स.न.वि.वि.

By

मला कित्येक वर्षात कुणाकडूनही ते निळ्या रंगाचं इनलॅंड लेटर आलेलं नाही किंवा साधं पोस्टकार्डही आलेलं नाही.

खरंच, कुणीतरी पाठवेल का मला ? काहीही लिहा, किंवा काही नं लिहिता पाठवलं तरी चालेल. नुसत्या रेघोट्या ओढा, किंवा एखादं कार्टून काढा, पण मला खरंच एक माझ्या नावाचं कुणीतरी माझ्या पत्यावर स्वहस्ताक्षरातलं एखादं पत्रं पाठवा.

पाठवाल का ? आणि हो, कुरियर नको. पोस्टाचा स्टॅंप आणि त्यावर काळा शिक्का पडलेलं असं पत्रं मला आलेलं हवंय.

किती साधी अपेक्षा पण ती पुर्ण होणं दुर्लभ झालंय. पूर्वी घराच्या दरवाज्यांना खास पत्रं येण्यासाठी एक झरोका असायचा त्यातून आपल्या नावाचं पत्रं सरकत आलं की किती छान वाटायचं! पत्रातला मजकूर काहीही असला तरी वर ‘श्री’ हा असायचाच. वर उजव्या बाजूला तारीख असायची. स.न.वि.वि. ने सुरूवात झाली की मग परिच्छेद सुरू व्हायचे. त्या पत्राला लिहिणाऱ्या हाताचा स्पर्श झालेला असायचा. पत्र वाचताना हसू आणि आसू यायचे. सारे घर त्या पत्राभोवती उत्सुकतेने जमा व्हायचे. एका हातातून दुसऱ्या हातात ते पत्रं फिरायचं. त्याचं पुन्हा वाचन व्हायचं. लग्नाचं आमंत्रण असेल तर त्या पत्राला हळदीकुंकवाची बोटं लावलेली असायची. एखाद्या पत्राची प्रतिक्षा असेल तर रोज पोस्टमन यायच्या वेळी उत्सुकतेने वाट पाहिली जायची.

खाजगी पत्रं असेल तर पत्रावर झडप घालून ते पत्रं नंतर लपवून ठेवलं जायचं. कुणाला नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर असेल तर ते पत्रं देवासमोर ठेवलं जायचं. कधी कुठली कोर्टाची नोटीस आली तर सारं घर चिंताग्रस्त व्हायचं.

मला इंदिरा संत यांची ‘पत्र लिही पण’ ही कविता आठवते.

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे.

चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलान्टीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिन्दूतून

शब्दामधूनी नको पाठवू अक्ष्ररामधले अधीरे स्पन्दन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगितले मी , तू हट्टी पण !

पाठविशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते

असा हा पत्राचा महिमा आता कुठे गेला असेल ? एका बोटावर मेसेज डिलिट करण्याच्या या दिवसांत एखादं पत्र आलं की ते उघडण्याआधीची धडधड , ते पत्र वाचल्यावर खुदकन् येणारं ते हसू आता कुठे गेले असेल ?

पत्रं उघडल्यावर मिळणारा तो मनभर आनंद आता ‘कसा आहेस?’ या व्हॉट्सअॅप मेसेजने मिळू लागला आहे.

हाताने लिहिलेल्या ‘खूप सारा प्यार’ किंवा स.न.वि.वि. या भावना आता मोबाईलवर नं वाचता समजून घेतल्या जातात. आता या अशा भावनाही व्हर्च्युअल झाल्या आहेत.

पाठवताय ना मला पत्रं ? आतुरतेने वाट पहातोय !!

//केदार//

15/09/2024

—————

प्रिय केदार,
स.न.वि.वि.
काय अभिजात संकल्पना तू उतरवलीस मुसाफिर माध्यमातून🫡 खरंच मी त्या विश्वात परत जाऊन आनंद लुटत आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ✌️किती माफक पण अनमोल गोष्टी आपल्या पिढीने अनुभवल्या आहेत. तूला स्तंभ लिखानासाठी खुप खुप शुभेच्छा 👍 अशीच अखंड लिखान घडू दे व आंम्हाला व्हर्च्यअल विश्वातून नैसर्गिक ऊर्जा मिळत राहो 🙏
तूझा शुभचिंतक
धनंजय माने

—————

नितीन पाटणकर

फारच सुंदर लिहिलयस केदार. Technology / AI ह्यांनी मानवाच्या आयुष्यात खूप चांगले आणि वाईट असे दोन्ही बदल घडवले आहेत पण त्यातले वाईट बदलांना वाईट म्हणु शकणारी आपली शेवटची पिढी असेल. कारण आताच्या पिढीने ते सारे अनुभवलेच नाहीय. – नितीन पाटणकर

—————

मिलिंद गोसावी

ब्लॉग म्हटलं की उगीचच अस वाटत राहत की लिखाण बंदिस्त असेल पण तुझे विषय आणि विचारही अस्सल मातीशी जोडलेले आहेत,मनमोकळे आहेत। हा ब्लॉग वाचत असताना लहानपण ते आताचं प्रौढपण सापडत जातं। आयुष्यातील अनेक अनुभवांचे रेखाटन सापडते। पत्रलेखन अगदी सुटून गेलेला विषय आणि एखाद्या व्यक्तीचं आयुष्यातून निघून जाणं- पावसाचं कोसळणं आणि इडली पुराण सारखं हास्यलेखन.. अतिशय समर्पक , सुंदर, सहज उतरलेले शब्द भासतात।घर, भिती, भिंती – सजीव ते निर्जीव अश्या सर्व विषयांना लेखणीतून उतरवले आहे।
विविध प्रकारचे विषय वाचत असताना आठवणींच्या हिंदोळ्यावर मन डुलत रहातं.

तुझा बाबा फक्त वाचणं होत नाही तर अनुभवला जातो.
तुला त्याच्याकडून साहित्याचा मोठा वारसा मिळाला आहे आणि तो तू जपतो आहेस.

मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा.
💐
पुन्हा नवीन विषय वाचण्याच्या प्रतीक्षेत..

तुझा मिल्या

———

डॉ वाघ यांचा अभिप्राय (प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर, तसा हा अभिप्राय माझ्या मूळ लेखाहूनही सुंदर लिहिला आहे)

प्रिय केदार
स.न. वि. वि.
पत्र लिहण्यास कारण की, आताच आपला स.न. वि. वि. लेख वाचला आणि राहवले नाही म्हणून हा पत्र प्रपंच. असो ,पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र आणि ते सुद्धा पोस्टमन कडून मिळणे ही आता फक्त आठवणीतली गोष्ट राहिली असली तरी, तुम्ही जो ब्लॉग लिहला आहे तो वाचताना मी अक्षरशः माझे बालपण ते वयवर्ष 30 एवढा प्रवास करून आलो. एके काळी निरोप अथवा आपल्या माणसांना शेकडो मैल दूर राहूनही भेटण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम म्हणजे टपालपत्र होते. आज वर्चुयल माध्यमांनी त्याला काळाच्या पडद्याआड टाकलं आहे. पण निदान आपल्या पिढीला तरी पत्र व पत्रलेखनाचे एक वेगळेच अप्रुप आहे. त्यातून जीवनातील अनेकविध भावभावनांचे रंग किंवा पैलू एकमेकापर्यंत पोहचवता येत होते, आणि जसे अनेक पुस्तके संग्रही ठेवून त्यातले एखादे आवडते पुस्तक अधून मधून वाचत राहणे तशीच काही पत्रे आपल्याला पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटत व ती विशेष पत्रे खूप काळजीपूर्वक जपून ठेवली जात.( मी आज ही काही जपून ठेवली आहेत)
आमच्या गावी जे पोस्टमन बाबा होते त्यांचा नातू म्हणजे बंडू (गजानन )माझा वर्गमित्र होता त्यामुळे लहानपणी टपालाची ती गोणपाट वजा जाड सीलबंद थैली ज्या एसटी ने गावात यायची तिथून तर थेट पत्र मालकाकडे ते पत्र पोहचविण्यासाठी साठी जी प्रक्रिया व्हायची तिचा मी साक्षीदार राहिलो आहे. विशेष म्हणजे आमचे घर गावातले त्यातल्या त्यात सर्वात जास्त पत्र येणारे घर होते
पत्रलेखन हा शालेय अभ्यासाचा महत्वाचा भाग होता आणि तो लहानपणीच छडी खावून पक्का केला जात होता. मी लहानपणी पत्र लिहण्यात बऱ्यापैकी तयार झालो असल्याने गावातले आणि गल्लीतील अनेक आजी ,आजोबा, काका, काकी आणि वहिन्या माझ्या कडून पत्र लिहून घेत आणि बदल्यात काही तरी खाऊ खायला देत. या पत्रप्रपंचाच्या अनेक गमती जमती विस्मृतीत दडल्या आहेत. पत्र हा माझ्यासाठी कदाचित त्यामुळे जास्तच जिव्हाळ्याचा विषय झाला असावा.
केदार तुम्ही तुमच्या ब्लॉग द्वारे जे काही लिखाण करतात त्यात आपल्या पिढीतल्या अनेक अनमोल आठवणीची पोतडी खुली करतात, आणि तीही चपखल साद्या सोप्या माय मराठी भाषेत.त्या वाचताना आम्ही कधी आपल्या भूतकाळात जावून फेरफटका मारून येतो ते कळतही नाही. अनेक वेळा इच्छा असूनही रोजच्या जग रहाटीत गतकाळातील अनेक कडूगोड आठवणींवर पडदा पडलेला असतो, पण तुमचे ब्लॉग वाचल्यावर त्या जसे अनेक वर्ष मातीत पडून राहिलेले बी अचानक पाऊस पडल्यावर अंकुरते, तश्या आमच्याही आठवणी बिजातून बाहेर येतात आणि एक सुखद विश्वात घेवून जातात. असेच तुमच्या अनुभवाच्या शिदोरी मधून आठवणी ब्लॉग रुपात लिहीत रहा आणि त्यानिमित्ताने आजच्या धावपळीच्या जगात एक क्षणभर का होईना विश्रांतीसाठी आम्हालाही त्यात सामील करून घ्या.

खूप खूप आभार आणि शुभेच्छा
आपला
डॉ. लालचंद वाघ

————-

उच्चांक केळकर

स. न. वि. वि. – एक अतिशय आपुलकीचा विषय…

खरंच एक आपुलकीचा विषय… पण कोणासाठी???? माझ्यामते ज्यांचा ज्यांचा पोस्टाशी संबंध आला, ज्यांनी ज्यांनी पोस्टकार्ड आंतरदेशीय पत्र इत्यादींचा वापर करुन पत्रलेखन केलं… आलेल्या पत्रांचं वाचन केलं… फक्त त्यांनाच… लेख वाचताना एक जुनी पण हृदयस्थ घटना आठवली… तुला माहितीच आहे, विकास आणि माझं मैत्रजीवन… १९९६ मधे जेव्हा मी भुसावळला प्रशिक्षणाला होतो… तेव्हा विकासने मला प्रशिक्षण केंद्राच्या पत्यावर पत्र पाठवलं होतं… तेव्हापासून जपून ठेवलेलं पत्र मध्यंतरी माझ्याकडून कुठेतरी गहाळ झालं… आज तुझा ब्लॉग वाचून त्या पत्राची खूपच आठवण आली…

खूप छान वाटलं तुझा ब्लॉग वाचून…
असाच लिहाता रहा… 👏👏👌🙏

उच्चांक केळकर

————

Posted In ,