दि.बा.मोकाशींची ‘रोमच्या सुताराची गोष्ट’ या नावाची एक नितांतसुंदर कथा आहे. हळवं मन असलेला कथानायक आपल्या प्रेयसीसोबत बसलेला असतो. गप्पागोष्टी सुरू असतात. ज्या काळात हा प्रसंग घडत असतो तो काळ म्हणजे व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रॅम नसलेला होता त्यामुळे मोकाशींचा हा कथानायक प्रेयसीबरोबर गप्पा मारताना तिला सतत एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
तीच गोष्ट म्हणजे रोमच्या सुताराची गोष्ट. त्याच्या त्या प्रेयसीला मात्रं सतत तीच ती गोष्ट ऐकून कंटाळा आलेला असतो. हा मात्रं अगदी नेटाने ती गोष्ट सांगत बसलेला असतो. शेवटी ती अगदी कंटाळून जाते आणि नाही ऐकायची ती गोष्ट म्हणून तिच्या कानावर दोन्ही हात ठेवून ती कान झाकून घेते. हा सीन पाहून कथानायकाच्या डोक्यात त्या क्षणी लख्खं प्रकाश पडतो की अरेच्चा, या क्षणी तिचे दोन्ही हात तिचेच कान झाकण्यात बिझी आहेत.. हे लक्षात येताच तो तिच्या ओठांकडे झेपावतो !
मोकाशींनी या गोष्टीत ते नवथर प्रेम, तो हळवेपणा, एकमेकांच्या जवळ येण्यातलं ते नाविन्य सुंदररित्या वर्णन केलं आहे. मी ही कथा अनेकवेळा वाचली आणि प्रत्येकवेळी या कथेने मला तितकाच उत्कट आनंद दिलेला आहे.
आज ही कथा वाचताना असं वाटतं की मोकाशींच्या कथेतले हे प्रियकर प्रेयसी आज असेच असतील का ? आजच्या मोबाईलच्या जमान्यात जीवनाचा वेग इतका वाढला आहे की कुणी आपल्या मैत्रीणीला अशी कुठली गोष्ट सांगत असेल का ? फेसबुकवरची कुणाची पोस्ट काय आहे यापेक्षा त्या पोस्टला कुणी लाईक केलं आहे किंवा कोण कुणाला सतत लाईक करत असतं किंवा कुणी काय कॉमेंटस् केल्या आहेत यावरच वेळ घालवत असतात. मग फेक प्रोफाईल करा, सतत फॉलो करा यात वेळ घालवणारी ही पिढी. यांना रोमच्या सुताराची गोष्ट सांगणाऱ्या प्रियकराची मानसिकता कशी कळेल ? किंवा एखादा भिडू जरी असा गोष्ट सांगणारा निघाला तरी कानावर हात ठेवून लटका राग आणणारी ती स्वप्नाळू मैत्रीण आता असेल का? असलीच तर चेहऱ्यावर खोटं कुतुहल दाखवून मनात मात्रं , ‘माझ्या पोटात भुकेचा डोंब उसळला आहे आणि हे येडं मला रोमच्या सुताराची गोष्ट सांगत बसलंय’ असे विचार करत बसणारी असेल. प्रेमात असलं की सगळं चालतं किंवा चालवून घेतलं जातं पण बिनसल्यावर मात्रं खिल्ली उडवली जाते.
मागच्या आठवड्यात व्हॅलेंटाईन नावाचा आचरटपणा सगळीकडे चालला होता… मोकाशींची ही कथा आठवली आणि म्हणून हा लेखनप्रपंच !!
//केदार//