मागच्या आठवड्यात रत्नागिरीहून येताना वाटेत भूषण टिकेकरच्या घरी चहासाठी थांबलो. सोबत अर्थातच दादा होता.
भूषणचं टिक्यातलं घर आता माझ्या ‘ Must to do’ लिस्टमधल्या रहाण्याच्या ठिकाणात ॲड झालं आहे.
गर्द झाडी. बघावं तिकडे हिरवाई. तिथे एक जागा भन्नाट आहे. जरा उंचावर एक पार आहे आणि त्या पाराच्या बाजूला एक दगडी डोण आहे. पार असल्याने वर अर्थात सावली आहेच. त्या डोणीत पाणी भरून दुपारी मस्त निवांत डुंबत पहुडण्यासारखं सुख नसावं. भूषण म्हणाला की करू पुढच्या वेळी हा प्लॅन. बाजूला चूल दिसली. म्हणजे तिथेच जेवण वगैरे करायच आणि सावलीला आडवं व्हायचं.
वर्तमानपत्रात गुळगुळीत कागदावर घरांच्या कोट्यावधी रूपये किंमतीच्या जाहिराती पहाताना वाटतं की खरं सुख काय ते पहायचं असेल तर कोकणात चला.
निघताना भूषणने फणसाची कुयरी खचॅक करून पाडली व व्यवस्थित गुंडाळून पॅक करून दिली. मुंबईला आलो. कुयरी खुणावत होती. ती कशी चिरायची हे कळावं म्हणून भूषणनेच वहिनींना कुयरी चिरायला लावून मला व्हिडियो पाठवला. आज त्याबरहुकूम कुयरी चिरली. भाजी केली. पानात हिने भाजी बाजूला वाढली तर मी पानच बाजूला केलं.
दिवाळीत चिवडा खातात तसं वेगळ्या बशीत ते अन्नब्रह्म घेतलं.. वर ओलं खोबरं अंथरलं.
आणि … आणि काय ? तसंही कुयरीची भाजी घरी करणं म्हणजे दिवाळीच की ! धन्यवाद भूषण !!
//केदार//
