आंब्याच्या मोहोराची रेंज… !!

By

आत्ताच रत्नागिरीहून परत आलो.

यावेळी अनेक मंदीरं पहायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे कशेळीचा कनकादित्य, आचऱ्याचा रामेश्वर, धामापूरची भगवती आणि रेवंडी इथलं भद्रकाली ही मंदीरं पाहिली. कोकणातल्या मंदीरांचं वैशिष्ट्य म्हणजे भव्य आवार, लांब ओसऱ्या, पताका लावलेली कडीपाटाची उतरती छपरं, शांत गाभारा, थंड फरशी.. घंटेचा घण्णं असा टोला देऊन देवाच्या मूर्तीकडे पाहिलं तरी नास्तिकाचा आस्तिक होऊन जातो.. अगरबत्ती लावून खाली बसलं की आपला श्वास आणि मन एक होऊन जातं.. आवारातल्या दगडी फरसबंदीवरुन फिरत मागे असणाऱ्या तलावाकडे जावं.. शांत पाणी आणि गर्द हिरवाई यात सगळी नकारात्मकता निघून जाते.. वालावलचा देव प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधतो तर आचऱ्याचा रामेश्वर अंतिम सत्याची जाणिव करून देतो.. धामापूरच्या तलावाचा उल्लेख सुनिताबाईंनी ‘आहे मनोहर तरी’ मध्ये केला आहे. ती चाफ्याची झाडं आता नोव्हेंबरमध्ये वठली आहेत.

धामापूरच्या मंदीरात पाऊल ठेवलं ..पहावं तिकडे कुत्र्याची पिल्लं दिसली. चुक् चुक् करून बोलावलं..आली सगळी एकदम उड्या मारत.. बिस्कीटं अक्षरश: भरवली त्यांना.. मोजली तर तेवीस पिल्लं होती. मालवण शहरातलं मध्यवर्ती भागातलं दत्तमंदीर एक मनाच्या गाभाऱ्यात अनेक आठवणी घेऊन बसलं आहे. जुनं आवार. कडीपाटाचं छप्पर. बाहेर मारूतीची छोटी घुमटी, तीत मिणमिणणारा दिवा, आत दत्ताची सुंदर मूर्ती. मला कसली स्तोत्रं वगैरे पाठ नाहीत पण त्या थंड फरशीवर डोळे बंद करून बसलं की जी काही छान तंद्री लागते की तिथून पाऊल निघतच नाही. एका दत्तजयंतीला तिथे होतो तेव्हा पालखी सोहळा जो पाहिला तो विलक्षण होता. नंतर रात्री पौराणिक नाटक होतं.

दोन दिवस मालवणच्या चिवला किनाऱ्यावर पहाटे लवकर उठून फिरायला गेलो.. सकाळचा समुद्र अफलातूनच जाणवला.. शांत , निवांत आणि स्वच्छ. लाटांचा आवाज आणि चालतानाची गती .. म्हणाल त्या गाण्याची लय मिळत होती.. नंतर मालवण शहरात फेरफटका.. माझा मित्र फडफडीत मासळीवर यथेच्छ ताव मारत होता..आणि वझेकाकांकडे मी वरणभात खायचो म्हणून मला हसत होता.खरोखर हे मासे खाणारे लोक धन्य असतात. आमचा मित्रं मला एकदा रात्री बाईकवरून सोडायला येत होता, वाटेत हेल्मेटवरून मोबाईल आत सरकवून आईला फोन लावून ओरडला.. दहा मिनीटात याला सोडून घरी येतो तू मासे तळायला घे.

मालवण शहरातले सुंदर शांत रस्ते रात्री अधिक मोहक होतात. अजूनही शहरात जुनी घरं आहेत. मालवण ला शहर ही एक भौगोलिक संज्ञा आहे पण ते खरंतर मनातलं एक गांव आहे. त्या जुन्या घरांबाहेर दिवाळीचा आकाश कंदिल इतका संदर दिसतो की मन प्रसन्न होतं. कौलारू घर, आजूबाजूला मिट्ट काळोख, थंड शांत वातावरण आणि हवेवर हलके झोके घेणारा रंगीत प्रकाशाचा तो आकाश कंदिल अवघ्या आसमंताचा हायलाईट होऊन जातो.

रत्नागिरीला सकाळी कधी मिरकरवाडा जेट्टीवर जातो. तिथे सुलतान आणि त्याची अम्मी मासे विकत असतात. मी उगीच पापलेटात बोट चेपून बघतो किंवा सुरमईचा भाव विचारतो. मग चिंगळांचे एकदोन वाटे घेतो, शेजारच्या वहिनींना बनवायला देतो. वहिनी मग नाचणीची गुलाबी भाकरी आणि रवा प्रॉन्स देतात. नंतरची झोप अटळ !!

मालवणहून रत्नागिरीला आलो आणि आंब्याचा मोहोर धरू लागला त्याच्या सुवासाने वेड लागायचं बाकी राहिलं.. अजून पुरता नाही पण सुरूवात झाली आहे.मधूनच चोरटा घमघमाट येतो आणि जागच्या जागी थबकायला होतं.थंड सकाळ.. पक्ष्यांचा आवाज.. पाचोळा पेटवल्यावर येणारा तो निळा धूर.. मन प्रसन्न प्रसन्न.. किशोरीताईंचं ‘सहेला रे’ किंवा ‘ आज सज़न संग’ लावावं.. समोर अंगणात रांगोळी घातलेली दिसत असते.. अजून काय हवं ? हो, मिसळीचा झणझणीत प्रस्ताव मित्रांकडून येतो.

संध्याकाळी भैरी मंदीरात गेलो.यथासांग गाऱ्हाणं झाल्यावर बाजूच्या मारूतीचं दर्शन घेतलं.निश्चिंत होऊन परत आलो.

रत्नागिरीला मी माझं माहेर म्हणतो.. मी तिथे गेलो की माझी एक मैत्रीण म्हणते ‘माहेरवाश्या आला’.

नेरूळ स्टेशनच्या पायऱ्या उतरताना नेहमीची दुर्गंधी आली.. दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या लोकलची धडधड ऐकू आली.. बाहेर भिकारी दिसले.. निर्विकारपणे रिक्षात बसलो..सेक्टर अठरा असं म्हणालो..

फोनवर 5G ची रेंज आली होती.मी आता आंबा मोहराच्या रेंजमधून बाहेर पडलो होतो.

//केदार//

Posted In ,