२४ जुलै !!
दुपारी साधारण चार ची वेळ. तुफान पाऊस कोसळत होता. अचानक माझ्या मावसबंधूंचा फोन आला. ते पोलिसात उच्चपदावर कार्यरत आहेत. म्हणाले की तू ताबडतोब ठाण्याल अमूक पत्त्यावर पोहोच. काहीतरी मिसहॅप झाला आहे. मावशी, म्हणजे माझ्या मातोश्री तिथे पोहोचल्या आहेत.
मी काय समजायचे ते समजलो.
माझा सख्खा धाकटा भाऊ सचिन हा ठाण्याला रहात होता. वीणा त्याची पत्नी आणि आदित्य हे बाहेरगावी गेले होते. वीणाचा मला आदल्या दिवशी फोन आला होता की दादा, सचिनचा फोन बंद लागत आहे आणि मला काळजी वाटत आहे. दुसऱ्याच दिवशी माझ्या मावसबंधूंचा मला वरीलप्रमाणे फोन आला.
पाऊस तुफान कोसळत होता. मी घरी पोहोचलो. कपडे बदलले. कार घरीच ठेवली आणि उबरने निघालो.
कुठे ? तर कापूरबावडी पोलिस स्टेशनला.
सचिन रहात होता त्या सोसायटीच्या लोकांनी सचिनच्या फ्लॅट मालकाला फोन केला होता की तुमच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत आहे. फ्लॅटचे मालक तिथे पोहोचले, त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांसमक्ष दरवाजा तोडून आत सर्वजण गेले. सचिनचा देह शांतपणे तिथे झोपलेल्या अवस्थेत होता. चार दिवसांहून अधिक काळापूर्वी कधीतरी झोपेतच ॲटॅक आला आणि तो गेला होता. देह सडू लागला होता. पोलिसांनी देह ठाणे सिव्हिलला पाठवला होता आणि कापूरबावडी स्टेशनला पुढच्या प्रक्रियेसाठी आम्हाला बोलावलं. तिथे रितसर आम्हा सर्वांची स्टेटमेंटस् घेतली आणि आम्हाला सांगितलं की आता तुम्ही सिव्हिलला जा.
बाहेर तुफान पाऊस कोसळत होता. संध्याकाळची वेळ. कापूरबावडी जंक्शनवर कोलाहल, कर्कश आवाज, एकही रिक्शावाला थांबायला तयार नव्हता की थांबला तर इतक्या जवळ न्यायला तयार नव्हता. मातोश्रींना एका गळक्या टपरीत बसवलं आणि रिक्षावाल्यांना विनवण्या करू वागलो. एकाला दया आली. सचिनचा एक मित्रं नितीन आला होता त्याची खूप मदत झाली.
सिव्हिलला आलो. गुडघाभर चिखल ! बाहेर पत्र्याची शेड. पेशंट येत होते त्याबरोबर पेशंटच्या नातेवाईकांचा गदारोळ होत होता. मागच्या बाजूला पोस्टमॉर्टेमची रूम होती. तिथे सर्व सोपस्कार सुरू होते. बाहेर लांब पोलिस चौकी होती. तिथून पोलिस मला याची झेरॉक्स आणा, आधार द्या, पॅन द्या वगैरे सांगत होते. संदेश तिथे पोहोचला. येताना दोन कार घेऊन आला होता. मला भेटला. म्हणाला वाईट झालं. मी म्हणालो , बरं. आता तू निघ. तर उसळून म्हणाला ‘मी काय उपटायला आलोय ?’
रिवाजाप्रमाणे ॲम्ब्युलन्सवाले, तिथला स्टाफ, नर्स, मामा वगैरे सर्वांनी यथास्थित पैसे उकळले. पाऊस तुफान कोसळत होता. कपडे ओले चिंब, बूटात चिखल आणि मी पोलिस, ॲम्ब्युलन्स, नर्स यांच्यामागे पळापळ करत होतो. आदित्यला बिचाऱ्याला काय चाललंय हे कंळतच नव्हतं.
रात्री ठाण्यातच सर्व पार पाडलं. सचिनबरोबरच्या लहानपणीपासूनच्या आठवणींनी डोळे भरून आले. माणूस जातो तेव्हा एक इतिहास बरोबर घेऊन जातो. बाहेर पाऊस वेड लागल्यासारखा अखंड कोसळत होता आणि माझ्या डोळ्यांतून आता बांध फुटून धारा सुरू झाल्या होत्या. माझ्याहून अवघ्या दोन वर्षांनी तो लहान होता. मागच्याच वर्षी एक ॲटॅक त्याला येऊन गेला होता. पंचवीस वर्षांपूर्वी भीषण अपघातामुळे डावा पाय अधू झाला होता. कुणीही भोगू नयेत इतक्या यातना त्याने भोगल्या होत्या. रत्नागिरीला आम्ही लहान असताना खेळलो, दंगामस्ती केली, मारामाऱ्या केल्या ते आठवलं. एकत्रं शाळेत जायचो, यायचो ते आठवलं. तो लहानपणी मला ‘दादाऽ’ अशी गोड हाक मारत दुडूदुडू धावत जवळ यायचा ते आठवलं. जोशीबाईंकडे संध्याकाळी आम्ही आईबाबांची वाट पहात पायरीवर बसायचो ते आठवलं. असंख्य आठवणी मनात आल्या. ढसढसा रडू आलं.
अपरात्रं झाली होती. बाजूला संदेश होता त्याचा आधार घेतला. बाहेर तुफान पाऊस कोसळत होता. संध्याकाळी एका जवळच्या मित्राला फोन केला तेव्हा तो म्हणाला ,’ अरे बापरे, वाईट झालं. चल, काही लागलं तर सांग हां” अशा वेळी काही हवं नको या जाणिवांच्या पलिकडे आपण गेलेलो असतो. अशावेळी फक्त तिथे कुणीतरी बरोबर आहे हाच एक मोठा आधार वाटत असतो. नं बोलावता संदेश आला होता, जा म्हटले तरी गेला नव्हता.. रात्री कुठूनतरी त्याने हार पैदा केले, हे ही तोच करू जाणे !
विद्युतदाहिनीवरून सचिन आत जात होता. परतून नं येण्यासाठी !
मनात माझ्या आकांत आणि बाहेर जुलैचा पाऊस अखंडपणे कोसळत होता !!
//केदार//
ता क – आत्ता साबणेकाकांचा फोन आला होता. वरील लेख वाचून ते हळहळले. म्हणाले आमचा फास्टर फेणे गेला रे ऽऽ. हो, तो लहानपणी अवखळ आणि तुडतुड्या होता. पळापळी करत भुर्रकन कुठल्या कुठे जायचा. त्याला साबणेकाका फास्टर फेणे म्हणायचे. 😢