आपल्या जगण्यावर आपल्या परिसराचे संस्कार होत असतात. माझ्या आयुष्यावर रत्नागिरीचे संस्कार झाले आहेत. भैरीबुवाच्या देवळात जाऊन आल्यावर आपण सुरक्षित आहोत याची जाणीव होते. पुलंच्या अंतू बर्वा मध्ये ज्या अंगाऱ्याच्या पुडीचा उल्लेख आला आहे तो भैरीबुवाच्याच अंगाऱ्याचा असणार अशी मला खात्री आहे. तिथले झाडमाड पोफळी आंबेकाजू समुद्राची गाज हे सर्व सर्व अजूनही क्षणोक्षणी मनात आहे. म्हणून पहिली संधी मिळाली तेव्हा मी रत्नागिरीकर झालो.
माझे आईवडील नोकरी करायचे आणि आम्ही त्यानिमित्ताने पुण्याहून रत्नागिरीला आलो होतो. शिवरेवाडीच्या गीताताई, स्मिताताई,नीताताई, पद्मा आणि सीमा यांच्याबरोबर आमचा घरोबा जुळला आणि आमचं नेहमी त्यांच्या घरी जाणंयेणं सुरू झालं.
सारवलेलं खळं, कृष्णकमळाची कमान.आत गेलं की हातपाय धुवायला डोण आणि बाजूला एक जायफळाचं झाड.तिथे ज्या विहिरीतून पाणी यायचं तिथे एक पायरहाट होता. आम्ही लहान असल्याने आम्हाला आईबाबा पायरहाटावर बसू द्यायचे नाही कारण खाली पाहिलं तर अंधारी विहिर आणि करकरत एकामागून एक वर येणारी ती छोटी गाडगी खाली जाताना उपडी होऊन त्यांतून पाणी पडायचं तेव्हा मौज वाटायची.
गाईचं धारोष्ण दूध मी नेहमी तिथेच प्यायचो. पडवी ओसरी माजघर स्वयंपाकघर आणि पुन्हा मागे पडवी आणि मग परसू असं छान चांदोबातल्या कथेतल्यासारखं ते घर होतं. मागे पोफळीचं आगर आणि आगराला लागून नदीचं पात्रं होतं. तीच नदी पुढे शिरगाव पुलाखालून साखरतरच्या पुढे समुद्रात जायची. गणपतीमध्ये त्यांच्याकडे गेलो की मोठी पंगत असायची आणि मग आग्रह करकरून मोदक वाढले जायचे.खळ्यात एक बाजलं होतं. त्याच्यावर यथेच्छ लोळायचो. झापांचा मांडव असायचा. खळ्यात मे मध्ये फणस आणि आंब्याची साठं वाळत घातलेली असायची. तिथेच एखादा गडी बसून बरका फणस सोलून एक एक गरा द्यायचा तो लपक्कन गिळला जायचा. त्यांचा एक गोपाळ नावाचा माणूस होता त्याच्याबरोबर बागेत आंबे उतरवायला जायचो. पायावर ओंबिल चढू नयेत म्हणून रॉकेल ओतून एकदोन फांद्यांपर्यंत वर जायचो पण ते बांबूचे लांब झेले काही झेपायचे नाहीत. मग नंतर उतरवलेले आंबे घेऊन करंड्या भरून घरी यायचो.शिवरेवाडीला जायचं म्हणजे आनंद असायचा. तेव्हा डांबरी सडका नव्हत्या. शिरगांवच्या पुढे लालचुटूक वळणावळणाचे रस्ते होते. वाटेत शंकराचं स्वप्नवत मंदीर दिसायचं.
आज मुंबईत घरात पाल झुरळं येऊ नये म्हणून सगळ्या खिडक्यांना जाळ्या लावल्या आहेत.
त्या घराच्या लाकडी रेज्यांच्या आतून दिसणारा बाहेरचा काळोख आणि चमचमणारे काजवे आत्ता आठवणींत रमलेल्या माझ्या डोळ्यांसमोर!!
//केदार//
Leave a comment