आज बावीस मे.
बाबांना जाऊन आज पाच वर्ष झाली. .
नेहमी कोकणात जाताना माणगावच्या पुढे गेलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या उंच झाडांच्या फांद्या समोरासमोर एकामेकांना भिडून रस्त्यावर सुंदर हिरवीगार कमान झालेली दिसायची. कितीही तळपतं ऊन असलं तरी त्या हिरव्या कमानीखालून जाताना थंड शीतल वाटायचं. बाबा होते तेव्हा माझं आयुष्य असं चोहीकडून टवटवीत आणि सुरक्षित होतं. बाबा गेले आणि एकदम असुरक्षित वाटू लागलं. रखरखीतपणा आला.
आमची नेहमी भेट होत नसली तरी मी काही लिहिलं की अभिप्रायासाठी आधी बाबांकडे पाठवायचो. कुठे प्रवासाला गेलो की त्यांना कळवायचो मग ते ‘अरे तिथे अमुक ठिकाणी हे अमुक पाहून ये’ असे संदर्भ द्यायचे. लता,तलत यांची गाणी ऐकताना कळवळून दाद द्यायचे. मोदींविरूद्ध काही बोललं की रागवायचे. अत्यंत रसिक असे होते ते. थोडा बुजरा स्वभाव असल्याने कुणात जास्त मिसळत नसत.
पुण्यातलं ‘स्वीट होम’ हे त्यांचं आवडतं हॉटेल होतं.
बाबा गेले तेव्हा मी एक लेख लिहिला होता. सवयीनुसार सेव्ह केला नव्हता. तो शोधून आज या माझ्या पेजवर पुनःप्रकाशित करत आहे.
विष्णुसहस्रनामावलीतील एक एक शब्द त्यांच्या नसानसांत भिनला होता. फडके शास्त्रींना कुठेही भेटले झाली की वाकून नमस्कार करत.
या आठवणी असंख्य वेळा डोळ्यांत अश्रूरूपांत आल्या.
कधी त्यांनी कुणाबरोबर कसलं राजकारण केलं नाही. त्यांना कुणाहीबद्दल कसलीही असूया बाळगताना पाहिलं नाही. मत्सर,द्वेष कधीच त्यांनी कुणाचाही केला नाही.
असे माझे बाबा, गेले आणि मी सैरभैर होऊन गेलो. बाबा खरे मला समजलेच नाहीत असं मला अजूनही वाटतं. बाबांना समजून घेण्यात मी कमी पडलो हे माझं करंटेपण मला अजूनही आतल्या आत रडवत असतं. बाबा होते तेव्हा मी मला स्वतःला लहानच समजायचो. ते गेले आणि माझं लहानपण मी हरवून गेलो.
लहानपणी कुणाचे वडील गेले की असं लिहिलं जायचं की ‘अमुक च्या वडिलांचं अकाली निधन झालं’.
वडिलांचं निधन हे आपल्या कुठल्याही वयात ‘अकालीच’ असतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

श्री.श्रीकृष्ण गोविंद आपटे
माझे अद्भूत बाबा
बाबा गेले.
सकाळी साडेसहा वाजता वीणाचा फोन आला आणि उचलतानाच काळजाचा ठोका चुकला. म्हणाली दादा तुम्ही आणि शैला लगेच या.
नोव्हेंबरमध्ये एका किरकोळ सर्जरीकरता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळायचा होता त्या क्षणी त्यांना पॅरालिसीसचा झटका आला. मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती. ती काढली आणि तेव्हापासून आजपर्यंत ते शुद्धीवर आलेच नव्हते.
माझ्या जगण्याच्या जाणिवा मला होऊ लागल्या त्या क्षणापासून आतापर्यंत माझ्याबरोबर असलेले बाबा आता नाहीत ही कल्पना सहनच होत नाही.
जन्म पुण्यात झालेला, शिक्षण पुण्यात झालेलं. मध्यमवर्गीय कुटुंबातील संस्कार आणि नंतर नोकरी असं साधं सरळ आयुष्य होतं त्यांचं. बदलीची नोकरी करता करता कासवाच्या पाठीवरचा संसार आणि आम्ही दोन भावंडं अशी परिस्थिती होती. रत्नागिरी, चिपळूण, पुणे, मुंबई , देवरूख अशा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. परिस्थितीशी जुळवून घेत जगले आणि जगताना पुस्तकं आणि संगीत यांची साथ घेत जगले. मी लहान असताना ते माझ्यासाठी एका वेळी पाच पाच पुस्तकं घेऊन यायचे. केदार हे वाच, ते वाच असं सांगायचे. नाथमाधव, चिंवि जोशी, आचार्य अत्रे पुलं याची पुस्तकं ते आणून देत आणि मी एखाद दोन दिवसांत त्यांचा फडशा पाडत असे. मी पुस्तकं वाचताना खुदकन हसलो की विचारायचे का हसतोयस रे ? मग मी मोठमोठ्याने ते विनोद वाचून दाखवायचो, मग ते ही माझ्या हसण्यात सामील व्हायचे.
मी लहान असताना बोर्नव्हिटा आणायचे. बाहेर नेऊन आईस्क्रीम खाऊ घालायचे. त्यांना कच्चे तेलपोहे आवडायचे.
त्यांचं वाचन अफाट होतं. वाचताना ते पेन्सिल घेऊन बसायचे आणि आवडलेल्या लेखना खाली पेन्सिलने ओळी आखायचे. त्यांनी मला इंग्रजी वाचनाची आवड लावताना इंग्रजीतले बाबूराव अर्नाळकर म्हणजे जेम्स हॅडली चेस माझ्या हातात ठेवला. जेन ऑस्टीन, सॉमरसेट मॉम, आयन रँड, दॅफ्ने द्यू मॉरियर, जॉर्ज ऑरवेल यांच्या उत्तमोत्तम कलाकृती बाबांनी मला वाचायला दिल्या. माझं बोट धरून ते या क्षेत्रात मुशाफिरी करवून आणायचे. माझं वाचन प्रगल्भ झालं ते बाबांमुळे.
राम गणेश गडकरी, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे यांच्याबद्दल नितांत आदर त्यांच्या मनात होता. गंगाधर गाडगीळ ,अरविंद गोखले यांच्या कथा मला बाबांनी वाचायला शिकवल्या. जयवंत दळवींचं साहित्य वाचायला शिकवलं. दळवींच्या कादंबऱ्यांमधली वेडी माणसं यावर विचार करायला लावला. जीए कुलकर्णी कसे अनुभवायचे हे बाबांनी मला शिकवलं. त्यांतली पात्रं, कानडी नावं आणि परस्परसंबंध वाचताना श्वास रोखून धरायचा हे बाबांनी मला सांगितलं.
गोंदवलेकर महाराजांचे ते निस्सिम भक्त होते. त्यांची रोज प्रवचनं वाचायचे. प्रवचनांची पुस्तकं आवड असणाऱ्या सर्वांना भेट द्यायचे. पहाटे लवकर उठून ध्यानधारणा करायचे. विष्णुसहस्रनामाची पारायणं करायचे.
दिलखुलासपणे कुठल्याही गोष्टीला दाद द्यायचे. पुण्यात माझ्याबरोबर मिसळ खायला यायचे. मिसळ खाताना मला होणारा आनंद पाहून त्यांना आनंद व्हायचा. परंतू मी कुठेही काहीही चवीने खातो हे त्यांना आवडत नसे. लहानपणी विहारमध्ये घेऊन जायचे. भिडेमध्ये जंबो आईसक्रीम खाऊ घालायचे.
शाम-ए-गम की कसम मध्ये तलतने ‘चैन कैसा के पहलू मे तू ही नही’ या ओळीतला ‘चैन’ हा शब्द गाताना जो जीवघेणा सूर लावलाय तो ऐकताना दर वेळी ‘आsहाsहा’ असं म्हणायचे. तलत, सी रामचंद्र, ओपी, लता या अद्भुत जगाशी ओळख मला बाबांनी करून दिली.
बाबा स्टेट बँकेतून नोकरी करून रिटायर झाले. साधारण ऐंशी नव्वद चा काळ. त्यावेळी कॉम्प्युटर नव्हते. रोज यांच्या चर्चा ‘आज कॅशबुक टॅली झालं नाही.. आज इतका फरक लागला’ वगैरे असायच्या. त्यांचे मित्रं भेटले तरी याच चर्चा चालायच्या. गोखले नाक्यावरून बंदररोड पर्यंत चालत जाताना इतके लोक रस्त्यात भेटायचे की प्रत्येकाशी बोलत बोलत थांबत जाताना आम्हा भावंडांना कंटाळा यायचा. म्हसकर काका आणि करमरकर काका हे त्यांचे खास मित्रं. आमचे घरमालक दादा कुलकर्णी बाबांबरोबर खूप गप्पा मारायचे. आम्ही रहायचो बंदर रोडला. रविवारी गॅलरीत ते नुसते उभे राहिले तरी समुद्रावर येणारे अनेकजण बाबांना पाहून भेटायला वरती घरी यायचे.
कुठेतरी एकदा त्यांच्याबरोबर गेलो होतो तिथे मोठ्ठा तलाव होता. त्यात एक खापरीचा तुकडा आडवा धरून सऱ्र्ररकन त्यांनी टाकला तर पाण्यावर तो तुकडा टप्पे खात गेला.. मला म्हणाले , केदार ही बघ गम्मत.. याला भाकरी करणं म्हणतात. मग आम्ही बराच वेळ अशा भाकऱ्या केल्या आणि घरी आलो. रत्नागिरीत मे मध्ये जागोजागी आंब्याच्या कोयी रस्त्यावर सापडायच्या मग मी आणि बाबा अशी एखादी कोय पायाने उडवत उडवत घरापर्यंत आणायचो. खूप खिदळत हसत मी त्यांच्याबरोबर यायचो. खूप अद्भूत होते माझे बाबा. अमूकच मार्क मिळाले पाहिजेत, हेच तू केलं पाहिजेस असं कधी प्रेशर माझ्यावर त्यांनी टाकलं नाही की कधी मला मारहाण केली नाही की ओरडले नाहीत. आई कधी ओरडली की मी बाबांकडे अपील करायचो मग निवाडा माझ्या बाजूने लागायचा.
त्यांना सिगारेट तंबाखू मद्य कसलंच व्यसन नव्हतं. मांसाहार कधी त्यांनी केला नाही. कधी त्यांना अचकट विचकट बोलताना पाहिलं नाही . कधीही अर्वाच्य शिवीगाळी त्यांनी केली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर सात्विकता होती. छान हसायचे. मला हेच हवं तेच हवं अशी तडतड वचवच करताना कधी त्यांना पाहिलं नाही की कसला हव्यास त्यांना नव्हता.
माझ्यासाठी त्यांनी वारसा ठेवला तो साहित्य, संगीत, लेखन यांचा. माझ्या प्रत्येक लेखनाला ते दाद द्यायचे. शिरूकाका, बोकिलकाका, हळबेकाका, विजय जोशी काका , पाटणकर काका, खिरेकाका ,बर्वे काका यांचे उल्लेख नेहमी आदराने करायचे. त्यांचं एक जग होतं. आता ते कुठल्या जगात गेले असतील ?
त्यांच्याकडून मिळालेल्या प्रत्येक पुस्तकात जागोजागी त्यांनी केलेल्या खुणा आता मला भेटतील तेव्हा ते माझ्याबरोबर पुन्हा वाचन करत असल्याची जाणिव होईल आणि मला गलबलून येईल. त्या प्रत्येक खुणेबरोबर माझे अश्रु आता जमा होत जातील.
माझा त्यांच्याबरोबरचा एक फोटो मला नेहमी कोडयात टाकायचा. त्यांच्या शेजारी मी बसलोय आणि माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचं प्रश्नचिन्ह आहे. हा फोटो पहाताना मला नेहमी वाटायचं की या फोटोतल्या मला काय असा मोठा प्रश्न पडला आहे ? आज या कोड्याचं उत्तर मला सापडलं ते एक नवा प्रश्न निर्माण करून. तो प्रश्न म्हणजे ‘कुठे गेले माझे बाबा ?’
बाबांनी ठेचललेली आंब्याची कोय माझ्या मनाच्या आवारात आज येऊन पडली… मला पोरकं करून गेले…
अज्ञाताच्या प्रवासाला !!
//केदार//
(22/05/2019)
Leave a comment