
झालं, बघता बघता हे वर्षही संपत आलं. पायाच्या भिंगरीला थोडा पॉज देताना लक्षात आलं की यावर्षी बऱ्याच मंदिरांना जाणं झालं. वाढत्या वयामुळे नकळत येणारं अध्यात्म नसून वाढलेले प्रवास हेच हे कारण यामागे आहे.
वर्षाची सुरूवातच छान झाली. एका लग्नासाठी मध्यप्रदेशातल्या ओर्च्छा या गावी जाणं झालं. जाताना ग्वाल्हेरमार्गे गेलो. ग्वाल्हेरचे बिर्ला मंदिर पहाण्यासारखं आहे. तिथून ओर्च्छाला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ओर्च्छाचं राम मंदिर पहायला गेलो. तिथे रामाचं इतर ठिकाणी असतं तसं ‘मंदिर’ नसून रामाचा दरबार भरलेला आहे त्यामुळे तिथे त्याला ‘राम राजा दरबार’ म्हणतात. बरीच मोठी पौराणिक कथा आहे पण गोष्ट अशी की रामासाठी बांधलेल्या सुंदर मंदिरात रामाची मूर्ती नं बसवता बाजूच्या एका स्वयंपाक घरात ती ठेवली गेली आणि तिंथून ती कुणालाही हलवता आली नाही म्हणून मग विधीवत तिथेच रामाची प्रतिष्ठापना केली. आजही मूळ रामासाठी बांधलेलं भव्य मंदिर बाजूलाच आहे पण तिथे राम नाही. ती सुंदर वास्तू, आतला रिकामा गाभारा देवाशिवाय भकास दिसतो. बाजूलाच जो रामराजचा दरबार आहे तिथे इतकं चैतन्यमयी वातावरण असतं की तिथेच प्रसन्न वाटतं. देवाची किमया ती ही असते हे जाणवलं. आजूबाजूला किर्तन सुरू होतं, पायाखाली थंड जमीन समोर राजा राम आणि आजूबाजूला त्याचा भरलेला दरबार. प्रत्येकाने आवर्जून जावं असं हे ठिकाण आहे.
रत्नागिरीला श्री देव भैरी तर माझा सर्वस्व. समोर मस्तक झुकवलं आणि ‘ बा देवा म्हाराजा..’ असं कानावर आलं की आपण सुरक्षित असल्याची जाणिव होते. तृणबिंदुकेश्वराला प्रदक्षिणा घालताना छतावरून येणारे कवडसे आपला प्रदक्षिणामार्ग प्रकाशमान करतात.. सूर्य देव , श्री विष्णू यांच्या मूर्ती असलेल्या लहान घुमट्या व बाजूच्या जंबुकेश्वराचं दर्शन हे ही यावर्षी अनेकदा झालं. या पावसाळ्यात भागेश्वराला गेलो होतो. तिथे शंकर पार्वती कार्तिक आणि गणपती अशा सर्व कुटुंबाच्या मूर्ती आहेत. जुलैच्या धो धो पावसांतल्या त्या अंधाऱ्या संध्याकाळी घेतलेलं ते दर्शन अविस्मरणियच ! भगवतीचं मंदीर, पायथ्याला जोतिबाचं मंदिर .. यावर्षी तिथे जाणं झालं. जुगाई देवी, थिबा पॉइंटजवळचा मारूती इथेही जाणं झालं. मुरलीधराच्या टोपी घातलेल्या मूर्तीचं सौंदर्य विलक्षण आहे. तिथे गेलो की अजूनही ओसरीवर बसलेली माझी आजी आठवते आणि मन गलबलून येतं. मांडवीतल्या जोंधळ्या मारूतीचंही यावर्षी लांबून दर्शन झालं. पुळ्याचा गणपती हा तर माझ्या सगळ्यात जवळचा. यावर्षी त्याचंही फार छान दर्शन झालं. पावसला स्वामींच्या मठात सकाळच्या प्रहरी जाऊन दर्शन घेऊन समोर पसरलेल्या सतरंजीवर ध्यान लावून बसलो आणि येताना अपरिहार्यपणे भट कडे मिसळ खाल्ली. कशेळीला कनकादित्याला दोनवेळा जाऊन आलो आणि एकदा आडिवऱ्यात महाकालीचं दर्शन झालं. कनकादित्याला गेलो की प्रकाश सावरे नं चुकता भेटतो, गप्पा होतात, बरं वाटतं.
एका कराड दौऱ्यात वेळ काढून गोंदवल्याला महाराजांचं दर्शन झालं. येताना रस्ता चुकलो आणि माण तालुक्यात भरकटलो.
जाईन जाईन म्हणत होतो पण इतकी वर्ष राहून जात होतं. तो योग यावर्षी आला. अंबेजोगाईच्या योगेश्वरीचं मंदिर पाहता आलं. तिथून औंढा नागनाथ मंदिरात जाऊन आलो. मंदिरात शिवलिंग तळघरात आहे. आत उतरताना काळजाचा ठोका चुकला होता. पण ती यात्रा एक अविस्मरणिय होऊन गेली.
कोल्हापूरची अंबाबाई तर सतत माझ्या मनात असते. अंबाबाईच्या मंदिराच्या आवारात जी मंदिरं आहेत त्यांत दत्ताचं मंदिर तसंच नवग्रहांचं मंदिर आणि रामाचं मंदिर मी नं चुकता पहातो. रामासमोर मारूतीचं मंदिर फार छान आहे. ते आत्ता तिथल्या खडबडीत जमिनीसकट मला आठवतंय. एका खेपेला तिथून मी वाडीला गेलो आणि श्री दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. तिथून पुढे खिद्रापूरला गेलो आणि तिथलं प्राचीन शिवमंदिर पाहून अक्षरशः अवाक् झालो. तिथला स्वर्गमंडप पाहून मन मोहून गेलं. प्रत्येकाने तिथे एकदा तरी गेलंच पाहिजे इतकं सुंदर मंदिर आहे. या शिव मंदिरात शंकरासमोर नंदीच नाही. काहीतरी पौराणिक कथेप्रमाणे तो नंदी म्हणे नदीपलिकडेच रूसून बसला आहे.
शिरवळ ओलांडलं की खंबाटकी घाटाच्या माथ्यावर उजव्या हाताला एक लहान घुमटी आहे, तिच्यात मारूती आणि खामजाई देवीची मूर्ती आहे. मी जाताना नेहमी क्षणभर तिथे थांबतो. यावर्षीही थांबणं झालं.
पुण्यात कमला नेहरू पार्कजवळच्या दत्तमंदिरात जाणं झालं. दगडूशेट ला जाणं झालं. कसबा गणपतीचं दिवाळीच्या दिवसांत सकाळी झालेलं दर्शन मन प्रसन्न करून गेलं. बऱ्याच वर्षांनी गुंडाच्या गणपती मंदिरात जाणं झालं. एकवेळ श्रीकृष्ण ची मिसळ मी नाही खाणार ( अतिशयोक्ती झाली ) पण मी शनीपारावरच्या शनी आणि मारूतींचं दर्शन घेणं कधीच चुकवणार नाही. ( म्हणजे मी त्यांचं कितीदा दर्शन घेतलं याचा अंदाज चाणाक्ष वाचकांना येईल).
मालवणमध्ये भरड येथील दत्त मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे. संपूर्ण मंदिर लाकडी असून इथे एकमुखी दत्त आहे. समोर गणपती मारूती यांच्या घुमटीतील मूर्ती आहेत. दर्शन घ्यावं आणि समोरच्या गार फरशीवर ध्यान लावून बसावं. यावर्षी तो योग आला. मालवणमधीलच साई मंदिर अप्रतिम आहे. तिथे यावर्षी दशावतारी खेळ पहाण्याचा योग आला. मच्छींद्र कांबळींची आठवण आली इतका सुरेख खेळ रंगला होता. मालवणजवळ कांदळगावच्या रामेश्वराचं मंदिर फार सुंदर आहे. खूप सारे खांब आणि ओसऱ्या तिथे आहेत. धीरगंभीर वातावरणातलं ते दर्शन आणि दरवळणारा उदबत्तीचा सुगंध आत्ता मला जाणवतोय. तिथून पुढे भराडीला जाऊन आलो. येताना डांगमोड्यातल्या रवळनाथापुढे गाऱ्हाणं घातलं.
एखाद्या रविवारी जर मी चुकून मुंबईत असलो आणि चुकून सकाळी लवकर उठलो तर नं चुकता मी नेरूळच्या बालाजीला जातो. मांडी घालून बसतो. विष्णूसहस्रनाम म्हणतो. हे ही दोन तीन वेळा झालं. गांवदेवीची तर नवरात्रात ओटी भरणं होतं. झुलेलाल जवळ नेरूळचे पुरातन गणपती दत्त आणि देवी आहेत. बाजूला शंकर भगवान आहेत तिथे जाणं झालं.
मुंबईत सिद्धिविनायकाला एकदा जाणं झालं. तिथून पुढे महालक्ष्मी आणि हाजी अलीला जाणं झालं. मुंबादेवी आणि त्याच आवारात श्रीनाथजी आहेत त्यांचं दर्शन यावर्षी झालं. ठाण्यात संदेशबरोबर चेंदणी कोळीवाड्यातील दत्त मंदिरात एकदा गेलो, खूप प्रसन्न वाटलं.
काशीस जावे नित्य वदावे असं म्हणतात त्याप्रमाणे वाराणसीला गेलो. बापरे, तिथले घाट, अरूंद गल्ल्या, गर्दी, गजबज हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे आणि मी नंतर यथावकाश यावर लिहिनच पण गंगा आरती आणि घाटांचं दर्शन अवर्णनीय आहे. सेतु माधवराव पगडींच्या आत्मचरित्रात काशी घाटांचं डिटेल वर्णन आहे ते आठवलं. गंगेत न्हालो, तिच्या पात्रात पाय बुडवून लहान मुलासारखा खूष झालो. काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन मणिकर्णिका घाटावरचं दृष्य पाहून अंतिम सत्याची जाणिव झाली. खरंच माझा काशी एक्स्पिरिअन्स खूप मोठा आहे. तो लवकरच पुढे येईल.
आता मोठं लक्षात रहाण्यासारखं दर्शन म्हणजे अयोध्या ! तो एक जीवनानुभव आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अयोध्या या मनूनिर्मित नगरीला गेलच पाहिजे. सुंदर दर्शन झालं. शब्दातीत आनंद झाला.
वर्ष सरता सरता मी यावर्षी किती मंदिरांत गेलो आणि किती देवांचं दर्शन घेतलं याचा लेखाजोखा घेताना वाटलं की मी इतका आस्तिक आहे ? देवाचं दर्शन घेताना एकाच वेळी अंगी असायला हवी ती तटस्थता आणि तादात्म्यता माझ्यात आहे का ? मूर्त आणि अमूर्त असा ईश्वर असताना आपण इतक्या देवांचं दर्शन कसं काय घेऊ शकलो याचा अचंबा वाटला. द्वैत आणि अद्वैतापलिकडे जाऊन सर्व आसक्ती सोडून ईश्वरासमोर नतमस्तक झालं पाहिजे तरच त्या दर्शनाचा खरा लाभ होतो.
मी तर खरा भटक्या ! भ्रमंती करताना या सर्व मंदिरांमध्ये गेलो, हात जोडले, खण्ण खण्ण घंटा वाजवून मस्तकातून शरीरभर उतरत जाणारे तरंग अनुभवले, उदबत्तीचा दरवळ येत असताना स्वतःला खूप शांत फील करवलं. कधी भल्या पहाटे तर कधी करकरीत तिन्हीसांजेला या अनेक मंदिरांत गेलो.
सुधीर मोघे म्हणतात ‘ मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल’. आपण या मनाला काबूत आणण्यासाठी देवाला जातो आणि वेगवेगळ्या मागण्या करून त्याला त्रस्त करून सोडतो.
मी ही यावर्षी अनेक देवांना बहुतेक वेठीला धरलं असावं. देव करो आणि नवीन वर्षात मला अनेक देवांच्या दर्शनाचे योग येवोत.
//केदार//
21/12/2024