मित्राच्या गावाला गेलो होतो. प्रथेप्रमाणे ग्रामदैवताचं दर्शन घ्यायला गेलो. यथासांग दर्शन झाल्यावर देवळाच्या कट्ट्यावर क्षणभर टेकून निघालो. कोकणातलं देउळ, गर्द झाडी, थंड हवा आणि मिट्ट काळोख असं एकजीव आणि प्रसन्न वातावरण होउन गेलं होतं. देवळापासून गाडी थोडी लांब आवाराबाहेर लावली होती. पायाखाली कच्चा खडबडीत रस्ता. बूट घातले होते तरी पायाला दगड जाणवत होते. देवासमोर गाऱ्हाणं घालणारे गुरव आमच्या पुढे चालत होते आणि आम्हाला दिसावं म्हणून विजेरी दाखवत होते. खाली बघत चालताना लक्षात आलं की त्या गुरवांनी पायात काहीच घातलं नव्हतं आणि तरीही आरामात त्या दगडगोट्यांवरुन ते चालत होते.
मी विचारलं, ‘का हो पायात काही घातलं का नाही ? दगड टोचत नाहीत’ ? त्यावर ते म्हणाले, ‘अहो मुद्दामच नाही काही घालत पायात, कारण काय आहे की सारखं कुठे ना कुठे जावं लागतं, कुठे जास्त वेळ बसायला उसंत नसते, मग सारखं ते चपला घालत काढत कोण बसणार ? बरं दुसरं म्हणजे पायाला हे असे दगड गोटे टोचले की कसं आपलं शरीर तंदुरूस्त रहातं, आणि तुमच्या शहरात कसं ते डायबेटिस वगैरे असतं त्या भानगडी होत नाहीत आणि अहो, आता इतकी वर्ष इथे राहून हा रस्ता आणि हे दगड , सगळं एकदम ओळखीचं झालं आहे. त्यामुळे नकोच ती चपलांची कटकट, काय बरोबर ना? आणि याचा अजून एक फायदा असा की ठेच लागायचं टेन्शन नसतं कारण सगळे दगड नेहमीचे आणि ओळखीचे. काय बरोबर ना ?’ असं म्हणून ते हसले.
खाली बघून चालताना पायात बूट असूनही माझी तारांबळ होत होती आणि वर हे अजब तर्कट ऐकायला मिळत होतं. अंतु बर्वा आठवला. त्यात पुलंनी म्हटलेलं .. “जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली आहेत देव जाणे. त्यांतली निम्म्याहून अधिक माणसे मनीऑर्डरवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच.”
गाडीपर्यंत पोहोचेतोवर एकदा तरी अडखळलोच तेव्हा गुरवबुवा म्हणाले, ” संभाळून हो, बघा; पटलं ना मी काय म्हणालो ते ?”
//केदार//
ता.क. : मागच्याच महिन्यात मी नाईके चे मर्क्युरीयल शूज घेतले..एकदम लेटेस्ट अरायव्हल.