रत्नागिरीला येताना वंदेभारत ने अलगद येतो. पनवेलला आत बसल्यावर जरा कुठे एक हलकी नॅप घेईपर्यंत चक्क खेड येतं. चहा वगैरे घेऊन तरतरी येते आणि बघता बघता रत्नागिरी कधी येते ते कळतही नाही. फ्लाईटमध्ये बसल्याचं सुखं मिळतं. हा मुंबई गोवा हायवे पुढच्या दहा वर्षात काही होणार नाही. तोवर कार घेऊन रत्नागिरीला जाण्याचा विचारही करू शकत नाही. आणि जरी आलो तरी ते पूर्वीचं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या झाडांच्या थंड हिरव्या कमानीखालून जाण्याचं सुखं तर संपलच आता. त्यामुळे वंदेभारत हा एक सुकून लाभला आहे या प्रवासासाठी !
मागच्या खेपेला झालं काय रविवारी नेमकी वंदेभारत नव्हती. मी शक्यतो येताना राजधानी किंवा तेजस घेतो पण यावेळी सगळ्या ट्रेन पाहिल्या आणि दुपारच्या मांडवी एक्सप्रेसचं तिकिट मिळालं. प्रथेप्रमाणे मांडवी पाऊण तास लेट आली. दुपारच्या उन्हाचा ताव असल्याने हाशहुश करत आत बसलो. सुदैवाने आतमध्ये एसीचा थंडावा होता. छान बर्थ मिळाला होता. स्वच्छ चादर होती ती ओढली आणि म्हटलं चला निवांत झोप काढायला हरकत नाही.
मला हरकत नव्हती पण माझ्या झोप काढण्याला ट्रेनमधल्या पॅंट्रीकारच्या विक्रेत्यांना मात्र हरकत होती.
वडापाव सामोसापाव कांदा भजी मेथीभजी सॅंडविच ऑम्लेटपाव कटलेट गुलाबजाम दहीवडा फ्रूटसॅलड कटफ्रूटस्
बिर्याणी व्हेज बिर्याणी चिकन चिकन लॉलीपॉप लोणावळा चिक्की बिस्कीटस् गोळ्या जीरा मसाला चहा कॉफी टोमॅटो सूप पाणी कोल्ड्रींक्स उपमा शिरा पोहे इडलीसांबार वडा सांबार डोसा
हा कुठल्या हॉटेल चा मेन्यू नाही. रत्नागिरीहून दुपारी सुटणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये हे सर्व पदार्थ मिळतात हे मला तेव्हा कळलं. काही नाही मिळत असं नाही. आणि हे सर्व पदार्थ घेऊन मिनिटा मिनिटाला कोकलत ते विक्रेते सतत ये जा करत होते. . जरा कुठे डोळा लागू दिला नाही. गंमत म्हणजे हे सर्व पदार्थ त्या ट्रेनमध्ये विकले जात होते. वडापावचा तर दर मिनिटाला एक घाणा निघत असावा कारण त्या एसीच्या बंद डब्यातून हा राष्ट्रीय पदार्थ नेत असताना ते जाणवत होतं. एक बाई तर टोपलीतून काकडी विकत होती. दे म्हटलं की भराभरा काकडीची सालं काढून काकडीच्या चिरफळ्या करून त्यावर तिखटमीठ लावून विकत होती. एकजण केळी संत्री वगैरे विकत होता.
कुठे वंदे भारत आणि कुठे मांडवी एक्स्प्रेस ?
झोपमोड झाली. चीड आली. कोकलणाऱ्या त्या विक्रेत्याला विचारावं वाटलं ‘ उकडलेला हत्ती मिळतो का रे मांडवी एक्स्प्रेसमध्ये ?’
कुणी सांगावं ? उद्या तो ही मिळेल.
//केदार//