वर्तुळ !!

By

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. हे असेच दिवाळीचे दिवस होते. पोटात गोळा येणं म्हणजे काय ते मी अनुभवलं त्या दिवशी. तीच ही थरारक कथा !।

मला आणि संदेशला तसं नेहमीच मुसाफिरखाना, मनीष मार्केट, मुंबादेवी या परिसरात भटकायला आवडतं. आम्ही नुसतेच फिरतो. मुसाफिरखान्यात एक मदरसा आहे. त्याच्या बाहेर एका गाडीवर फ्रुटसॅलड मिळतं. असं जगात कुठे मिळत नाही. पुढे रेडियो नावाचं जुनं हॉटेल आहे त्याच्या जरासं पुढे नाक्यावर गुलशन ए ईराण आहे, या दोन्ही ठिकाणी जगातला सर्वोत्कृष्ट खिमापाव संध्याकाळनंतर मिळतो. दुपारभर त्या गल्लीबोळांतून भटकलं की खिमापावावर ताव मारायचा हा आमचा नेहमीचा कार्यक्रम असायचा. कधी बादशहा किंवा सदानंद मध्ये घुसायचं किंवा मंगलदास मार्केटच्या भुलभलैय्यात हरवून जायचं.

या दिवाळीच्या दिवसांची मजा तर औरच असते. लोहारचाळ, अब्दुल रहमान स्ट्रीट, सदानंद मागच्या गल्ल्या तर बहरून , फुलून गेलेल्या असतात. लखलखाट, झगमगाट आणि प्रचंड उत्साह ओसंडून वहात असतो. ड्रायफ्रुट्सच्या दुकांनामधून नुसतं फिरलं तरी चवीसाठी म्हणून हातावर ठेवलेले काजूबदाम किलोभर तरी भरतात. बाजूला अत्तरांची दुकानं आहेत तिथे गेलो की हे घे ते घे करताना वासासाठी म्हणून लावलेली शरीरभर अत्तरं चोपडून बाहेर पडायचो. कधी विनाकारण क्रॉफर्ड मार्केटच्या आत पाळीव प्राण्यांचा बाजार भरतो तिथे पिंजऱ्यातले पक्षी, मांजरं बघत फेरी मारायचो. कधी मुंबादेवीचं दर्शन घ्यायचो.

मी मुंबईत कामाला जायचं असलं की कार ओल्ड कस्टम हाऊसला पार्क करायचो आणि मग सगळीकडे टॅक्सीने फिरायचो.

तर झालं असं …

त्या दिवशी मी अशीच कार पार्क केली, बाकीची कामं संपवली आणि घरी जायचं म्हणून कार घ्यायला आलो. तितक्यात संदेशचा फोन आला, ‘कुठे आहात तुम्ही ?’ मी म्हणालो ‘ मुंबईला आलो होतो, आता निघालो’. तर म्हणाला ‘मला तुमची मदत हवी आहे, लगेच मुसाफिरखान्यात या’.

मला तसंही घरीच जायच होतं. त्यामुळे मी माझी कार नं घेता लगेच दुसरी टॅक्सी करून मुसाफिरखान्यात गेलो. दिवाळीत क्लाएंट्सना देण्यासाठी संदेशची भली मोठी खरेदी चालली होती. मुंबईत एक बरं असतं. आपण कितीही खरेदी केली तरी आपल्याला पिशव्यांचं ओझं बाळगत फिरावं लागत नाही. लुंगी नेसलेले व डोक्यावर मोठी पाटी घेऊन फिरणारे भारेवाले मिळतात. आपण जे जे काही खरेदी करू ते डोक्यावरच्या पाटीत ठेवून आपल्या मागे मागे येत पार आपल्या टॅक्सीपर्यंत ते येतात. तसे आम्ही त्या दिवशी तीन ते चार भारेवाले केले. संदेशची खरेदी कशीबशी संपली आणि आम्ही कर्नाक बंदरचा पूल जिथे मुसाफिरखान्याला येऊन मिळतो त्या उतारावर येऊन टॅक्सीची वाट पहात राहिलो. तेव्हा मुंबईत ओला, उबर, मेरू वगैरे टॅक्सी नव्हत्या. तेवढ्यात कशीबशी एक कालीपिली येताना दिसली. तिच्यात भारेवाल्यांकडून सगळी खरेदी टॅक्सीच्या डिकीत व पुढे ड्रायव्हरजवळ आणि बाकी मागच्या सीटवर ठेवून आम्ही निघालो. माझी कार मी ओल्ड कस्टम हाऊसवर ठेवली होती. तिथे आलो. आता इथे भारेवाले नव्हते, मग मी आणि संदेशने ती सगळी खरेदी माझ्या कारमध्ये बसवली. एव्हाना रात्रीचे नऊ वाजले होते. आम्ही ती सगळी हमाली केल्यावर गाडीत बसलो. गाडीतला एसी चालू केला आणि शांतपणे पाणी पिऊ लागलो. संदेशला ठाण्याला जायचं होतं आणि मला नवी मुंबईला. तो म्हणाला मला वाटेत कुठेतरी सायन किंवा चेंबूरला दुसरी टॅक्सी करून द्या म्हणजे पुढे आपले आपण जावू. मला ती हमाली आठवली आणि पुन्हा आता अजून एकदा या टॅक्सीतून दुसऱ्या टॅक्सीत चढवा उतरवा या विचाराने धास्ती वाटली. मी म्हणालो त्यापेक्षा मी तुला डायरेक्ट ठाण्यालाच सोडतो. तोबरंम्हणाला आणि आम्ही निघालो.

एव्हाना रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती. आम्ही बॅलार्ड पिअरजवळून निघालो. रिझर्व बॅंक मागे पडली. शेर ए पंजाब मध्ये जेवूया काय असा विषय झाला पण गाडीतलं सामान आणि मुसाफिरखानात चरल्यामुळे तो बेत रद्द केला. मी कार सेंट जॉर्ज हॉस्पिटल जवळून नेत असताना मला काहीतरी आठवलं.

मी मुसाफिरखान्यातून निघताना ती सगळी खरेदी टंक्सीत भरताना माझी लॅपटॉपची सॅक संदेशच्या हातात दिली होती आणि ती त्याने टॅक्सीच्या मागे आपण डोकं टेकतो तिथे ठेवली होती. मी संदेशला सहज विचारलं की अरे आत्ता माझ्या कारमध्ये माझी सॅक ठेवलीस ना ? हे मी विचारलं आणि तो एकदम चमकला. आणि मलाच त्याने विचारलं ‘कुठली सॅक?’ मी गाडी बाजूला घेत ‘काऽऽऽय’ असं किंचाळलो. माझी सॅक मुसाफिरखाना ते ओल्ड कस्टम हाऊस या टॅक्सीत आम्ही विसरलो हे लक्षात आलं आणि माझ्या पाठीवरून घामाचा ओघळ वहात गेला. पोटात गोळा आला.

सिंगापूरला जायचं म्हणून सकाळी थॉमस कुक मध्ये गेलो होतो. सॅकमध्ये त्या दिवशी काय नव्हतं ? आम्हा चौघांचे पासपोर्ट, बॅंकेची पासबुकं, आधार कार्डं, पॅन कार्डस, माझा लॅपटॉप… !! हे सगळे महत्वाचे ऐवज त्या सॅकबरोबर गेले होते. मला ब्रह्मांड आठवलं. मी स्तंभीत का काय ते झालो. संदेशही सैरभैर झाला.

आतासारखी ओला उबर असती तर निदान ड्रायव्हरला फोन करता आला असता पण ती एक कालीपिली होती. तिचा नंबर तरी आम्ही कशाला लक्षात ठेवतोय ? आम्हाला काही सुचेना झालं. संदेश म्हणाला ,’ चला जिथून आपण टॅक्सी पकडली तिकडे जाऊ’.मी म्हणालो, त्याने काय होणार ?

तरी आम्ही निघालो. माझं अंग थरथरत होतं. कर्नाक पुलावरून गाडी डावीकडे घेतली. मुसाफिरखान्याच्या गल्लीपाशी नेली. जिथून मगाशी टॅक्सी पकडली होती तिथेच येऊन थांबलो. संदेश खाली उतरला आणि आज्बाजूला चौकशी करू लागला. मला आता डुप्लिकेट पासपोर्ट, त्यासाठी करावी लागणारी पोलिस तक्रार, पुन्हा पासपोर्टसाठी घालावे लागणारे खेटे, नवं पॅन हे सगळं समोर दिसू लागलं. एकदम ब्लॅंक झालो. लॅपटॉप तर गेलाच म्हणजे त्यावरचा सगळा डेटा गेला. अजून काय काय होतं त्या सॅकमध्ये काही आठवेना. अक्षरशः सुन्न होऊन गेलो. रडूच यायला लागलं ढसढसा !

स्टेअरिंगवर मान टाकून पडलो. गाडीवर टकटक झाली. बाहेर संदेश होता. खिन्नपणे दार उघडलं. तो पण शांतपणे आत येऊन बसला.. आणि ..ढॅण्टडॅणऽऽऽं.. असं ओरडत त्याने माझी सॅक माझ्यासमोर धरली. मी संदेशला मिठीच मारली. त्याच्याही डोळ्यांत पाणी आलं. मी विचारलं ‘हे कसं काय?’ तो म्हणाला ‘सांगतो, चला’.

संदेश मुसाफिरखान्याजवळ उतरला आणि आजूबाजूला चौकशी करू लागला. आता मुंबईसारख्या शहरात मगाशी केलेली टॅक्सी पुन्हा शोधायचं म्हणजे अशक्यच. इकडे तिकडे चौकशी करत असताना त्याला कर्नाक पुलावरून एक टॅक्सी येताना त्याला दिसली. ड्रायव्हरचा चेहरा त्याला अंधुक आठवला आणि त्याने ओळखलं, हीच ती टॅक्सी. पुढे होऊन त्याने ती थांबवली तर ड्रायव्हरच त्याला म्हणाला ‘अरे साब, अभी तो मैने यहीसे आपको छोडा था ना ?’ संदेशने काही नं बोवता टॅक्सीत मागे पाहिले तर माझी सॅक तिथे शांतपणे बसली होती. त्या ड्रायव्हरला ती सॅक तिथे आम्ही विसरलो होतो हे कळलंच नव्हतं. नशिबाने दोन गोष्टी झाल्या होत्या – एक, त्या ड्रायव्हरला ती सॅक तिथे विसरलो हे कळलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सोडल्यावर टॅक्सीला दुसरं भाडं मिळालं नव्हतं त्यामुळे तो ड्रायव्हर रिकामी टॅक्सी घेऊन पुन्हा मुसाफिरखान्यात आला होता. समजा एखादा दुसरा यात्रेकरू त्या टॅक्सीत बसला असता तर ? केव्हाच तो ती सॅक घेऊन उतरला असता आणि ते त्या ड्रायव्हरलाही कळले नसते. किंवा .. जाऊदे .. अंती ती सॅक सुखरूप मला मिळाली होती.

दैव अतर्क्य असते हेच खरे. काही वर्षांपूर्वी मी व सौ शैला पुण्याला रहात असताना लक्ष्मी रोडवर खरेदीला गेलो होतो. तेव्हा माझ्याकडे कायनेटिक होंडा स्कुटर होती. कुंटे चौकात स्कुटर लावली होती. येताना पाहिलं तर स्कुटरच्या खाली एक मोठी पर्स पडलेली दिसली. ती उचलली आणि घरी घेऊन आलो. घरी आलावर पर्स तपासलीं बरेच पैसे आणि दोन चेन होत्या. नीट चेक केलं तर एका बेकरीची एक पावती सापडली. केक बुक केल्याची जुनी पावती होती. वाढदिवसाचा केक बुक केल्याची ती पावती होती. भवती नं भवती करत तिथे फोन लावून चौकशी केली की अमुक तारखेला कुणी केक बुक केला होता का वगैरे. मग त्यावरून आम्ही मिळालेल्या नंबरवर फोन करून विचारल ती तुमच्यापैकी कुणाची पर्स हरवली आहे का. मला आणि शैलाला हे सगळं करण्यात एक उत्साहच वाटत होता. शेवटी त्या पर्सची मालकीण सापडली मग ती घरी आली आणि तिची पर्स घेऊन गेली.

माझी सॅक अशा अनाकलनीय रीतीने मला परत मिळाली तेव्हा मला ती घटना आठवली.

एक वर्तुळ पूर्ण झालं होतं

//केदार//

22.10.2024

Posted In ,