आमच्याकडे एक नेल्कोचा ट्रांझिस्टर होता. मला आठवतंय की त्याला एक काळं कव्हर होतं आणि बाबा नेहमी तो व्यवस्थित पुसून वगैरे ठेवायचे. रोज सकाळी साडेसात वाजता रेडियो सिलोनवर ‘पच्चीस और इकतालीस मीटर बॅंडपर’ पुराने फिल्मोंका संगीत नावाचा कार्यक्रम लागायचा तो आठ वाजता सैगल साहेबांच्या गाण्याने संपायचा. त्या ट्रांझिस्टरवर खरखर आवाजात आम्ही ते ऐकायचो.
आता चैन अशी आहे की मी रोज हा कार्यक्रम माझ्या ‘बोस’वर नं चुकता सकाळी डिजिटल रेडियो सिलोन लावून ऐकतो. त्यात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किशोरचं ‘आज पहिली तारीख है’ लागतं. खरखरणारा रेडियो होता तेव्हा तो ट्यून करून आसुसलेल्या कानांनी लागलेलं प्रत्येक गाणं ऐकत, त्यावर मान डोलावत स्वतःवर खुष होऊन ती गाणी ताना घेत म्हणणारे माझे बाबा होते. आज ‘बोस’वर तीच गाणी क्लियर साऊंडवर लागतात पण ती ऐकायला माझे बाबा माझ्याबरोबर नाहीत !!
काळ हा फार निर्दयी असतो. बकासुरच तो ! नेतो सगळ्यांना आपल्यातून दूर. बाबांबरोबर सिलोनची गाणी ऐकायचो रोज सकाळी , पण आठवड्यातून एकदा रात्रीचं आमचं जेवण व्हायचं ते बिनाका गीतमाला ऐकत. भराभरा पानं घ्यायची आणि अमीन सयानीचा आवाज ऐकत जेवायचं हा परिपाठ होता. ते पायदान .. ते बिगुल.. सगळंच अजब होतं. ते दिवसच भारलेले होते.
आज अमीन सयानी गेले. लताच्या जाण्याचे घाव अजूनही भरून आलेले नाहीत. आठवणी या नुसत्या आठवणी नसतात. रंग गंध गीत यासहीत त्या आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासोबत आपल्याबरोबर येत असतात. अमीन सयानी हे असेच माझे जीवलग. हाताला धरून प्रत्येक गाण्यातली खुबी हा माणूस सांगायचा. संगीत क्षेत्रात मुशाफिरी घडवून आणायचा. त्याचं नुसतं ‘भाईयो और बहेनो’ ऐकलं की वाटायचं , बस्स आता सुरांची बरसात होणार.
हा काळ असा का करतोय ? लता गेली.. राशिदभाई गेले.. आज अमीन सयानी. माझ्या डोळ्यांच्या कडा सतत पाणावलेल्याच ठेवायच्या असं ठरवलंय बेट्याने !
काळाने अजून मोठा डाव साधला. माझ्या कार्यक्षेत्रातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व ‘एफ एस नरिमन’ काल गेले. जस्टिस छागला, यशवंतराव चंद्रचूड, एफ एस नरिमन यांचे आदर्श मी कायद्याचा अभ्यास करताना समोर ठेवले होते. जस्टिस छागलांचं ‘Roses in December’ हे आत्मचरित्र वाचलं होतं.
‘काळाला’ झालंय काय ?
//केदार//