https://youtu.be/6Agz5S4N82w?si=aEMdH7IuTdzJ7BHK
वाट ओळखीची. श्रावणातली हिरवाई. घाटातले वळणाचे रस्ते आणि मोहक चढउतार. मधूनच येणारे धुक्याचे पदर आणि कारमधल्या बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवलेल्या चाफ्याचा दरवळ. कराड ते मलकापूरमधला रस्ता म्हणजे बर्फाशिवाय दिसणारं स्वित्झर्लंडच. या रस्त्यावर मुद्दाम चहा प्यायला एखाद्या वळणावर मी थांबतो. लांब कुठूनतरी मोरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो.
याच क्षणी गाडीमध्ये आशाचा हाय ट्रेबल स्वर ऐकू आला आणि पाठोपाठ सतारीचे बोल. गाडी बाजूला घेतली आणि संपूर्ण गाणं ऐकलं. पुन्हा ऐकलं पुन्हा ऐकलं. पुन्हा पुन्हा ऐकलं. मन भरून ऐकलं. जितके संगीतप्रेमी कॉन्टॅक्ट्स माझ्या फोनमध्ये होते त्या सर्वांना ते गाणं पाठवलं. लगेच ऐका म्हणून गळ घातली. आता पाऊस सुरू झाला होता. बाहेर आलो. तोंडावर शिडकावा घेतला. गाडीत बसलो आणि पुन्हा ते गाणं सुरू केलं.
भारून टाकणारं ते दत्ता डावजेकरांचं संगीत आणि आशाचा थरथरणारा आवाज मनाला एका वेगळ्याच धुंदीत घेऊन जात होता. बोलाविन घुमती वाद्ये, तालात नाचते प्रिती, शब्दाविन होती गीते, बेभान भावना गाती हे शब्दप्रभू गदिमांचे शब्द.. अक्षरशः शब्दातीत आनंद देणारे. प आणि नी हे स्वर वर्ज्य, कोमल गंधार आणि बाकी सारे शुद्ध स्वर असलेला अतिशय गोड असा अभोगी कानडा, या रागातलं हे गाणं मनावर मोरपीस फिरवणारं ! अभोगी कानडा हा कलावती रागाचा आभास करणारा.. मनाला वेगळ्या उच्च पातळीवर घेऊन जाणारा !
आपण मराठी म्हणून जन्मलो आणि म्हणून या नितांतसुंदर गाण्याचा मनाला परमोच्च आनंद घेऊ शकलो यामुळे मला आपल्या मायमराठीचा अभिमान वाटला. गदिमा, दत्ता डावजेकर, आशा यांचे मनोमन आभार मानताना याच गाण्यातले गदिमांचे शब्द ओठांवर आले..’हा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभूचे देणे..’
नक्की हे गाणं वर दिलेल्या लिंकवर ऐका.
//केदार//
06/09/2024