रत्नागिरीहून निघताना ते कोकणातलं सौंदर्य, नारळीपोफळीच्या बागा, समुद्राच्या लाटा..मित्रांबरोबरच्या गप्पागोष्टी वगैरे सर्व आठवणी मनात ताज्या असतात….. . रेल्वे स्टेशनवर येतो.. सुंदर समुद्र किनारे मनात असताना लांबलचक प्लॅटफॉर्म समोर दिसतात.. समोर अस्वच्छ रूळ असतात..त्यांमधून बागडणारे उंदीर दिसतात.. ‘माझ्या’ रत्नागिरीत कधी न पाहिलेले असंख्य अनोळखी चेहरे दिसतात.. निवांत फिरणारे कुत्रे दिसतात…प्रत्येक शब्द तोडत जोडत केलेल्या हिंदी अनाउन्समेंट ऐकू येतात… एकतर स्वतःची कार घेऊन यायचं तर कधीही पूर्ण होईल ही शक्यता नसलेलं ते मुंबई गोवा हायवेचं रडतखडत चाललेलं बांधकाम म्हणून रेल्वेने आलेलो असतो, भोगतो मग हे सारं ! त्यात त्या घोंगावणाऱ्या माश्या… दत्त, गणपती आदी देवांना जसे दोनचार एक्स्ट्रा हात असतात तसे आपल्याला पाहिजे होते म्हणजे निदान या माश्यांना तरी दूर ठेवता आलं असतं !!
युरोपातली रशियातली मेट्रो स्टेशन्स आठवतात.. दुबईतली, सिंगापूरमधली स्वच्छ रेल्वे आठवते.. लंडनमधली ट्यूब आठवते.स्वच्छता ही अंगात भिनली तरच ते शक्य असतं.कुणाला कुणी स्वच्छता राखा असं तिथे सांगावं लागत नाही. नेतेमंडळी हातात झाडू घेऊन साफसफाईचा स्टंट करत नाहीत. म्हणून मग तिथे गेलं की आपल्याकडे ओह, इंडियन्स’.. असं म्हणून तुच्छतेचा लूक् का तिथली लोकं देतात ते कळतं. मुंबई गोवा रूटवर तेजस एक्स्प्रेस सुरू झाली तेव्हा पहिल्याच दिवशी प्रवाशांनी त्या सुंदर ट्रेनमधल्या प्रत्येक सीटसमोरच्या मॉनिटर्सची केलेली नासधूस आठवते. आता वंदेभारत सुरू झाली आहे तिच्या नशिबी काय असेल ? मला ती स्वच्छ रत्नागिरी आठवते. पाऊस पडला की रस्त्यावर दोन्ही बाजूंना वहाणाऱ्या स्वच्छ पाण्याचे ओहोळ आणि त्यात उड्या मारणारे आम्ही आठवतो. रत्नागिरीला तेव्हा बकाल व गलिच्छ हे शब्दच माहिती नव्हते. आता तर गर्दीच इतकी झाली आहे की मारूती मंदीरची शान असणाऱ्या तळपती तलवार हातात असणाऱ्या शिवप्रभूंचा पुतळाही मावळ्यांच्या गर्दीत शोधून काढावा लागतो.
अनाउन्समेंट होते.. ट्रेन येते… मी आत जातो..’ कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ असं म्हणतो आणि पुन्हा रत्नागिरीला कधी येता येईल हे विचार मनात आपोआप सुरू होतात !
//केदार//