तसा मी भटक्याच !!
भटकंतीत त्या त्या ठिकाणाचं स्थानमहात्म्य असलेले खाद्यपदार्थ आवर्जून खाणं हा माझा मेन अजेंडा. उगीच भावनगरी गाठीया मी मुंबईत खाण्याचा आचरटपणा करत नाही. जो तो पदार्थ ज्या त्या ठिकाणीच जाऊन खावा. तिथल्या पाण्याची चव, बनवायची खासियत, बनवणाऱ्यांची खास रेसिपी ही त्या त्या ठिकाणीच जाऊन खाण्यात गंमत असते. मी कितीही मिसळप्रेमी असलो तरी ‘मिसळ महोत्सव’ या नावाखाली पुण्यामुंबईत जो प्रकार चालतो तिथे मी कधीही जात नाही. बेसिकली ‘मिसळ महोत्सव’ ही एक द्विरूक्ती आहे. ‘पिवळा पीतांबर’ किंवा ‘निळं आकाश’ म्हणण्यासारखं. पीतांबर हा पिवळाच असतो किंवा आकाश हे निळच असतं तसं मिसळ खाणं हा एक महोत्सवच असतो, नाही का ? त्या पवई तलावाचं महानगरपालिकेकडून येणारं पाणी वापरून कुणी कोल्हापूरी मिसळ कशी करू शकतो? नुसतं तिखटजाळ म्हणजे कोल्हापूरी ?
दक्षिणेकडे सुक्या खोबऱ्यापासून तेल काढतात. तेल काढल्यावर नारळाची भुकटी उरते. ती भुकटी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आणतात. तीत नावाला ओलं खोबरं घालतात आणि मिरची कोथिंबीर आणि पाणी घालून चटणी बनवतात आणि आपल्याला इडलीबरोबर देतात. कधी नोटीस केलंय हे की इडली त्या चटणीत बुडवली की पचपचीत लागते का ते ? सगळी दृष्टीआड सृष्टी.
तर मी सर्वण्णा भवन बद्दल बोलत होतो. चेन्नईला आलो की नं चुकता दिसेल त्या सर्वण्णामध्ये मी जातो.. इडली मागवतो आणि खाऊन तृप्त होतो. इडली कशी असावी ? तर सर्वण्णा सारखी. मऊसूत ! एकदम सफेद नाही, जराशी काळपट सफेद ! जाळीदार !! तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी !! सर्वण्णामध्ये दोन जरी इडल्या मागवल्या तरी बरोबर एक हिरवी चटणी, एक पांढरी चटणी आणि एक टोमॅटोची चटणी देतातच. बरोबर सांबार आणि रसम्. मुंबईत कुठेही इडली खाल्ली की प्रथम रव्याचा भुगा तोंडात प्रसरण पावतो आणि सांबार तर इतकं दरिद्री असतं की विचारू नका. सर्वण्णाकडे प्युअर तांदळाची इडली असते. चटण्या या खरोखरच्या ओल्या नारळापासून केलेल्या असतात. सर्वण्णामध्ये मिळणारा अजून एक बेफाट पदार्थ म्हणजे ‘घी रोस्ट’ डोसा. लांब मुलायम जाळीदार डोसा अगदी guilt free तुपात सचैल घोळवलेला असतो. काटे चमचे वगैरे फालतूगिरी नं करता सांबारात मनसोक्त बोटं बुडवून खावा.
आंध्राचं ‘नंदिनी’, कर्नाटकाचं ‘अडिगा’ ही एक एक संस्थानं आहेत. नंदिनी मध्ये केळीच्या आडव्या पानावर पहिला भात मधला भात आणि शेवटचा पण भात वाढतात. प्रत्येकवेळी तुपाची उंच धार भातावर धरतात. घोंगुरा म्हणजेच अंबाडीची चटणी ही आंध्राची खासियत. एकदा का नंदिनीमध्ये जेवलं की पुढे झोप ही मस्ट. बंगलोरच्या अडिगाची इडली हा एक प्रबंधाचा विषय आहे. चेन्नईला अड्यार आनंदा भवन, वसंता भवन, मुरूगन इडली ही स्वतंत्र विद्यापीठं आहेत.
दुबई, सिंगापूर, कुआलालुंपूर अगदी पॅरिसला गेलो तेव्हाही नं चुकता तिथल्या सर्वण्णा भवन्स मध्ये जाऊन आलो आहे. युरोपात जर पाणी मागितलं तर spring or still ? असं विचारतात. पाण्यात हलका सोडा मिसळलेलं पाणी म्हणजे spring आणि आपलं साधं पाणी जे आपण गटगट पितो त्याला still water म्हणतात. एक एक अजबच. परदेशात सर्वण्णा इडली बनवताना हेच still water वापरत असणार. तिथे फिरताना एक आपले पदार्थ देणारं ठिकाण म्हणून मी सर्वण्णा मध्ये जातो खरा पण उद्या मुंबईत जर सर्वण्णा सुरू झालं तर मी चुकूनही तिकडे जाणार नाही कारण सर्वण्णा म्हटलं की चेन्नई, तिथलं पाणी , तिथला तांदूळ वगैरे माझी समीकरणं मनात सुरू होतात त्यात मुंबईचं पाणी वापरून ती इडली कशी काय जमू शकेल ? मी माटुंग्याला कॅफे मद्रास किंवा उडुपी रामा नायक कडे जाताना कुठलाही भौगोलिक पूर्वग्रह मनात ठेवून जात नाही म्हणून स्वतंत्रपणे तिथली चव एंजॉय करू शकतो.
मागच्या वेळी चेन्नईला सर्वण्णा भवन मध्ये गेलो, एकटाच होतो. इडली झाली , घी रोस्ट डोसा झाला.. मी बोटं चाटत खाताना तल्लीन झालो होतो ते लुंगीवाला वेटर लांबून पहात होता. मी नंतर माझी मातृभाषा तमीळ असल्याप्रमाणे ‘रंड कॉफ़ी’ असं ऐटित म्हणालो. (तमीळमध्ये ‘रंड’ म्हणजे ‘दोन’.) मी एकट्याने एकदम दोन कॉफ़ी मागवल्या आणि मिटक्या मारत संपवल्या ते पाहून तो लुंगीवाला वेटर नक्कीच मनातल्या मनात ‘पैईट्टीय्याकारन्’ असं म्हणाला असणार.
(तमीळ मध्ये ‘पैईट्टीय्याकारन्’ म्हणजे मायमराठीत ‘येडं’!!)
//केदार//

