विषय आहे, पुण्यातला रिक्षावाला. त्यात नवीन असं काहीच नाही.
तर झालं काय, सकाळची साडे सातची वेळ. रस्त्यावर गर्दी नव्हती. भांडारकर रोड सुस्त होता. मी रिक्षाला हात केला आणि कसब्यात चला म्हणालो. रिक्षात शिरण्याआधी दम दिल्यासारख्या आवाजात रिक्षावाला म्हणाला, माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत आणि मी gpay घेत नाही.
सकाळी सकाळी कुठे मूड घालवा म्हणून मी बेधडक आत बसलो. कसब्यात उतरताना अडतीस रूपये झाले होते. अत्यंत अपराधी चेहरा करून मी वीसच्या दोन नोटा त्याला दिल्या आणि म्हणालो, सॉरी हां, एक रूपयाची अडतीस नाणी द्यायला पाहिजे होती पण दुर्दैवाने इतकेच सुट्टे आहेत. रिक्षावाला पुण्याचाच असल्याने त्याला असं बोलणं ऐकून घ्यायची सवय असावी. मुकाट्याने दोन रूपये मला देऊन तो निघून गेला.
फडके हौदाजवळ भक्तीभावाने वैद्यची मिसळ खाऊन परत निघालो. पांढरा सदरा आणि दणकट पायजमा घतलेला एक वयस्कर रिक्षावाला यावेळी भेटला. परदेशी जाताना इमिग्रेशन असतं तसं या काकानेही सुट्टे पैसे नाहीत अशी धमकी देऊनच मला आत घेतलं. वैद्यकडे मिसळ खाऊन तोंडात जरा तिखट चव आलेली होती. म्हटलं याला आता सोडायचा नाही.
गरवारे सर्कलला वरून मेट्रो जाताना दिसली. मी म्हणालो ‘वा, मेट्रो‘. तर हा रिक्षावाला काका मला म्हणाला, कसलं काय घेऊन बसलात, तीन तर डबे या मेट्रोला, किती जण जाणार एका वेळी? म्हटलं, का हो, रिक्षापेक्षा थोडी जास्तच माणसं एकावेळी जात असतील ना ? आणि तुमच्या रिक्षात एसी कुठे आहे ?
माझा उपरोध त्याच्या लक्षात आला नसावा. बिनडोक असावा. म्हणाला, पन, आमच्या पोटावर पाय आला ना ? अस्सं, म्हणजे च्यामारी ही दुखरी नस होती याची. या बिनडोकाला मेट्रोचे फायदे कुठे सांगत बसा असा विचार करून शांत बसलो. तर पुढे म्हणाला, ‘या मेट्रोने आम्हा रिक्षावाल्यांना पार घोडा लावला.’
काळाची गती कशी असते पहा, एकेकाळी पुणे हे शहर टांग्यांसाठी प्रसिध्द होते. हळू हळू टांगे नामशेष झाले आणि त्यांची जागा रिक्षांनी घेतली. मी त्या रिक्षावाल्याला म्हणालो, काय हो, जेव्हा तुमच्या रिक्षा या पुण्यात धावू लागल्या तेव्हा तुम्ही नाही का या टांगेवाल्यांना घोडा लावला ?
बहुधा तो चिडला असावा. रिक्षातून उतरताना पाहिले तर एकशे तेरा रूपये झाले होते. शंभरची एक नोट, दहा ची एक नोट आणि रूपयाची तीन नाणी मोजून नेमके एकशे तेरा रूपये त्याला दिले. रागीट चेहरा करून शंभरची नोट उलटी सुलटी करून पाहू लागला. आगीत तेल ओतायला मी म्हणालो, नीट बघून घ्या, सकाळीच घरी छापली आहे मी आज ..!!
शपथ सांगतो, आजवर पुण्यात एकही रिक्षावाला मला चांगला भेटलेला नाही.
एकजात सगळे उर्मट आणि सुट्टया पैशांची भीक मागणारे ..!!
//केदार//
03.11.2024