प्लेटमधला भज्याचा तुकडा शांतपणे तोंडात टाकून रवंथ करत मित्राने मला विचारलं, “काय रे ? एक शंका आहे. मला सांग, महाभारतामध्ये भीष्म पितामह त्यांच्या अंतिम क्षणी त्या काय त्या बाणांच्या शय्येवर होते ना ?”
समोर भजी आणि मिरची दिसत असूनही मी आधी आवंढा गिळला आणि म्हणालो “हो”. मग मित्राने पुढचा प्रश्न विचारला, “ मग एक सांग, ते बाण अर्जुनाने जमिनीवर मारून ती शय्या तयार केली होती ना ?” मी म्हणालो “हो.”
मित्राच्या समोरच्या भज्या संपल्या आणि त्याने अजून एक प्लेट मागवली. त्याने पुढे विचारले “ आता मला सांग की अर्जुनाने बाण जेव्हा जमिनीत मारले तेव्हा बाणांची टोकं जमिनीच्या दिशेने होती म्हणून ते बाण जमिनीत घुसले ना ? “ मी म्हणालो “अर्थातच”. “ मग एक सांग, आपण लहानपणापासून भीष्मांचं बाणांच्या शय्येवरचं चित्रं पहात आलो आहोत त्यात बाणांची टोकं वर आकाशाच्या दिशेला कशी दिसतात ? बाण मारला की त्याचं टोक जमिनीत घुसेल आणि त्यामागचा बोथट भाग वर राहाणार ना ? की त्या वेळी बाणाच्या दोन्ही बाजूंना टोकं होती ?”
मी म्हणालो.”जेव्हा अर्जून बाण मारत होता त्या वेळी मी तिथे नव्हतो, जरा दुसरीकडे बिझी होतो, नाहीतर तुला नक्की काय ते सांगितलं असतं”. मित्राचं बहुतेक माझ्या उत्तराने समाधान झालं असावं त्यामुळे त्याने भजी आणि त्याचे प्रश्न संपवून चहा मागवला.
मित्राचं माझ्या उत्तराने समाधान झालं पण ती बाणांची टोकं माझ्या मनात टोचत राहू लागली. भले ती टोकं वर असोत की बाण जमिनीत खोचून ती शय्या तयार केली असावी, पण भीष्मांना यातनादायी मात्रं ती टोकं होती हे मात्रं खरं !
भीष्म गेले , महाभारत संपलं पण बाणांची ती शय्या अदृष्यपणे अजूनही आपल्यासाठी ठेवून गेले. तसे आपण प्रत्येकजण बाणांच्या शय्येवरच असतो की !! फक्त प्रत्येकाला टोचणारे बाण वेगळे असतात. प्रत्येकाला जाणवणारी समस्या, त्याच्यासमोर आलेली संकटं, मानसिक, आर्थिक विवंचना हे प्रत्येकाला टोचणारे बाणच.
कुणाचं लग्न जमत नाही, कुणाचं लग्न टिकत नाही, कुणाला नोकरीमध्ये समस्या असतात, कुणाला नोकरीच मिळत नसते, कुणी मनाने खचलेला असतो तर कुणी आतून खचलेला असताना बाहेर मी किती छान , असं दाखवत असतो. कुणी कर्जात बुडालेला असतो तर कुणाला पैसा कुठे ठेवू हा प्रश्न पडलेला असतो. रोजचा पेपर उघडला की या टोचणाऱ्या बाणाचा तर वर्षाव होताना दिसतो. मंगेश पाडगांवकर म्हणतात तसे अदृष्य बुक्के मिळत असतात. कुणाला पडल्यावर चटईवर लगेच झोप येते तर कुणाला किंगसाइझ बेडवर रात्रभर तळमळत पडावं लागतं. कुणी उठून डोंबिवलीला गेला तरी भाराभर ‘ ॲट डोंबिवली’ अशी स्टेटस टाकतो तर कुणी जगभर भ्रमंती करत असला तरी ताकास तूर लागू देत नाही. मनोव्यापारांचे हे वेगवेगळे नमूने हे प्रत्येकाला टोचणाऱ्या बाणांच्या तीव्रतेवर ठरत असतात. हे टोचणारे बाण व्यक्तीची जडणघडण करत असतात. हे टोचणारे बाण समाजाला,देशाला घडवत असतात.
सगळं छान चाललंय असं कुणाचंच कधी नसतं. जगण्याच्या प्रत्येक पातळीवर चढउतार होत असतात. हे चढउतार, यशापयश हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणाऱ्या विशिष्ट टोचणीवर अवलंबून असतात. असं म्हणतात की माणसाच्या गरजा अनंत असतात पण प्रत्यक्षात माणसाच्या समस्याच अनंत असतात.
आपणही याच प्रवाहातले घटक आहोत. प्रभाते कर लक्ष्मी पासून शुंभंकरोती कल्याणम् च्या मधल्या कालावधीत आपला रोजचा संघर्ष सुरू असतो. हा संघर्ष करताना अनेक बाण आपल्याला टोचतात, घायाळ करतात तर कधी सुखावून जातात. प्रत्येक श्वासाबरोबर जसा आपल्या छातीचा भाता वरखाली होत असतो तसा प्रत्येक बाणाबरोबर आपल्या मनाची घालमेल सुरू असते ती फक्त आपल्यालाच जाणवत असते. .
म्हणून म्हटलं ‘आपण सारेच भीष्म, नाही का ?’
//केदार//
13.11.2024