चिवचिवणारी वाट असावी..!!

By

दुपारी दादाचा फोन आला !

दादा, सचिन, अप्पा, प्रशांत, संदेश, संज्या .. यांचे फोन आले आणि त्यांची नावं फोनच्या स्क्रीनवर दिसली की एक सुखाची झुळूक येऊन जाते. एक बरं असतं की यांच्यापैकी कुणाशीही बोलताना आपण काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, कसं बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय याचं भान ठेवून बोलावं लागत नाही. किंवा आपल्या बोलण्याने हा दुखावला तर जाणार नाही ना याचा विचार करावा वाटत नाही. म्हणजेच गुडमॉर्निंग, गुडनाईट सारखे शिष्टाचार नं बाळगता केलेलं ते बोलणं असतं. यांच्यापैकी कुणालाही कसलेही व्हॉट्सॲप मेसेज केले तर अरर् म्हणून डिलिट करायची तोहमत येत नाही. अगदी मन प्रसन्न करणारा प्रत्येक संवाद असतो. संदेश तर खळाखळा हसतच बसतो, तर दादा मला खो खो हसवतो. अप्पाच्या तोंडून तर साक्षात ज्ञानेश्वरी प्रकट होते आणि प्रशांतकडून दर वेळी नव्या शब्दांची ज्ञानात भर पडते. सचिन म्हणजे अभंगाला जसं घ्रुवपद असतं तसे काही खास शब्द ठराविक अंतराने नियमितपणे बोलताना वापरतो तर संज्याशी बोलताना हसून डोळ्यांत पाणी येतं. नितीनियमांच्या चौकटीत राहून वागताना बोलताना अशा जिवलगांचा एक फोन बरंच सुख देऊन जातो.

तर काय सांगत होतो ? दादाचा फोन आला. सुवासिक शब्दांची देवाण घेवाण झाल्यावर दादाने मूळ मुद्दयाला हात घातला. डिसेंबर जवळ आला आहे आणि मिळणाऱ्या हक्काच्या सुट्या संपवायच्या आहेत. त्या नाही घेतल्या तर काही लॅप्स होतील आणि त्यामुळे आपटे , काहीतरी प्लॅन करा असा बोलण्याचा आशय होता. मी सुध्दा यावर्षी सुट्या घेतल्या नसल्याने मलाही आता घ्याव्या लागतील हे लक्षात आलं. मागच्या महिन्यात खरंतर दादा, मी आणि सचिनने लेह लडाखला जायचा प्लॅन केला होता पण नेमकं माझं शिंचं ते ऑपरेशन करावं लागलं त्यामुळे मला जाता आलं नाही. ते दोघं जाऊन आले. आता दादाने तर हुकूमच केला की काय ते तुझं तू बघ पण मुकाट्याने डिसेंबरचा प्लॅन कर.

दादाबरोबरचे असंख्य प्रवास झरझर डोळ्यांसमोर येऊन गेले. एकदा रात्री दादाच्या घरून बाईकवर सामान लादून निघालो ते थेट कणकवलीला. चांदणी रात्र होती. गार वारा झोंबत होता. मध्यरात्री एका ढाब्यावर डाळफ्राय आणि राईस जेवलो. सतत कारने प्रवास करायची मला सवय आता बाईकवरून इतका लांब प्रवास मला झेपेनासा झाला. त्यावेळी मुंबई गोवा रस्ता खूप छान होता. दुतर्फा गर्द झाडी असायची. पहाट होत आली आणि दोघंही दमलो. पाहातो तर कणकवलीला पोहोचलो होतो. हायवेला एक हॉटेल सापडलं. रूम घेतली आणि मस्त झोपून गेलो. सकाळी की दुपारी जाग आली. बाजूला झणझणीत मिसळ खाल्ली. दोघांचाही गोव्याला जायचा उत्साह मावळला होता. तिथून गेलो वेंगुर्ल्याला. जाताना रेडीच्या गणपतीचं दर्शन घेतलं. तिथून पुढे वालावलला लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं. येताना आतल्या रस्त्याने मोचेमाड, सरमळ फाटा करत पिंगुळीच्या मठात गेलो. आणि तिथून परत हायवेला येऊन रत्नागिरीला आलो. तेव्हाचा एक प्रसंग आठवतो. लांज्याच्या आसपास दुपारी पोहोचलो तेव्हा इतके दमलो होतो की हायवेला जरा निवांत झाडी दिसली. तिथेच बाईक लावली आणि एका पारावर ताणून दिली. नंतर कधीतरी जाग आली आणि निघालो. हसत खिदळत केलेला तो प्रवास अजूनही मला आठवतो आहे.

मुंबईहून जरा दुपारनंतर मी आणि दादा निघायचो मग कराड कोकरूड करत आंबा घाटातून पहाटे कधीतरी रत्नागिरीला पोहोचायचो. मध्यरात्री तो कोकरूडचा घाट भयाण वाटायचा. मलकापूरला पोहोचलो की जीवात जीव यायचा. पुढे आंबा घाटात शुक्राची चांदणी बघत भणभणणारा वारा घेत साखरप्यापर्यंतचा सुंदर वळणावळणाचा प्रवास आठवतो. एकदा सगळ्या गाड्या घाटात अचानक थांबल्या. पहातो तर मध्येच रस्त्यात एक लांब नाग मोठ्ठा फणा काढून बसला होता. बराच वेळ झाला मग तो निघून गेला. मी आणि दादा श्वास रोखून पहात बसलो होतो. तसेच एकदा आंबा घाटातून मध्यरात्री जाताना भीषण पाऊस कोसळत होता. अविस्मरणिय प्रवासांपैकी तो एक प्रवास होता. संदेशबरोबरही केलेल्या अनेक सफरी आठवतात. भोरघाट, आंबेनळी घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, फोंडा घाट, गगनवावडा घाट, कशेडी घाट हे वळणांसकट पाठ झाले आहेत. भोरघाटासारखं रौद्र सौंदर्य कुठे सापडणार नाही. आंबेनळी घाटातून उतरत असताना जंगलात एक कोल्हा गाडीसमोर आला होता. फोंडा घाटात तर अजूनही राधानगरीपर्यंत झाडांची सुंदर रमणीय कमान शाबूत आहे. मन प्रसन्न प्रसन्न होतं. या सर्व घाटांचं उन्हाळ्यातलं रूप वेगळं असतं आणि पावसाळ्यातलं रूप वेगळं असतं. मी या सर्व घाटांमध्ये पावसाळ्यांतल्या रात्री अपरात्री केलेले प्रवास आठवतात. भारलेले दिवस होते ते . मनात आलं की गाडी काढायचो आणि निघायचो. रस्ता तोच असला तरी प्रत्येक वेळी नवा अनुभव यायचा. नवीच टपरी सापडायची. तिथला चहा भजी नवा आनंद द्यायचा. साखरपा ते लांजा यामधला रस्ता एक थरारक अनुभव देणारा होता तर एका मध्यरात्री टिपूर चांदण्यात आंबाघाट गाडीचे हेडलाईट बंद करून उतरलो होतो ते आठवलं.

आपला महाराष्ट्रच इतका सुंदर आहे की तो कितीदा पाहू असं होतं. कोकणाबद्दल तर लिहू तितकं कमी आहे. हे प्रवास, त्यात आलेले बहारदार अनुभव, भेटलेली माणसं, वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल पंपावरसुध्दा अनेक चांगले अनुभव आले आहेत ते सारं आठवतंय.

एकदा असाच दादाचा फोन आला आणि आम्ही निघालो. सरळ साताऱ्याच्या औंध संस्थानात यमाई देवीच्या टेकडीवरच्या मंदिरात पोहोचलो. संध्याकाळी फक्त आम्हीच तिथे होतो. ती करकरीत तिन्हीसांज, तिथला तो घंटानाद आणि अगरबत्तीचा दरवळ हे अजूनही मनात ! इतकं सुंदर दर्शन लाभलं की बस्स. तिथून पुसेगावला सेवागिरी महाराजाची जिवंत समाधी आहे तिचं दर्शन घेतलं आणि गोंदवल्याला श्रीमहाराजांच्या मठात जाईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते. पोटात भूक लागली होती. आता मठात जेवण मिळण्याची आशा तर मावळली होती. पण म्हटलं निदान समाधीचं दर्शन शेजारतीच्या आधी तरी मिळेल. महाराजांना मनातून साकडं घातलं. मठात पोहोचलो तर घाईघाईने तिथले सेवेकरी पुढे आले आणि म्हणाले समाधीचं दर्शन घेऊन या आणि पंक्तीला चला. लांब सोलापूरहून दोन बसने काही भक्तजन येणार होते त्यांच्यासाठी उशीरा पंगत ठेवली होतीं. महाराज काळजी घेतात ती अशी! दुसरे दिवशी मी आणि दादा जरंडेश्वराच्या कठीण डोंगरावर ट्रेक करत गेलो. वर मिशी असलेली मारूतीची मूर्ती आहे. अविस्मरणिय ट्रेक होता तो. दादाचा एकादशीचा उपवास होता आणि मी त्याच्यासमोर अर्थातच निर्लज्जपणे मिसळ खाल्ली होती. त्याने उपाशीपोटी आणि मी मिसळ खाऊन तो ट्रेक केला होता.

आता कुठे जायचं असेल तर कॅलेंडर पहावं लागतं. ऑफीसमधून सुटी मिळेल का हे पहावं लागतं. कुठे मिटिंग शेड्युल असल्या तर ॲबसेंस मार्क करावा लागतो. जबाबदाऱ्या झटकून, हा मी चाललो असं म्हणता येत नाही. बाहेर असलो तरी फोन येत असतात. मनात विचार सुरू असतात. दादाने आणि मी ठरवलं आहे की बस्स रिटायर झालं की छान फिरायचं. मस्त रहायचं. रत्नागिरीला पहाटे उठून समुद्रावर जायचं. वाड्या वठारांचे चढ पायाखाली घालायचे. हंबीरमामा मोहित्यांची समाधी पहायची, भोर घाटातून डोंगरांचे माथे पहायचे, आदिष्टीला भगवतीला भैरीबुवाला मनात आलं की कधीही जायचं. पण हे कसं जमणार ? . मला विंदा करंदीकरांची एक कविता आठवते –

चिवचिवणारी वाट असावी
दमछाकीची यावी घाटी
घाटीनंतर गडग्यापाशी
पार असावा बसण्यासाठी

उठण्याची पण हिरवी शक्ती
अंगी असावी करीत वळवळ
मनीं असावे मौन सुगंधित
अंगी असावी जगण्याची कळ

लाल असावा पुढचा रस्ता
मोह असावा तिठ्यातिठ्यावर
हात नसावा हुकुम कराया
पाठीवरती सर्व हवे घर

पडशीमध्ये हवेत पोहे
(आणिक चंची —- हवीच ती तर)
थालिपीठाचे तुकडे काही
निव्वळ लोणी तयाबरोबर

हवीच थोडी लोचट थंडी
ऊन असावे तिरकस पिवळे
क्षितिजामध्ये ऊब असावी
गवत असावे भवती कवळे

बैल असावा आंडील डुरकत
दूर जुगाईच्या माळावर
सह्याद्रीची निळी गोपुरे
दूर असावी दूर दूरवर

पायामध्ये मूठभर जाडे
हवे पायतण करकरणारे
अन् वाटोळी पृथ्वी याचे
दुःख असावे सुख पिणारे

विंदा करंदीकर

ती चिवचिवणारी हिरवीगार वाट, गडगा , तो पार., लालचुटूक रस्ते, सह्याद्रीचे निळे डोंगर हे सारं सारं अनुभवताना ‘हात नसावा हुकूम कराया’ हे किती गोड ! त्या झूम मिटिंग नाहीत की टीम्स मिटिंग नाहीत. . पायामध्ये मूठभर जाडे असे करकरणारे कोल्हापूरी पायतण घालून पृथ्वीभर भ्रमंती करायची आस असणारे इरादे तर बुलंद आहेत, बघू कसं जमतंय ते ! विस्तारभयास्तव थांबतो इथेच.

तर सांगत काय होतो की आज दादाचा फोन आला होता !!

//केदार//

दमछाकीची घाटी
Posted In ,