पूना बोर्डिंग .. !!

By

आज बऱ्याच दिवसांनी पुण्यात रहायचा योग आला. दिवस संपला आणि रात्री आता जेवायचं कुठे हा विचार करत असताना एकदम मनात आलं की आज पूना बोर्डींग हाऊसला जाऊया.
पेरूगेट पोलिसचौकी समोर एका बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर हे आहे. तेच ते तसेच ते प्रवेशद्वार..आत तसाच तो अंधारा चौक.. त्याच त्या गंजक्या दुचाकी.. अरूंद जीन्याने वर आलो.. काही फरक नाही… जस्सेच्या तसे सर्व काही..

जसेच्या तसे सर्व काही म्हणायचे कारण की 1991 ते 95 दरम्यान नेहमी मी इथे यायचो.. माझं आवडीचं ठिकाण होतं हे.. वर मोठा हॉल.. पिवळा ऑइल पेंट मारलेला.. बाजूला काउंटर.. समोर छोटी टेबलं. एका टेबलवर चार ताटं.. तशीच रचना…जाऊन बसलो… मोठं चकचकीत स्टीलचं ताट.. त्यात दोन छोट्या वाट्या.. मध्ये कांदा, मीठ आणि लसणीची चटणी… इथे ती ‘आ ला कार्टे’ नावाची भानगड नसते.. जे आहे तेच मिळतं.. मुंबईला कधीतरी गुजराती किंवा राजस्थानी थाळी जेवायला जातो.. तिथे असंच मोठ्ठं ताट असतं आणि त्यात आठ दहा वाट्या मांडलेल्या असतात.. दोन चमचे हातात घेतले की आपण जलतरंग वाजवतोय असं वाटायला लागतं..

इथे त्या दोनपैकी एका वाटीत छान गरम आमटी आणि दुसरीत उसळ.. बाजूला दह्यातली एखादी कोशिंबीर.. एक भाजी.. बाजूला ताकाची मोठी वाटी.. आणि एकामागून एक अशा घडीच्या गरम पोळ्या.. इतकाच आटोपशीर बेत असतो.. इथे चपाती नं म्हणता पोळी म्हणतात, चावल नं म्हणता भात म्हणतात, दाल नं म्हणता आमटी म्हणतात, रायता नं म्हणता कोशिंबीर म्हणतात.. सगळे एका रांगेत बसून मन लावून जेवताना दिसतात…रविवारी सकाळी इथे लाजवाब अळूची भाजी असते..

तर सांगायचं तात्पर्य हे की आज पंचवीस वर्षांनी पुन्हा इथे जेवलो.. आमटीचे भुरके मारले..दोनवेळा भात मागवला.. एक्स्ट्रा पापड मागवला.. नंतर वाटीभर ताकात मीठ घालून त्या वाटीत बोट बुडवून ढवळलं.. शेवटी गाडीच्या काचेवर वायपर जसा फिरतो तसं ताट बोटाने फिरवून फिरवून जेवलो.. जर कुणी पाहिलं असेल तर नक्कीच मी दुष्काळग्रस्त आहे असं त्याला वाटलं असणार आज.

‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ म्हटलं की हात जोडताना जे समोर चित्रं दिसतं ते पूना बोर्डींगला जे जेवण मिळतं तेच असावं बहुतेक.

//केदार//

Posted In ,