आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे !!

By

आताच पोहे या विषयावर एक पोस्ट वाचली. म्हणून मी ही माझे पोहेपुराण सुरू करतो.

सकाळी नाश्ता करताना इडली वडे बटाटेवडा उपमा इतके पर्याय असताना मी नेहमी पोह्याना पसंती देतो.गिरगावात विनय हेल्थ होम आहे तिथे वांगी पोहे फक्त रविवारीच मिळतात. ते खायला मी एका रविवारी मुद्दाम नवी मुंबईहून सकाळी गेलो होतो. सार्थक झालं इतक्या लांब जाण्याचं इतके अप्रतिम मिळाले.

काहीजण पोह्यात मटार किंवा काजू घालतात. हा मला आचरटपणा वाटतो. तसंच दाणे हे आधी तळून चांगले कुडकुडीत झाले की बाजूला काढावेत आणि नंतर पोह्यांवर कोथिंबीर भुरभुरवण्याआधी मिक्स करावेत तरच ते चांगले लागतात. तसंही पोहे करणं हे वाटतं तितकं इझी नाही. कांदा काहीजण उभट चिरून घालतात तेव्हा कांद्याचा प्राण फोडणी करतानाच जातो. काहीजण सुकं खोबरं किसून वरून पेरतात तेव्हा ते पोहे खाताना स्वतःचीच मला कीव येते. ओलं खोबरं तेही ताजं खवून वरून अलगद पसरलं की अहाहा ! समोर कोरडे फडफडीत पोहे कधी आले की मागच्या जन्मातला आपला कुठलातरी पापपुण्याचा हिशोब चुकता झाल्याचं फील येतं.

पोह्यांवर शेव घालण्याचा प्रघात ज्यांनी सुरू केला त्यांचा मी निषेध करतो. शेव घातली की वरचा पोह्यांचा थर निष्प्राण होऊन जातो. पोह्यातलं सुखकर मॉयश्चर ती शेव खेचून घेते आणि मग ते पोहे खाताना रवंथ केल्यासारखं वाटतं. पुण्याला लक्ष्मी रोडवर पूना गेस्ट हाऊस आहे तिथे अफलातून दही पोहे मिळतातं. इतके ते झकास असतात ते दोन प्लेट खाऊनच समाधान होतं. रूम टेम्परेचरचं दही, कडक तळलेले दाणे, छान भिजलेले रेशमी पोहे वर तळणीची लांबट लाल मिरची असं ते अन्नब्रह्म खाल्लं की तृप्त वाटतं.

अलिबाग साईडला कोळाचे पोहे नावाचा प्रकार मिळतो. एका वाटीत नुसते पांढरे पोहे आणि दुसऱ्या वाटीत नारळाचं दुध आणि त्यात आमसुलाचा कोळ देतात. चमच्याने एका वाटीतून सुके पोहे उचलायचे ते त्या कोळात बुडवून खायचे, भारी प्रकार. गिरगावात कोना नावाचं हॉटेल होतं. तिथे चक्क दुधपोहे मिळायचे.

दडपे पोहे हे एक स्वतंत्र विश्व आहे. भरपूर ओलं खोबरं, एका भाजलेल्या पापडाचा चुरा, बारीक चिरलेला कांदा, आगलाव्या मिरच्या आणि हा सारा प्रकार कुठल्या डावाने भेळ खणखण आवाज करतात तसं नं ढवळता चक्कं हाताच्या मुठींनी चेपून चुरायचे असतात. आणि हो, या दडप्या पोह्यांत चिमूटभर हिंग घालावं की बस नंतर जेवणासाठी पोटात जागाच रहात नाही. काहीजण दडपे पोहे करताना वरून फोडणी घालतात. हे फोडणीचं व्हेरीएशनही छान जमून जातं. मागे एका मित्राच्या बायकोने इतके सुंदर दडपे पोहे केले होते की मी सर्व मॅनर्स बाजूला ठेवून हावरटासारखे पुन्हा द्या म्हणालो तेव्हा मला एक सिक्रेट कळलं की दडपे पोहे करताना नुसते पोहे हे तव्यावर आधी किंचित भाजून घ्यावे आणि नंतर सगळा मालमसाला त्यात घालावा म्हणजे बहार येते.

आधी म्हटलं तसं पोहे करणं हे येरागबाळ्याचं काम नाही. एका पावसाळ्यात कुंद वातावरणात शिरवळच्या आसपास थांबलो होतो. अशा वातावरणात नेहमीची मिजास असणारी भजी, वडे हे भाऊबंध समोर होते. मिसळही साद घालत होती. पण ती मावशी समोर पोहे करण्याची तयारी करत होती. तिचा एकंदर आवेश पाहून मनात म्हटलं ही उत्तम पोहे करणार, आणि झालंही तसंच. हिंडालियमच्या खडखडत्या प्लेटमधून खाल्लेला त्या पोह्यांची चव अजून मनात रेंगाळते आहे. बऱ्याच ठिकाणी मिसळीत पोहे घालतात पण ते कॅटॅलिस्टचं काम करतात. मटकी फरसाण वर रस्सा यात पोहे धारातिर्थी पडतात.

आपण मार्केटिंगमध्ये कमी पडलो. हेच पोहे जर फ्रेच किंवा तत्सम देशांच्या हाती योग्यवेळी लागले असते तर पोह्यांनी पिझ्झा बर्गरना वर येऊच दिलं नसतं.

मुलगी पहायचा कार्यक्रम म्हणजेच पोहे. मुलगी पसंत होवो नं होवो, पोहे असणारच. खरंतर पोहे हे तांदूळ कुटून करतात पण इथे मुलगी पहाण्याच्या कार्यक्रमात अक्षतांच्या आधी पोहे हजेरी लावतात. मला ते मराठी गाणं आठवतं ‘आयुष्य हे कढईतले कांदेपोहे’. खरंच पोहे हे आपलं नुसतं पोट भरायचं साधन नाही. ते एक सेंटीमेंट आहे. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाशी ॲटॅच असलेलं !!

महाभारतात श्रीकृष्णालाही सुदाम्याच्या पोह्यांनी भुरळ घातली. सुदाम्याने कृष्णाला उपीट खायला घातलं असतं तर मला नाही वाटत की ते उपीट पोह्यांइतुकं अजरामर झालं असतं. श्रीकृष्ण-सुदामा हे जे अद्वैत आहे ते पोह्यांशिवाय अपुरं आहे !

तर मग , कधी बोलावताय मला पोहे खायला ?

//केदार//

7 June 2024

माझा पोह्यांवर ब्लॉग वाचून आमच्या वैशाली वहिनींची प्रतिक्रिया वाचा. पोह्यांइतकीच खमंग प्रतिक्रिया आहे. रत्नागिरीला आता शुभेशच्या घरी पोहे वसुलीकरता धाड घातलीच पाहिजे. धन्यवाद वहिनी !!🙏

——-

पोह्यांचा लेख फारच सुंदर …अगदी खमंग… वर्णन वाचता वाचता जिभेवरही पोह्यांची चव यायला लागली..
आई ,वहिनी ,काकू ,आत्ते, मामी, मावश्या, सासूबाई सगळ्यांच्या हातची पोह्यांची चव आठवायला लागली…
माझ्या आजोळी दापोलीकडे ,ओल्या फोडणीचे पोहे.. असं आपल्या पोह्यांना म्हटलं जातं. तिकडे पोहे म्हणजे बरेचदा दडपे पोहे केले जातात. घरच्या शेतामध्ये पिकलेल्या भाताचे घरीच कांडून केलेले पोहे बऱ्याच जणांकडे असतात.(आता , ‘असायचे’ म्हणायला हवे) त्या कांडलेल्या ताज्या ताज्या पोह्यांची चव फारच छान लागते. या पोह्यांचे दडपे पोहे आणि त्याच्याबरोबर पोह्यांचा घरी केलेला पापड, तोही तळलेला… म्हणजे मेजवानीच असते.

तिकडे पोहे करण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी आहे. पोह्यांची सगळी तयारी करून ठेवायची आणि कढईमध्ये आधी पोह्यांचे पापड तळून घ्यायचे. त्यानंतर त्याच तेलात सांडगी मिरची तळायची आणि हे जे उरलेले तेल आहे त्याचीच फोडणी करायची आणि ती पोह्यांवर घालायची …. पोह्यांवर फोडणी घालून ते तेल जर उरलं तर त्याच फोडणीमध्ये डाळ तांदुळाची खिचडी पण करतात. तीही छान लागते.. त्या खिचडीला स्वाद छान येतो..

लेख वाचून झाल्यावर मीही दडपे पोहे केले 😄 आणि ते खाता खाता हे लिहितेय..पोहे संपले आणि लेखन ही संपवते….. सौ.वैशाली शुभेश पटवर्धन

Posted In ,