रत्नागिरीची थंड सकाळ. सुट्टीचा निवांतपणा. चार जवळचे मित्र.. समोर लालभडक मिसळ. ते अन्नब्रम्ह नसानसांत उतरत असताना.. हास्यविनोद सुरू असताना . एकदम ती मिसळ इंजेक्शन दिल्यासारखी तोंडात कुठेतरी आत.. खोल .. अशी वेदना देऊ लागली.. काय होतंय तेच कळेना.. जबरदस्त असं काहीतरी जाणवलं.. आणि लक्षात आलं …की गेले काही दिवस ठणकणारा दात.. त्याचा एक मोठा तुकडा मिसळीत पडला होता.. आणि ती तिखट चव त्या तुटक्या दातातून थेट मेंदूत पोहोचली होती..भराभरा उठून आधी तोंड धुतलं. दातांतून कळा येत होत्या.. पण दु:खं या गोष्टीचं होतं की ती मिसळ निदान आज तरी खाता येणार नव्हती. मित्रं शांतपणे आपापल्या समोरची मिसळ खाऊ लागले. अरेरे तुला मिसळ अर्धवटच खाता आली .. असं म्हणून कुणीतरी काळजाला हात घातला.
दात घशात घालीन.. दात कोरून पोट भरणं.. दात विचकायला काय झालं.. दाती तृण धरणं.. इत्यादी वाक्प्रचार सहजपणे आजपर्यंत म्हणत आलो होतो.. पण आज याच दातामुळे प्रचंड वेदना होत होत्या.. मित्रं शांतपणे मिसळ खात होते.. दाताचा टवकाच उडालाय ना.. उगीच बोंबलू नको ती मिसळ थंड होतेय बघ असे विविध सल्ले देऊ लागले.. शेवटी तर माझ्याकडे दुर्लक्षच करून समोरच्या प्लेटमधला ऐवज संपवू लागले.
चाटून पुसून प्लेट साफ केल्यावर मग .. हं बघू बरं का इतका ठणाणा करतोयस .. अशी सहानुभूती .. आणि मग सगळे फिलॉसॉफी मोडवर आले.. वय झालं आता आपलं.. दुधाचे दात पडल्यावर जे दात येतात ते वर जाईपर्यंत असतात.. तुला काय वाटलं परत आता नवा दात येईल ? दात नीट घासत जा रोज.. असं एकजण आपल्या सोन्यासारख्या पिवळ्या दातांमधून म्हणाला.. एकजण म्हणाला , खरंय आपण सकाळी आणि रात्री दोन वेळा तरी दात घासायला हवेत ( हे तत्वज्ञान सांगणारा आणि ऐकणारा – दोघं वय वर्ष बावन्न, प्लीज नोट्) .. एकजण हवेत धूर सोडत मला म्हणाला .. तू बुवा फारच केअरलेस आहेस, साधा दात सांभाळता येत नाही तुला ? ..
खरं सांगतो, लहानपणापासून माझे दात एकदम छान होते.. अगदी कुंदकळ्या वगैरे म्हणतात तसे.. दातांनी अक्रोड सहज फोडायचो.. जाहिरातीत दाखवतात तसा ऊसही तोडून खायचो.. नंतर अगदी बियरच्या बाटलीची बूचं उघडायला शिकलो. लहानपणी एकदा माझ्या आजीच्या हाताला याच दातांनी कडकडून चावलो होतो तेव्हा घड्याळासारखे काळे वळ तिच्या हातावर उठले होते.. पण तरी तिची माझ्यावरची तसूभरही माया कमी झाली नाही हे आठवून आजही जीव गलबलतो.
गेले काही दिवस काही खातापिताना एक हलकी कळ दातातून येत होती पण साला तो ट्रेलर होता हे आज उडालेल्या टवक्याने जाणवून दिलं.. की आज उडालेला टवका हा पुढे होणाऱ्या पडझडीचा ट्रेलर आहे ?.. छे छे.. पेरू म्हणजे माझा जीव की प्राण.. त्यातली बी आता कुठेतरी दातातल्या सांदीकपारीत जाऊन बसते. ती इतकी कठीण असते की तिला आहे त्या जागेवर फोडूनच बाहेर काढायला लागते. बोअरवेलसाठी खणलेल्या खड्डयात कुणी पडल्यावर त्याला बाहेर काढताना होते तशी दमछाक ती पेरुची इवलीशी बी करुन टाकते.उपमा खाताना आता उडीद डाळ दातात अडकून पडते. पोहे खाताना त्यातले शेंगदाण्याचे तुकडे आपला डाव साधतात. बाहेर पडताना आता पेन, रूमाल, मोबाईलबरोबर एक छोटी सेफ्टीपीनही बरोबर येऊ लागली आहे.
आपली मराठी भाषा इतकी सुंदर आहे.. त्यात तालव्य, मूर्धन्य, कंठव्य, ओष्ठ्य आणि दंत्य असे उच्चार आहेत आणि त्या उच्चारांबरहुकूम आपली लिपी आहे.. आता भय या गोष्टीचं आहे की ‘दंत्य’ उच्चारांची आता यापुढे गडबड होणार.. उच्चारांमध्ये हवा मिसळली जाणार.. आणि नक्की समोरच्यांची करमणूक होणार.. त थ द ध न यातलं नक्की मी काय म्हणालो याचा आता ऐकणारे अंदाज बांधत बसतील..
तोंडाचं बोळकं होणे हे आजपर्यंत ऐकून होतो.. पण आता त्या बोळक्याच्या तोंडापर्यंत आपण आलो आहोत हे जाणवलं.. लहानपणी काही खाताना तिखट लागतं म्हणून मिर्चीचे तुकडे वेचून बाजूला काढायचो आता दातात काही अडकू नये म्हणून काळजी घ्यावी लागते.. काय हे ? पुन्हा का नवे दात येत नाहीत ? एवढा छोटासा तर दात..पण साला पडला की दंतकथा बनून जातो..
इकडे मिसळ संपवून परत जाताना एकाने त्याची बत्तीशी उघडून आशिर्वाद दिला..तुझे सगळे दात असे मिसळ खातानाच पडोत..!!
//केदार//