जयवंत दळवी हे कोकणातले. पार तळकोकणातले. त्यांच्या लेखनाचा मी भक्त. त्यांच्या लेखनात जागोजागी कोकण असतं. अनेक ठिकाणी त्यांच्या लिखाणात कोकणातल्या पेजेचा उल्लेख येतो.
या भाताच्या पेजेला मी लहानपणापासून चिकटलो आहे. तसाही गहू हा दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याकडे प्रचलित झाला. आधी काय होतं ? पेशव्यांच्या सहस्रभोजनात कुठे कणकेचा किंवा पोळीचा उल्लेख सापडतो ? भात भाकरी याशिवाय मुख्य पदार्थ काय होते ?
आपण कुठेही बाहेर फिरत असलो तरी कधी एकदा घरी जातो आणि वरणभात खातो असं होतं, नाही का ?
तर ही पेज ; लहानपणी आई गरम पेज आणि वर तुपाची धार आणि मिठाची कणी टाकून द्यायची. माझा दिवसच पेजेपासून सुरू व्हायचा. जीभेचे चोचले हे नंतर सुरू झाले. लहान बाळाला आईचं दुध सुटताना भातापासूनच सुरूवात केली जाते. कधी बटर चिकन आणि नान् चे तुकडे कुस्करून नाही सुरूवात केली जात.
नंतरच्या भ्रमंतीत मी भाताचे असंख्य प्रकार चाखले. बिर्याणीसाठी वापरला जाणारा लांब पांढरा शुभ्र तांदुळ म्हणजे भरमसाठ मसाल्यात घोळवलेले प्लॅस्टिकचे तुकडेच वाटतात मला. चव काय ती मसाल्याचीच असते, त्या तांदुळाला काही अर्थ नसतो. इंद्रायणी मला आवडतो पण कधीतरीच कारण त्याच्या अती चिकटपणामुळे बोटं पार लडबडून जातात. बासमती हा उगाच प्रतिष्ठा मिळालेला तांदूळ आहे. दुबार तिबार तुकडा बासमती याला काहीच अर्थ नाही. बासमती भातावर आमटी ओतली तर भात हा आमटीमध्ये कधीच मिसळून जात नाही. शितं पांढरी शुभ्रच रहातात आणि तोंडात घास घेतला की भात आणि आमटी यांची वेगवेगळी चव जिभेला लागते आणि बासमती भात जेवलो की पोट नंतर गच्चं होऊन जातं.
आंध्रातलं जेवण मला फार आवडतं. तिथे जेवताना पहिला भात मधला भात आणि शेवटला ताकभात असतो. रोटी किंवा चपाती यांची आगांतुक लुडबूड नसते. आपल्याकडे कोकणातही असंच. आंध्रातले पदार्थ मात्र उग्र मसाले घातलेले, कढीपत्त्याचा भरमसाठ वापर केलेले असतात. तिथे घोंगुरा म्हणजे आपल्याकडची अंबाडी हिची आंबट तिखट चटणी मिळते, ती या भाताबरोबर अफलातून लागते.
इंडोनेशियाला मी एक भारी प्रकार पाहिला. तिथे हॉटेलमध्ये प्रत्येक टेबलवर एक भलामोठा स्टीलचा टोप ठेवलेला असतो. आपण मेन्यूमधून आपल्याला जे हवं ते मागवायचं आणि जो काही समोर येणारा पदार्थ असतो तो त्या टोपात ठेवलेल्या भाताबरोबर खायचा. म्हणजे भात हवा तेवढा खा, टोपातला भात संपला की रिफिल केला जातो. भात फ्री, पैसे द्यायचे ते वर मागवलेल्या डीश चे.
कोलम वगैरे जाती ठीक असतात पण मला प्रचंड आवडतो तो घनसाळ. याला आजरासाळ असंही म्हणतात. हा फक्त कोल्हापूर , आजरा या परिसरातच पिकवला जातो. घनसाळीचा भात जेवला की नंतर चार तास हाताला भाताचा सुवास येत रहातो. कुकरच्या पहिल्या शिट्टीत आजूबाजूला भाताचा उन्मादक गंध पसरतो आणि पोटात भुकेचा आगडोंब उसळतो. घनसाळीचा भात त्यावर लोणी कढवताना हळदीचं पान घालून केलेलं तूप, वर पिवळधम्मक वरण असा बेत असला की चवीला भाजी किंवा लोणचं काहीही नसल तरी चालतं. अक्षरशः भुरके मारत, ओरपत हा भात खावा. काचेवर वायपर फिरतो तशी ताटावर बोटं फिरवून हा भात खावा. या तांदुळाचा मऊभात करून त्यावर मेतकुट घालून खाल्लं की मोक्षप्राप्तीचा आनंद मिळतो.
संदेश हा माझ्यासारखाच खवैय्या. आम्ही सिंगापूरला गेलो तेव्हा तिथल्या धान्यबाजारात गेलो आणि तिथून येताना दहा किलो जस्मिन राईस घेऊन आलो. ओव्हरवेट सामानाचे पैसे भरून तो तांदुळ आणला केवळ हौस म्हणून, पण मला काही तो तांदुळ आवडला नाही. नंतर घरी त्या तांदुळाच्या इडल्या केल्या त्या ठीक झाल्या होत्या.
मी जास्त अधिकाराने मत्स्याहाराविषयी नाही लिहू शकत कारण तो माझा प्रांत नव्हे. मासे वाचले माझ्या तावडीतून. पण कोकणातल्या लाल तांदुळाच्या भाताबरोबर माशाची आमटी आणी बागड्याची तुकडी मी एकदा खाल्ली होती ती लज्जत अजून आठवते आहे. तसा लाल तांदुळाबरोबर कांदाबटाट्याचा लालभडक रस्साही मस्त जमून जातो.
केळीचं लांब तुकतुकीत पान असावं, घनसाळीची मूद असावी , तुपाची उंच धार आणि त्यावर पसरलेलं वरण, लिंबाची एक फाक गच्च पिळून टाकावी आणि वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे म्हणत त्या अन्नब्रह्माचा आस्वाद घ्यावा ही माझी सुखाची कल्पना असते.
गुरगुट्या भातापासून सुरू झालेला जीवनाचा प्रवास हा पिंडांपर्यंत येऊन संपेपर्यंत तांदुळ हा आपल्या जीवनाचा भाग झालेला असतो. कधी अक्षता तर कधी पिंड या सर्व सुखदःखात तो आपल्या जीवनाचा साक्षीदार असतो.
पेज, मऊभात, पुलाव, खिचडी, बिर्याणी, साखरभात, वरण भात, मसूरभात अशी अनंत रूपं घेऊन येणाऱ्या तांदुळाबद्दल बोलावं तितकं कमीच. नाही का ?
//केदार//
08/11/2024