आयुष्यात काही क्षण ‘मूर्तीमंत भिती मजसमोर उभी राहिली’ या संगीत शारदा नाटकातल्यासारखे येतात.
आज दुपारी लंचच्या आधी रूममध्ये मिटिंग सुरू होती. लंचनंतर लगेच दुसरी मिटिंग असल्याने ‘चला, आता क्विकली लंच करून घेऊ’ असं म्हणून रूममधून बाहेर पडलो. तिसऱ्या मजल्यावर तंद्रीत लिफ्टमध्ये शिरलो. लिफ्टचं दार बंद झालं .. आणि एक जोराचा झटका बसून लिफ्ट जागच्या जागी थांबली. लिफ्टच्या आतल्या डिसप्लेवर ‘out of order’ अशी अक्षरं झळकू लागली.
मी जागच्या जागी थिजलो. भितीची एक लहर मनभर पसरली. लिफ्टची दारं पेटीसारखी बंद होती. मध्ये कशीबशी नखं खुपसून खच्चून जोर लावून दारं उघडण्याचा प्रयत्न केला. दारं किलकिली उघडली गेली. पहातो तर लिफ्ट दोन मजल्यांच्या मधोमध थांबली होती. नशिबाने आतले दिवे आणि फॅन चालू होते. मी अलार्म बटण दाबलं तर लांबून कुठूनतरी अलार्मचा आवाज ऐकू येऊ लागला. बाहेर माणसांचा आवाज ऐकू येऊ लागला. तितक्यात मला नं जुमानता ते दार बंद झालं आणि जोराचा धक्का लागून लिफ्ट हलली. खाली आली आणि दरवाजे उघडले गेले. मी टुण्णकन उडी मारून बाहेर पडलो.
ह्रदय धडधडत होतं. सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचा लिफ्टमध्ये अडकून करूण अंत झाला होता ते आठवलं. अजय देवगण दोन तास लिफ्टमध्ये अडकला होता ते आठवलं. मी काही मिनिटंच अडकलो होतो पण त्या मिनिटांमध्ये भितीने संपलो होतो. तरी आतले लाईट सुरू होते. फॅन सुरू होता. जर लाईट नसते तर ? अलार्म नसता तर ? फॅन नसता तर ? भर दुपारी सगळे आसपास असताना हे झालं पण समजा मी कधी सुटीच्या दिवशी ऑफीसला आलो असतो आणि असा अडकलो असतो तर रेस्क्यू करायला कोण आलं असतं ?
बाहेर येऊन आधी संजयला फोन केला आणि त्याला सांगितलं की ती लिफ्ट वापरू नकोस.
संध्याकाळी अनुप रुममध्ये आला आणि म्हणाला दुपारी जवळून गेलास मी हाक मारली तर लक्ष कुठे होतं रे ? आपल्याच तंद्रीत होतास. मी त्याला मग सगळा किस्सा सांगितला. आहे मी क्लस्ट्रोफोबिक, काय करू ? बोलायला लिहायला सगळं ठीक असतं पण लिफ्टमध्ये अडकलं की काय होतं ते मी आज अनुभवलं.
आपलंआयुष्य सुखाचं व्हावं म्हणून आपणच या सुखसोयी निर्माण केल्या.. आपण त्यांच्या आधीन झालो आणि त्यांच्याशिवास आपण कसे काय जगू शकतो या संभ्रमात आपणच सापडलो. राहुल जोगळेकर ,माझा मित्रं. कितीही मजले असले तरी तो चुकूनही लिफ्ट वापरत नाही. जिने चढत जाईल पण आपण जर लिफ्टने वर गेलो तर आपल्या आधी तो जिने चढून वर पोहोचलेला असतो. तो उद्या बूर्ज खलिफाला जरी गेला तरी जिने चढूनच जाईल याची मला खात्री आहे.
लिफ्ट वापराच्या बाबतीत राहुल माझा रोल मॉडेल आहे… उद्यापासून कदाचित मी ही ऑफिसचे तीन मजले लिफ्ट नं वापरता चढून जाईन पण माझं घर अकराव्या मजल्यावर आहे त्याचं काय करू ?
शौर्य, धीरोदात्तपणा वगैरे सगळे व्यक्तिविशेष वर्णन करायला ठीक असतात.
एकदा लिफ्टमध्ये अडकून पहावं !!
//केदार//