‘ळ’ चा नादच खुळा !!

By

आपली मायमराठी ही किती प्रचंड सामर्थ्यवान आहे, किती वैभवशाली आहे हे मी मागे एकदा म्हटलं होतं. त्याचा आज पुनःप्रत्यय आला.

आज कुणीतरी आपल्या ‘ळ’ या अक्षरावरून मराठीमध्ये किती शब्द आहेत आणि ते किती सुंदर आहेत यावर एक लेख पोस्ट केला होता. मग यात उखळ, निखळ, मिसळ वगैरे शब्दांतल्या ‘ळ’ वर छान वर्णन केलं होतं.

घरी येताना हेच विचार डोक्यात घोळत होते. तेव्हा अचानक जाणवलं की ‘ळ’ हे अक्षर असलेले असंख्य शब्द मराठीमध्ये आहेत यात वादच नाही. प्रत्येक शब्द घेऊन त्यावर विचार करायचा म्हटला तर हा जन्म अपुरा पडेल पण तेव्हा हे लक्षात आलं की ‘ळ’ अक्षर इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की मराठीतल्या प्रत्येक अक्षराच्या बाराखडीमधल्या बहतेक अक्षराबरोबर ‘ळ’ ची जोड दिली की दोन अक्षरांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो.

मराठी भाषा ही अशी आहे. दुधारी तलवार ! कशीही फिरू शकणारी. तिच्या सामर्थ्याने डोळे दिपवून टाकणारी. आपण कोणते ते दोन अक्षरी शब्द ‘ळ’ ची जोड देता येणारे ते पाहूया

आळ, आळं, ओळ, बळ, बाळ, बीळ, अळू, बोळ, कळ, काळ, कूळ, केळं, डाळ, फळ, फाळ, गळ, गाळ, गीळ, गूळ,, हेळ, तळ, ताळ, तीळ, थाळ, दळ, धूळ, नळ,नाळ, नीळ, पळ, पाळ, पिळ, फळ, फाळ, भाळ, मळ, माळ, मिळ, मूळ, मेळ, राळ, रूळ, लाळ, चूळ, शीळ, खीळ,रीळ

अजूनही काही शब्द माझ्याकडून राहून गेले असतील तर कृपया मला सांगावेत.

असं हे वैशिष्ट्यपूर्ण ‘ळ’ अक्षर आणि अशी ही आपल्या मायमराठीची महानता !

या मायमराठीला माझा नमस्कार 🙏

//केदार//

09/10/2024

——————

‘ळ’ ला एकंदरीत अढळ पद आहे असेच म्हणावे लागेल 😄.

तसे आपल्याला बरेच दोन अक्षरी शब्द सापडतील, परंतु टाळ-मृदंग मधील ‘टाळ’ हा देखील एक सुंदर शब्द आहे. टाळू, चाळ, छळ बरेच मिळतील पण मराठी भाषा एव्हढी अथांग आहे की सूची सीमित ठेवूच शकत नाही.

“ळ” हा माझ्या खुपच जवळचा, कारण मला तो उच्चारता येत नाहि 😄

हिन्दी भाषा ही देवनागरी लिपीत असुन देखील “ळ” चा समावेश वर्णमालेत केला नाही अणि सहजपणे “ळ” चा “ल” होताना दिसतो.

“ळ” चा वापर देशाच्या पश्चिम अणि दक्षिण भागात उत्तर आणि पूर्व पेक्षा अधिक होतो, तरी गढवाली अणि हरियाणवी ह्या उत्तरेकडील भाषेत “ळ” चा वापर होताना ऐकला आहे.

एकुणच ह्या अढळ “ळ” वर लेख लिहुन ह्या अक्षराला मान दिल्याबद्दल आभारी आहे 🙏🏻

//विश्वनाथ रेडकर //

Posted In ,