एका बंगाल्याची ती कंपनी होती. एका सकाळी मी तिथे जॉइन झालो.
मोठ्या दिमाखात मी ‘C’ ग्रेड अकौंटस् क्लार्क म्हणून जॉइन झालो होतो. एक ओंगळ चेहऱ्याची रिसेप्शनिस्ट मी ‘C’ ग्रेड मध्ये जॉइन व्हायला आलो आहे हे समजताच कुजकटपणे हसली होती. पहिल्या दिवशी तिथला एच आर हेड मला त्यांच्या दोन प्लॅंटना घेऊन गेला. त्याच्या डबडा फियाटमधून जातानाही मला खूप भारी वाटत होतं. तो एचआर हेड म्हणजे तिथलं एक जुनाट खोड असावं कारण सगळे जण त्याला रिस्पेक्ट देत होते. मी कुठल्या पोस्टवर आलो आहे हे कळताच त्वरीत तुच्छ कटाक्ष मला देत होते. एका कंपनीत मी जॉइन झालो आहे याच आनंदात माझा मी होतो.
संध्याकाळी कट्टयावर मित्रमंडळी भेटली. सगळे जण संघर्षच करत होते ते दिवस होते ते. मी खूप भारी फील करत होतो . सगळ्यांना अमृततुल्य चहा पाजला.
दुसरा दिवस उजाडला. काल सगळ्यांच्या ओळखी करून घेण्यात दिवस गेला होता. काल लग्नाचं रिसेप्शन झालं होतं आजपासून संसार सुरू होणार होता. एक गोल चेहऱ्याची बंगाली बाई माझी बॉस होती. तिने शिलाई मशिनसारखं दिसणारं एक वजनदार मशिन माझ्या टेबलवर आणून ठेवलं. माझं काम काय होतं ? तर बॅंकेचे चेक हाताने लिहायचं. ही गोष्ट आहे १९९३-९४ ची. तेव्हा RTGS किंवा ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर अशी आजच्यासारखी सिस्टिम नव्हती. हाताने लिहिलेले चेक इश्यू केले जायचे. पर्चेसवाला एक ढिगारा माझ्या टेबलवर आणून टाकायचा आणि गुरकावायचा की हे चेक आजच दिले पाहिजेत.
तिथेही एक भानगड होती. घेतला चेक की लिहिला आणि सहीसाठी पाठवला असं नसायचं. त्या प्रत्येक चेकखाली एक कार्बन पेपर असायचा. म्हणजे चेक लिहिला की त्याची कार्बन कॉपी आपल्याकडे ठेवायची. हा चेक लिहून झाला की कार्बन कॉपीसकट त्या मशीनमध्ये ठेवायचा आणी त्यावर आकडे होते. मग चेक जितक्या रकमेचा असेल तसे आकडे जुळवून नॉट ओव्हर रूपीज असं करून प्रत्येक आकडा फिरवून त्या चेकवर धपाक धपाक आवाज करत शिक्का उमटवावा लागे. थोडक्यात म्हणजे ते एक बिनडोक काम मला दिलं होतं. कामात कसलं व्हेरिएशन नाही आणलं तर तो मी कसला ? मग मी चेक लिहिताना वेगवेगळ्या प्रकारांनी अक्षर काढू लागलो. मी लिहिलेले चेक लोकांकडे गेले की बॅंकेत टाकण्याआधी लोक त्या चेकची झेरॉक्स काढून ठेवू लागले. वेगवेगळी कॅलिग्राफी करून मी चेक लिहीत होतो त्याचं कौतुक होत होतं. मी मस्त गाणी गुणगुणत चेक लिहायचो आणि त्या मशीनचा धपाक ठपाक आवाज करत काम करत होतो. पण हे माझं रमणं नं पाहवणारे लोक तिथे होते. माझ्या त्या बॉस बाईलाच त्यांनी पिना मारायला सुरुवात केली. मग ती बाई माझ्या कामात खुस्पटं काढायला लागली. या चेकवरचं स्पेलिंग चुकीचं आहे तर या चेकवर टिंबं चुकीचं आहे वगैरे. एकदा तर Fourteen की forteen यावरून वाद झाला आणि त्या बाईने चक्कं डिक्शनरी उघडून माझी चूक मला दाखवून मला खजिल केल्याच्या आनंदात रसगुल्ला खाल्ला. मी तिथे ‘C’ ग्रेड होतो त्यामुळे मला वरच्या थरात डायरेक्ट ॲक्सेस नसायचा. पण एकदा काहीतरी झालं आणी मी एक दिवस दांडी मारली. मी येणार नाही हे आवर्जून ऑफिसला कळवलं होतं तरी दुसऱ्या दिवशी मला वरच्या थरातल्या साहेबासमोर या बाईने नेऊन उभं केलं. त्या साहेबाने आधी मला थंडपणे न्याहाळलं. तो मला असा रोखून पहात असताना मी आठवायचा प्रयत्न करत होतो की मी काल स्वारगेटला पाकिटमारी केली की स्टेशनला ? पण मला मी असं काही केल्याचं काही आठवलं नाही. त्या साहेबाने मला रोखून विचारलं की का रजा घेतलीस ? खूप चेक इश्यू करायचे राहिले आहेत वगैरे. मग मी रजा घेतल्यामुळे कंपनीचा करोडोचा लॉस झाला असा मला गिल्ट देऊन तंबी दिली गेली. बाहेर येतो तो त्या बाईने माझ्या टेबलवर मोठा ढिग आणून टाकला आणि म्हणाली की हे आजच्या आज झाले पाहिजे. मी रात्री अकरापर्यंत बसून ते चेक लिहिले होते.
आज हे सगळं आठवताना हसू येतं. आजच्या ‘मी’ बद्दल नंतर लिहिणार आहेच. तिथे चहाच्या दोनच वेळा असायच्या तेव्हाच चहा जागेवर ठेवून शिपाई जायचा. बाय द वे तिथे तीन शिपाई होते ते खूप मस्त होते. मी पॅंट्रीमध्ये गेलो की गुपचूप मला अर्धा कप चहा द्यायचे. तिथे हसायला बंदी होती. बाकी युनिफॉर्म वगैरे काही भानगड नव्हती तरी सर्वांचे सुतकी चेहरे हाच तिथला युनिफॉर्म होता. तिथे जर एखादा स्कूटर किंवा बाईकने येत असला तर रोज तीन रूपये कन्वेयन्स दिला जायचा पण हेल्मेट असली तरच तीन रूपये दिले जायचे. किती काळजी ! तसंच रोज फूड अलाऊंस म्हणून दोन रूपये दिले जायचे.
मला रोज ते चेक खरडताना जाणवायचं की साला हे काही बरोबर नाही. कुछ तो करना पडेगा. मग मी मला दुसरं काम द्या म्हणून विनंती केली तर ती सरळ धुडकावली गेली. ते चेक लिहितच मी एक दिवस रिटायर होईन की काय असं मला वाटू लागलं. त्यात तिथे जातीचं राजकारण आणि भेदाभेद मला जाणवू लागले. भयंकर तणावाखाली मी रोज ऑफिसला जायचो. आज कुणाची बोलणी खायला लागू नयेत म्हणून एक पर्टिक्युलर पेनच खिशाला लावून जायला लागलो. माझं जे डेस्क होतं त्यावर तेव्हा आजच्यासारखे एलईडी लॅम्प्स नव्हते. एक भगभगीत पांढरी ट्यूब डेस्कपासून वर दीड फुटावर लावली होती. चेक लिहिताना तिचा इतका प्रखर प्रकाश व्हायचा की रोज घरी गेलो की थंड पाण्याने डोळे धुवावे लागायचे. एकदा तो उजेड प्रखर होतो म्हणून मी त्यावर पांढरा कागद चिकटवला तर ही बंगाली बाई तरातरा आली आणी डेकोरेशन खराब होतं म्हणून फर्रकन तो कागद फाडून गेली.
या कंपनीचे ऑडीटर होते श्री गोगटे सर. एकदा ते कंपनीत आले तेव्हा अरे सुंदर अक्षरांत मला चेक मिळतात ते कोण लिहितं असं त्यांनी विचारलं तेव्हा माझी आणि त्यांची पहिली भेट झाली. अरे तू आपटे मी गोगटे.. छान छान .. असं त्यांच्या शैलीत म्हणून गडगडाटी हसले. अतिशय प्रसन्न असं व्यक्तिमत्व होतं सरांचं. मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे. ती कहाणी पुढे येईलच.
या कंपनीत मी ऑगस्ट ९४ ला जॉइन झालो आणि याच जोरावर माझं ९५ मध्ये लग्न झालं. रोज या अशा कंपनीत जाणं आणि चेक खरडणं हे मला फार अंडररेटेड वाटत होतं. अशातच लग्नानंतर आमच्या घरी पहिली मंगळागौर झाली. मी रात्री जरा कणकण होती अंगात म्हणून गोळी घेऊन झोपलो. सकाळी जाग आली पहातो तो कामावर जायची वेळ टळून गेलेली. ऑफिसला रजा घेणं पातक होतं. म्हटलं मरूदे च्यायला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो तर काल मारलेल्या दांडीचे काय तरंग उमटतील हे विचार मनात आले आणि पुन्हा मनात म्हटलं, मरूदे च्यायला आणि असेच सलग दोन तीन दिवस ऑफीस ला गेलोच नाही. म्हटलं जे व्हायचं ते होवो दरम्यान एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात खंजीर घेऊन ऑफिस मध्ये असणाऱ्या एका कारकुनाबरोबर सिक नोट आणि रजेचा अर्ज पाठवून दिला.
आठवडा संपला. मनात काहीतरी ठरवलं. सौ शैलाला काही बोललो नाही. बाईक काढली आणि ऑफिसला गेलो. जागेवर जाऊन बसलो तर ती बंगालीण माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होती. ती स्टान्स घेऊन माझ्या मागच्या पिढ्यांचा उद्धार करणार तो शांतपणे हसलो आणी राजीनामा तिच्या हातात ठेवला आणि म्हणालो की मी आज आत्ता निघत आहे. गुड बाय. नोटीस पिरीयड वगैरे खड्ड्यात गेले.
मणाचं ओझं मनावरून उतरल्यासारखं हलकं वाटत होतं. तुळशीबागेत गेलो मस्त मिसळ मागवली. तिथून सरळ गोगटे सरांच्या ऑफीसला गेलो. सरांना सगळी कहाणी वृत्तांत केली. संध्याकाळी घरी आलो. शैलाला म्हणालो चल जरा फिरून येऊ. पेरूगेट भावे स्कूलच्या फुटपाथवरून जात असताना तिला म्हणालो की मी आज जॉब सोडला आहे. हे ऐकून ती क्षणभर थांबलीच. म्हणाली , पुढे ? पुढच्या क्षणी माझा हात घट्ट धरून म्हणाली चल होईल सगळं छान, काळजी करू नको.
त्यानंतर खरंच मला काळजी करावी लागली नाही.
अन्नासाठी दाही दिशा फिरायला लावणाऱ्या त्या जगदीशालाच काळजी लागली असावी.
ते पुढे येईलच !!
//केदार//
29.10.2025