
काल सुनील कांबळे गेल्याचं समजलं. खरंतर तो गेला दोन वर्षांपूर्वी पण तो गेला हेच सर्वांना काल समजलं.
हळहळ वाटली !
पर्चेसमधूम एक दिवस एक देखणा रूबाबदार मिशाळ माणूस माझ्याकडे आला. मी जरा बिचकलो. ओळख त्याने स्वतःहूनच करून दिली. जे काही काम होतं त्यावर बोलणं झालं. मनात कुठेतरी एकदम त्याच्याबद्दल आस्था वाटली आणि मी त्याला म्हणालो ,’ सुनील, येत जा रे अधून मधून. काही काम नसलं तरी सहज येत जा, आपण चहा पिऊ’.
तो नंतर येत राहिला. त्याचा बॉस नीच होता आणि कंपनीत सर्वांना हे माहिती होतं. कुठे गेला, किती वेळ बसला, काय काम होतं, अगदी टॉयलेटला जरी गेला तरी इतका वेळ का गेला ? इत्यादी मिनिटा मिनिटाचा हिशोब त्याचा बॉस ठेवायचा. मला काडीचा फरक पडायचा नाही. मग मीच काहीतरी खुस्पटं काढून ‘जरा सुनीलला डिस्कशनला पाठव रे’ असं सांगायचो. मग सुनील रिलॅक्स होऊन माझ्यासमोर येऊन निवांतपणे बसायचा.
त्याचं वैयक्तिक आयुष्य भयाण होतं हे मला नंतर हळूहळू समजत गेलं. पण इतकं असूनही एखाद्याला मदत करताना स्वतःला झोकून द्यायचा तो. सुखदुःखात रममाण होऊन सहवेदना त्याला जाणवायच्या. नंतर नंतर आमच्या तारा इतक्या जुळल्या की आम्ही तास चे तास फोनवर बोलू लागलो. एकदा तर रात्री फोनवर बोलायचा कंटाळा आला तर चक्क उठून त्याच्या घरी गेलो. तिथे पहिला धक्का बसला. कोपरी मध्ये एका चाळीत वरच्या मजल्यावर जिथे पत्र्याचं छत होतं तिथे तो रहात होता. एकटाच! कुटुंब मुलं असताना !
नंतर हळूहळू तो मला उलगडत गेला. गालातल्या गालात हसून कधीही कुणाबद्दल कटू नं बोलणारा, समोरच्याची वेदना जाणून घेऊन त्यावर उत्तम सल्ला देणारा हा सुनील माझा मित्रं बनला. आमच्या तारा जुळत गेल्या.
कोविडमध्ये अचानक त्याचा फोन आला. खोल आवाज. म्हणाला भिवंडीमध्ये एकटाच रहातोय. कुठेतरी नोकरी असेल तर द्या ना. मी कळवळून गेलो.
आपल्या आयुष्यात व्यक्ती येतात , जातात. प्रत्येकाचा जर्नी हा वेगळा असतो आणि ज्याचा त्यालाच तो पार पाडायचा असतो, पण सुनीलसारखी माणसं स्वतःचं आयुष्य कसंही असलं तरी दुसऱ्याबद्द्ल सतत चांगले विचार करून मनाला उभारी देण्याचा प्रयत्न करत असतात, ती कायम लक्षात रहातात.
तुझ्याबद्दल मी ‘नाही चिरा नाही पणती’ असं होऊ देणार नाही.
तुझी आठवण येतच राहील सुनील !!
//केदार//