कातरवेळ ….!!

By

कातरवेळ ही अपरिहार्यपणे येतच असते. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी ती येतेच.त्या वेळी आतून खोल जखमांच्या दबलेल्या वेदना उफाळून येतात.गंध, स्पर्श, सूर , स्थळ, काळ हे सगळे धागे डोळ्यांतून झरझर वाहू लागतात.स्वतः ठीक असल्याचं वरकरणी आणलेलं अवसान गळून पडतं. मन सांगत असतं की नाही तू ठीक. भावनांचे आवेग वाढू लागतात. विचारांचे ढग अजून गडद होत जातात.

मनाच्या न्यायालयाचे दरवाजे अवेळी उघडले जातात. आरोपी.. फिर्यादी.. मिलॉर्ड.. वकील.. सर्व भूमिका आपणच वठवत जातो. लखोबा लोखंडे भूमिका बदलतो त्यापेक्षा भराभर भूमिका आपलंच मन बदलत जातं.

भान हरपतं.. तंद्री लागते..कातरवेळेने डाव साधलेला असतो..! पूरिया धनश्री किंवा मारवा चे आर्त सूर ऐकू येतात. गडाचे दरवाजे बंद झाले तरी धडका मारून त्सुनामीसारखी कातरवेळ मनामध्ये घुसलेली असते. कुणीतरी विचारतं, काय झालं ?’ कुठे काय, काही नाही’असं म्हणून पटकन हातरूमाल पुन्हा खिशात टाकलेला असतो. या वेळी साहिर मदतीला येतो. रोशन साहेबांचं संगीत मदतीला येतं.

नीत नीत जागे ना, सोलह सिंगार
झांझर झन झनन, नीत ना बुलाये
काहे जियरा तरसाये, काहे तरसाये जियरा

नीत नीत आये ना, तन पे निखार
पवन मन कमल नीत ना खिलाये
काहे जियरा तरसाये, काहे तरसाये जियरा

नीत नीत बरसे ना, रस की फुहार
सपन जल गगन नीत ना लुटाये
काहे जियरा तरसाये, काहे तरसाये जियरा

साहिर हा बाप माणूस आहे .. पौर्णिमेच्या रात्री समुद्राला उधाणाची भरती येऊन पाणी चमचमतं.. फेसाळतं.. तशी साहिरची प्रतिभा पाहून मन आनंदी होतं.

कातरवेळेने जरी डाव साधलेला असला तरी त्या जखमा बंदिस्त झालेल्या असतात.

पुन्हा कधीतरी नेमकी वेळ साधून असाच आणि अचूक घाव घालण्यासाठी.

//केदार//

Posted In ,