतातली टोपलीभर भाजी आणून दिली. कोणी जास्तीचं दूध आमच्याकडे आहे असं सांगून गेलं. संध्याकाळी चार बायका गहू तांदूळ निवडायला येऊन बसू लागल्या. घरातल्या आजोबांनी बाबांना हक्काने सांगितलं की पाहुण्यातला पुरुषवर्ग ओटीवर झोपेल आणि महिला वर्ग माजघरात .जागेची काळजी करू नका. देणाऱ्याला आपण देतोय याचा मोठेपणा नाही आणि घेणाऱ्यालाही आपण घेतोय याचा कमीपणा नाही .सगळाच आनंद सोहळा .सगळा निर्व्याज निरागस मामला……..
आपल्या पिढीने हे वातावरण अनुभवलंय आणि नव्या बदलांचाही आपण सहज स्वीकार केलाय. मोबाईल मुळे तर सगळं जगच आपल्या हातात आल्यासारखं झालंय. फेसबुक व्हाट्सअॅप,इंस्टाग्राम इत्यादींमधेही आपण गुंतले गेलोय.काळाच्याओघातआपणही सेल्फ कंटेन्ड जगात नकळत ढकलले गेलोय. दीड फुटाच्या गॅलरीतून दिसणार आपलं आकाशही काहीसं संकुचित झालंय. माध्यमांच्या आभासी दुनियेत वावरताना पूर्वीची निर्व्याज सहजता आपण विसरून बसलोय.जगण्याच्या धावपळीमध्ये एकमेकांना द्यायला पुरेसा वेळच मिळत नाहीये. आपल्या पलीकडच्या बिल्डिंगमध्ये कोण कोण राहतात याचा आपल्याला पत्ताही नाहीये.
परंतु आपण पूर्वीची कळप करून राहण्याची मूळ प्रवृत्ती अजून मनातून विसरलो नाही. म्हणूनच बहुतेक आपण व्हाट्सअप ,फेसबुक इत्यादीवर ग्रुप करून राहतो आणि सगळ्यांशी टच मध्ये रहायचा प्रयत्न करतो. आज काय या ग्रुपची पिकनिक, उद्या काय त्या ग्रुपची पिकनिक .यामध्ये एकत्र येऊन आनंद घेत असताना त्यामधल्या दुःखद तोट्यांनाही सामोरे जातो.एकाचं दुसऱ्याशी जमत नाही आणि तिसऱ्याचं चौथ्याशी जमत नाही. मग आपण संशयकल्लोळ , मानापमान अशी नाटकं रंगवतो. व्हाट्सअप स्टेटस म्हणजे परस्परांना टोमणे मारण्याचा एक मोठा प्लॅटफॉर्मच आहे असं मला वाटतं. कोणाच्यातरी स्टेटसला वीस पंचवीस जणांच्या ग्रुप मध्ये कुठेतरी कोपऱ्यात, रंगवलेल्या चेहऱ्याचे आपणच आपल्याला दिसतो. फोटो 24 तासात विरून जातो आणि मनाच्या कोपऱ्यात आपणच आपला रंगवलेल्या मुखड्याच्या मागचा खरा चेहरा शोधत बसतो………सौ वैशाली शुभेष पटवर्धन

Posted In ,