पहाटे चालायला बाहेर पडलो. एक राऊंड झाला. जरा चहलपहल वाढू लागली.
घरी परतताना सोसायटीच्या बाहेर भाजीचा एक टेम्पो दिसला. मटारचा ढिग होता. आणि त्या टेम्पोवाल्याने रस्त्यावर हरभऱ्याच्या जुडींचा कमरेएवढा उंच असा ढीग रचून लावला होता. मी मटार घेतले दोन किलो आणि म्हटलं एक हरभऱ्याची जुडी घ्यावी.
पाहिलं तर तिथे दोन बायका उभ्या होत्या आणि हरभऱ्याच्या त्या कमरेएवढ्या ढिगातून एखाद्या दुकानात बनारसी कांजीवरम पैठणी जशा उलगडून पहातात तशी एक एक जुडी तपासून पहात होत्या. या त्यांच्या उद्योगाने तो ढिग पिसाच्या मनोऱ्यासारखा कलता झाला होता. भाजीवाला पार त्रासून गेला. मलाही जुडी घेता येईना इतक्या त्या मनाजोगती जुडी शोधण्यात गर्क झाल्या होत्या.
मी पुढे झालो , भाजीवाल्याला म्हणालो , ‘द्या हो पटकन एक जुडी’ भाजीवाला जुडी निवडू लागला तर मी म्हणालो ‘ द्या हो कुठली पण, सगळ्या तर सेमच दिसत आहेत.’ त्याबरोबर माझ्यासारखे दोघं तिघं बाजूला उभे होते ते हसले.
शेवटी अफ्रिकेतल्या खाणीत एखादा हिरा सापडावा तसा आनंद झाल्यासारखा त्या दोन बायकांना मनासारखी जुडी सापडली.
तुकोबांनी म्हटलं आहे ।कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी।
जर खरोखरच ती विठाई म्हणजे विठूमाऊली जर भाजीच्या स्वरूपात असेल आणि तिच्या समोर हे असे कस्टमर असतील तर विठूमाऊलीचे हात कंबरेवर आहेत यात नवल ते काय ?
//केदार//
21.01.2025