FAUDA – एक लोच्या

By

आपल्या हिंदी आणि मराठी सिरियल्सवर जो काही भंपकपणा चालतो त्यामुळे एकही सिरिअल पहावी वाटत नाही. तूपकट चेहऱ्याची कॅरॅक्टर्स, भयानक बॅकग्राउंड म्युझिक आणि एखादा डायलॉग कुणी मारला की प्रत्येकाच्या चेहऱ्याचे क्लोजअप्स कोण पहात बसणार ? सासू, सून, आपापसातली लफडी यांच्यापुढे यांचे विषय जात नाहीत. सिनेमाही तसेच. तरी हल्लीचा ‘वाळवी’ सिनेमा मात्रं जबरदस्त होता. शेवटच्या दहा सेकंदात अख्खा सिनेमा फिरवला आहे. तसेच एलिझाबेथ एकादशी, शाळा, निशाणी डावा अंगठा हे पण मला आवडले होते. एकदम नवीन कंटेंट असलेले होते. मी तसाही सिनेमा पहायला तीन तास थिएटरमध्ये जात नाही आणि अगदीच गेलो तर त्या गारेगार सीटमध्ये मला लगेच झोप येते. तिथे डॉल्बीच्या बॅकग्राउंडवर मी घोरायला लागतो.

या सगळ्याला अपवाद अशी एक वेब सिरिज मी नुकतीच पाहिली आणि माझी झोप उडाली. नेटफ्लिक्सवरची ‘फाउदा’.

‘फाउदा’ हा एक अरबी शब्द, ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो ‘chaos’ म्हणजेच मराठीत ‘सत्यानाश, गोंधळ’ किंवा अगदीच जवळचा शब्द म्हणजे ‘लोच्या’. अठ्ठेचाळीस एपिसोडस् ची ही मालिका. प्रत्येक भाग हिचा उत्कंठावर्धक आहे.

इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधला संघर्ष आणि या पार्श्वभूमीवर घडणारे नाट्यमय प्रसंग पहाताना थरकाप होतो. काही प्रसंग सत्यघटनेवर तर काही काल्पनिक आहेत पण या दोन्ही देशांतलं वातावरण, तिथलं जनजीवन, तिथली राजकीय परिस्थिती पाहताना वाटतं आपण किती सुखी आहोत. तिथे साधी डोअरबेल वाजली तरी घरातला माणूस हातात बंदूक घेऊन दार उघडत असतो इतकी असुरक्षितता तिथे आहे.

मला इस्राएलची मोसाद ही गुप्तहेर संघटना भयंकर आवडते. त्यांचे स्टंटस्, त्यांनी केलेली अनेक मिशन्स यांचा मी फॅन आहे. तसंच त्यांच्या SHIN BET, IDF या एजन्सीजबद्द्ल मी भरभरून वाचत असतो. इस्राएलच्या आजूबाजूचे इजिप्त,जॉर्डन, लेबनॉन, सिरिया आणि पॅलेस्टाईन हे देश आणि तिथलं राजकिय वातावरण हे फार भयानक आहे. गाझा पट्टी आणि वेस्ट बॅंक इथला संघर्ष भयानक आहे. बाजारात पिकअप व्हॅनवर एके सत्तेचाळीस घेऊन सैनिक फिरत असतात.

या अशा वातावरणात इस्राएलची मोसाद कशा प्रकारे त्यांच्या मिशन्स पार पाडत असते हे पाहून काळीज गोठून जातं. या मालिकेत काम केलेले सारे कलाकार पहाताना नवीनच वाटतात पण जसजशी सिरिअल पुढे सरकत जाते तसे अधिक जवळचे वाटू लागतात. अतिशय थंड डोक्याचे दहशतवादी कसा अमानुष छळ करतात, काकडी कापावी तशी डोकी कापतात, बोटं तोडतात हे पहाताना जरी ही वेबसिरीज आहे याचं भान असलं तरी अंगावर काटा येतो. हे सर्व सत्यघटनांवर आधारीत असल्याने ज्या कुणाचे असे हाल झाले असतील त्यांचं काय झालं असेल ? हे दहशतवादी इतके निगरगट्ट दाखवले आहेत की चौकशी सुरू असताना ते प्रश्नकर्त्याच्या तोंडावर थुंकताना दाखवले आहेत.

जरी चोहीकडून अरब देशांनी घेरलं असलं तरी इस्राएल या सगळ्यांना जबरदस्त प्रतिकार करतो आहे. तिथे प्रत्येकाला मिलिटरी प्रशिक्षण सक्तीचं आहे. तिथला प्रत्येकजण हा फायटरच असतो. या मालिकेतही असे जॉन्बाज दाखवले आहेत. कुठे कपड्यांचा तामझाम नाही की दागिन्यांचं प्रदर्शन नाही. नाटकी डायलॉगबाजी नाही की बंगल्यांचा राजेशाही थाट नाही. यातला हिरो डोरॉन हा तर सबंध सेरीजमध्ये टीशर्टवरच असतो. डोरॉनचं काम केलेल्या लिऑन राझ याचा मी फॅन झालो आहे.

आपल्याला कल्पनाही नाही असं एक समांतर जग असं आहे की जिथे साहित्य, संस्कृती,कला, संगीत, सामाजिक जाणिवा, शेजारधर्म इ संकल्पना अस्तित्वातच नाहीत, जिथे खून, बॉम्बस्फोट याशिवाय जगता येतं यावर विश्वास नसणारी माणसं रहात आहेत, जिथे मूल रांगायला लागलं की त्याच्या हातात आधी बंदूक देतात, जिथे बाहेरच्या जगापेक्षा तुरूंग हा सुरक्षित समजला जातो अशा एका समांतर विश्वाचं दर्शन घडवणारी ही Political Thriller प्रत्येकाने आवर्जून पहावी.

What next ? MONEY HEIST 😎

Posted In ,