जुने दिवस !!

By

आपल्या लहानपणी कधी सुट्टी असली की आपल्या घरी पाहुणे गप्पागोष्टी करायला भेटायला सहकुटुंब घरी यायचे. मग पाहुणे येणार म्हणून घर आवरणे, ठेवणीतले टेबलक्लॉथ काढणे, पोहे चहा वगैरेंसाठी निराळ्या कपबश्या प्लेट्स धुवून ठेवणे, आम्हा मुलांनी नीट आवरून बसणे वगैरे गडबड व्हायची. पलंगपोस नवे घातले जायचे. चपला नीट स्टॅंडवर रचल्या जायच्या.मग पाहुणे यायचे. काय रे ? कितवीत तू आता ? वगैरे संवाद व्हायचे. मग हसणं खिदळणं होऊन ‘ आता तुम्हीही आमच्याकडे या एकदा’ मग ‘ हो जरूर, आम्हीही येऊ’ वगैरे संवाद व्हायचे. लहान मुलांची कौतुकं व्हायची.

आम्ही रत्नागिरीला बंदर रोडला रहायचो. रविवारी हमखास फिरायला समुद्रावर जायचे ते दिवस. बंदररोडवरूनच समुद्रावर जावं लागे. त्यामुळे . आहात का घरी ? चाललो होतो समुद्रावर पहावं आहात का घरी ! असं म्हणून आमच्याकडे अनेक जण यायचे.

कहा गये वो दिन ? ती भेटीची ओढ, स्नेह, कौटुंबिक जिव्हाळा , नात्यांची घट्ट वीण, प्रेमळ दटावणी .. कुठे गेलं सारं ?

आता मी पण चोवीस तास दार बंद करून बसतो. नेटफ्लिक्स किंवा व्हॉट्सॲप पहात बसलेला असतो माझी मुलं मोठी झाली आता. आता मी ही सहकुटुंब कुणाकडे खास भेटायला जात नाही आणि माझ्याकडेही कुणी येत नाही.

आपल्या आधीच्या पिढीबरोबर ते सुखद क्षणही इतिहासजमा झाले, नाही का ?

//केदार//

17.01.2025

Posted In ,