रात्रीचं जेवण झाल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. विषय घेतला की सुट्टीत कुठे जायचं.. मोठा गहन प्रश्न .. ईशानने दोनचार ऑप्शन दिले.. तो जे काही सर्फिंग करतो त्यावरून एक अचाट पर्याय त्याने दिला.. म्हणाला, बाबा आपण यावेळी क्रोएशियाला जाऊया.. झाग्रेबला. मस्त बीचेस आहेत.. आणि तिथे एक म्युझियम आहे.. मी आपला हं..हं ..करत ऐकत होतो.. काय करणार ? एकतर याला झाग्रेब म्हणजे मारूतीमंदीरहून निघालं की हातखंब्याइतकं जवळ आहे असं वाटत असावं आणि दुसरं म्हणजे लूव्र, रिज्क्स, व्हॅन गॉग, हर्मिटेज, मादाम तुस्साद इत्यादी म्युझियम्स पाहून झाल्यावर आता परदेशात जाऊन तिथे वेळ दवडणं हा विचारही करावा असं वाटत नव्हतं. हो ते हनिकेन म्युझियम मात्रं खूप भारी होतं..!त्यामुळे चिरंजीवांचं म्हणणं फक्त ऐकून हो, हो ..असं म्हणत होतो..तितक्यात तो म्हणाला.. बाबा अरे ते कसलं म्युझियम आहे माहिती आहे का..? ते आहे.. ‘Museum of broken relationships‘ .. मी उडालोच.. काssय ?
ईशान निघून गेला.. मी कामाला लागलो.. भराभरा संदर्भ उपसायला लागलो…
ओलिन्का आणि ड्रॅझेन.. चार वर्ष आकंठ प्रेमात बुडालेले होते.. एक दिवस त्यांना साक्षात्कार होतो की बॉस, अपनी नही जमेगी.. आणि ते वेगळं व्हायचं ठरवतात.. जेव्हा नातं होतं तेव्हा एकामेकांना अनेक भेटवस्तू दिलेल्या होत्या.. प्रत्येक वस्तूला गहिरे संदर्भ होते.. स्पर्शाचे, अश्रुंचे, संवादांसकट प्रत्येक वस्तू त्या त्या क्षणांची आठवण करून देत होती.. मग याचं करायचं काय.. मग ते दोघेही म्हणाले आपण याचं म्युझियम बनवूया.. ( नातं तोडल्यावर एकामेकांना ब्लॉक वगैरे केलं नसावं) .. ही घटना 2003 मधली. मग त्यांनी अशाच समदुःखी भग्न ह्रदयांना अवाहन केलं.. की तुमचंही नातं तुटलं असेल तर तुमच्याकडच्या वस्तू आम्हाला द्या.. आणि वस्तू देताना प्रत्येक वस्तूचे संदर्भ लिहून द्या.. नावागावाची गोपनियता पाळली जाईल… इतकं नुसतं जाहीर झाल्यावर यांचं म्युझियम तुडूंब भरून गेलं… देशोदेशीच्या प्रेमिकांनी आपापल्या वस्तू इथे जमा केल्या.. ते लवकरच एक टुरिस्ट लोकांचं आकर्षण झालं.. आणि हे सारं कधीपासून , तर 2006 मध्ये ते खुलं झालं. लॉस एंजलिस मध्येही असं अजून एक म्युझियम सुरू झालं.
मला आठवतंय.. काही वर्षांपूर्वी रविंद्र मंकणींनी बालगंधर्वमध्ये मराठीतील प्रेमपत्रांचं प्रदर्शन भरवलं होतं.. कविता..फोटो..ही प्रदर्शनं उदंड असतात..पण प्रेमपत्रांचं आणि ते ही हस्तलिखीत स्वरूपातलं.. ती प्रेमपत्रं वाचताना तिथे काही वाचकांना अक्षरशः ढसाढसा रडताना मी पाहिलं होतं..
हा विषयच असा की प्रत्येकजण या विषयाशी चटकन कनेक्ट होतो.. प्रत्येकाच्या मनात आठवणींचे कल्लोळ उठत असतात.. कारण मुक्ता बर्वे म्हणते तसं.. भाषा समजायचीच नसते.. समजायच्या असतात त्या भावना.. आणि कितीही झालं तरी प्रत्येकजण त्या भावनांशी आतून बांधला गेलेला असतोच की.. प्रत्येक नात्याला सामाजिक पार्श्वभूमी.. भौगोलिक बंधनं.. यांचं परिमाण असतं.. जेव्हा एखादं नातं तुटतं.. तेव्हा ‘आकांत माझ्या मनी केवढा’ अशी परिस्थिती दोघांचीही झालेली असते… एकामेकांसाठी जीव द्यायची तयारी असताना वितुष्ट येतं.. मनं दुभंगतात.. मग एखाद्या वळणावर दिलेलं चॉकलेट .. एकच मोगरा.. या वस्तू छळ करू लागतात.. परंतू त्याच वेळी दोघाचाही अहंकार इरेला पेटून उठलेला असतो.. दाखवतोच आता तुझ्याशिवाय जगून.. असं म्हणून वेगवेगळे मुखवटे घेतले जातात.. आतून आक्रोश सुरुच असतो..
काळ हा कुणासाठी थांबत नसतो.सर्व काही ठीक होतं. जखमा भरून निघतात. आपली आपल्याला एक नवी ओळख झालेली असते. हे पौर्णिमेचे चंद्र, समुद्राच्या लाटा, फुलं, वळणावरच्या टपरीतला चहा.. हे ‘अरेच्चा अजून तस्संच आहे की’.. तलत रफी यांच्या गाण्यांमधला दर्द अजून तस्साच आहे की.. हे जाणवतं..लॉंग ड्राईव्हला गेलं की बोगद्यातली दिव्यांची माळ तसंच ग्रेट फिल करवत असते.. रस्त्याच्या कडेला गाडीवरचा बूर्जीपाव तितकाच यम्मी असतो.. मग हे सारं होतं काय.. ? मानसिक दुबळेपण आलेले .. हिप्नोटाईज झालेले ते दिवस आणि त्या दिवसातले आपण.. लाचार.. केविलवाणे , पण गम्मत अशी त्या त्या वेळी ती मानसिक लाचारी जाणवत नसायची.. हे आता जाणवतं.. आणि अजूनच स्वतःचा राग येऊ लागतो.. कुणाचं कुणाहीवाचून टिंबसुद्धा अडत नसतं हेच खरं.
झाग्रेबमधलं हे म्युझियम.. अफलातून कन्सेप्ट.. माडगूळकरांचे शब्द आठवले.. जग हे बंदीशाला.
जगाच्या पाठीवर कुठेही जा.. मनोव्यापार आणि भावना.. त्याच.. तशाच..आणि तितक्याच उत्कट.
//केदार//