एक अतिशय अभिमान वाटावा अशी बातमी म्हणजे आपल्या मायमराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळाला.
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या भाषेचा गौरव केला ती आपली मराठी, अत्युत्कृष्ट भावगीतं ज्या भाषेत ती मराठी. गीतरामायणासारखं अजरामर काव्य ज्या भाषेत ती आपली मराठी. कशीही फिरवू शकतो ती आपली मराठी. आपल्याच मायमराठीचं कौतुक मी तरी काय सांगू ?
मी मुंबईत कुठेही गेलो तरी मराठीतच बोलतो. अगदी एअरपोर्टवरही मी मराठीतच बोलतो. झक मारत बोर्डींग पास देणारी दोन वाक्यांनंतर मराठीत बोलायला लागते. सबंध पोलिस यंत्रणा मुंबईतली मराठी आहे.
असो. आत्ता रेडियोवर मराठी बातम्या देणारा ‘ दरवर्षी आता शासणाकडूण अणूदाण देन्यात येनार आहे’ असं बोलला. खरंच, असंच तो बोलला.
या वृत्तनिवेदकांचं सिलेक्शन कोण करतं ? की याला जो सिलेक्ट करतो तो ही तितकाच निर्बुध्द असतो ? यांचे उच्चार सुस्पष्ट, शुध्द आणि अचूक व्याकरणासहित आहेत की नाही हे कुणी पहात नाही ? यांची audition घेतली जात नाही ? यांचे उच्चार कुणालाच खटकत नाहीत ? बातम्या देताना शुध्द उच्चार हेच प्रमाण असतं. तोतरं, बोबडं बोलणं हे शारिरिक व्यंग असू शकतं पण अशुद्ध उच्चार वृत्तनिवेदकाचे कधीही नसावेत.
त्याची ती बातमीची भाशा ऐकूण माझ्या काणात बान घुसल्यासारखं मला वाटलं. अचानक माझ्या मनात ‘भ’ ची बाराखडी वाजू लागली.
आणि मराठी भाषेचा टाहो !!
//केदार//
04.10.2024
ता.क.
माझे मित्रं विश्वनाथ रेडकर यांनी माझ्या नजरेला वरील लेखातली एक भयंकर चूक माझ्या लक्षात आणून दिली. मी ‘अभिजात’ याऐवजी ‘अभिमत’ दर्जा असं लिहिलं होतं. नकळत माझ्याकडूनही एक ‘बान’ मराठी भाषेवर मारला गेला होता.
मागे एकदा पावसावर एक लेख मी लिहिला होता त्यात शेतावर काम करणाऱ्या बायका ‘इरलं’ घालून जातात ते दृष्य खूप मोहक दिसतं असं मला लिहायचं होतं . मी ‘इरलं’ ऐवजी ‘डोरलं’ लिहिलं होतं. अनेकांनी लेख वाचून प्रशंसा केली पण ‘डोरलं’ म्हणजे ‘मंगळसूत्र’. तुला नक्की काय म्हणायचंय ? असं फक्त उज्वलाने मला विचारलं होतं. अशी ही मराठी, कशीही फिरते.
तसं नुकतंच ‘पोहोचलो’ असं मला म्हणायचं होतं त्या ऐवजी ‘पोचलो’ असं लिहिल्यामुळे मी खजील झालो होतो.
माझे ‘काण’ धरायला असे सुविद्य स्नेही आहेत म्हणून चार अक्षरं खरडायला मनभर उत्साह येतो.( च्यामारी, ‘मणभर’ असं लिहायचं होतं, पण ‘मनभर’ हा शब्दही फिट्ट बसला की ! हीच मराठी भाषेची चकवा देणारी ताकद आहे)
//केदार//
———